मुंबई – झी मराठीवरील किचन कल्लाकार हा कार्यक्रम प्रेक्षकांच पुरेपूर मनोरंजन करत आला आहे.आतापर्यंत अनेक कलाकारांनी तसंच विविध क्षेत्रातील व्यक्तींनी या किचनमध्ये कल्ला केला आहे. नुकताच या कार्यक्रमात राजकीय धुरळा पाहायला मिळाला. आता किचन कल्लाकारच्या आगामी भागात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप नेते किरीट सोमय्या हे प्रेक्षकांच्या भेटीस येतील. त्याची झलक झी मराठीच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमधून प्रेक्षकांना पाहायला मिळाली.
यामध्ये व्हिडीओमध्ये एकनाथ खडसे आणि किरीट सोमय्या यांनी किचन कल्लाकारच्या मंचावर हजेरी लावल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे राजकीय मैदानात नेहमी एकमेकांवर आरोप करणारे हे चेहरे या मंचावर मात्र एकमेकांची कडकडून गळाभेट घेताना दिसले. राजकीय मैदानातील हे स्पर्धक या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र आले व यानिमित्त त्यांनी किचनमध्ये जोरदार कल्ला केला. राजकारणात कल्ला करणारे हे नेते किचनमध्ये पदार्थ बनवून महाराजांना खुश करू शकतील का हे पाहणे औस्त्युक्याचे ठरेल.
झी मराठीवर किचन कल्लाकार या कार्यक्रमात १३ एप्रिल बुधवारी रात्री ९.३० वाजता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांची किचन मधील जुगलबंदी रसिकप्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.