आंतरराष्ट्रीय ढगफुटी तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांना भारत सरकारने बहाल केले पहिले पेटंट !
औरंगाबाद – आंतरराष्ट्रीय ढगफुटी तज्ज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, कृषी तंत्रज्ञान अभ्यासक प्रा किरणकुमार जोहरे यांनी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी डिझाईन केलेल्या हवामान केंद्राला (वेदर स्टेशन फाॅर फार्मस) ला भारत सरकारच्या कोलकाता येथील पेटंट कार्यालयातर्फे औद्योगिक विकासाच्या उपयोगासाठी (सर्टिफिकेट नंबर १०३६४७) नाविन्यपूर्ण वैयक्तिक पेटंट बहाल करण्यात आले आहे.
हवामान शास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी ४ आॅक्टोबर २०१० रोजी पुणे येथे ढगफुटी होण्याआधी ९० मिनिटात १८२ मिलीमिटर पाऊस होत झालेल्या ढगफुटी (फ्लॅशफ्लड) ची होण्याआधीच दुपारी आगाऊ सुचना देऊन हजारो नागरिकांचे प्राण वाचविले. गेली १५ वर्षे प्रा किरणकुमार जोहरे हे ‘अंदाज नव्हे माहिती!’ ह्या विनाअनुदानित व विनामोबदला राष्ट्रीय हवामान अलर्ट व हवामान माहिती सेवेचे प्रणेते आहेत. आत्मनिर्भर भारत अभियानासाठी निवडलेल्या २० व्यक्तींमध्ये जोहरे हे महाराष्ट्रातील एकमेव व्यक्ती आहेत.
नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या वरीष्ठ महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक विभागात ते प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या सरचिटणीस निलिमाताई पवार, अध्यक्ष डॉ तुषार शेवाळे, चिटणीस डॉ सुनील ढिकले, सभापती माणिकराव बोरस्ते, उपसभापती राघोनाना आहिरे, डॉ प्रशांत देवरे व संचालक मंडळ, शिक्षणाधिकारी डॉ डी डी काजळे, सटाणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर डी पाटील, रजिस्ट्रार दिनेश कानडे, इलेक्ट्रॉनिक्स विभाग प्रमुख डॉ पी ई पाटील, आयक्यूएसी समन्वयक डॉ एस एस सौंदानकर आदींनी त्यांच्या या यशाबद्दल अभिनंदन केले.