मुंबई- मराठी परंपरा मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीवर ३ एप्रिलला स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२२ पाहायला मिळणार आहे. यंदाच्या सोहळ्याचं खास आकर्षण म्हणजे भव्यदिव्य शोभायात्रा. उत्सवाच्या रंगात रंगून गेलेल्या या सोहळ्यात मराठी सणांचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. मराठी वर्षाची सुरुवात होते ती चैत्राची गुढी उभारून. या खास दिवशी मराठी परंपरा मिरवत जल्लोषात निघणाऱ्या शोभायात्रा सर्वांचं लक्ष वेधून घेतात. स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यातही स्टार प्रवाहच्या कलाकारांच्या उत्साहात न्हाऊन निघालेली शोभायात्रा पाहायला मिळेल.
ढोल ताश्यांचा गजर आणि पारंपरिक पोशाखाला आधुनिकतेची जोड देत दिमाखात मिरवणारे कलाकार सोहळ्याची दणक्यात सुरुवात करणार आहेत. स्टार प्रवाहच्या कुटुंबाचा हा कौतुक सोहळा म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी असणार आहे. खुमासदार सूत्रसंचालन, धमाकेदार परफॉर्मन्सेस आणि विनोदी आतषबाजीने परिपूर्ण असा हा सोहळा पाहायला विसरू नका रविवार ३ एप्रिलला संध्याकाळी ७ वाजता स्टार प्रवाहवर.