अमेरिकेतील दिग्गज इलेक्ट्रिक कार निर्माता टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटर कंपनी विकत घेतली आहे. १४ एप्रिल रोजी, एलॉन मस्कने ट्विटरला प्रति शेअर $ ५४.२० मध्ये विकत घेण्याची ऑफर दिली. या दराने, ट्विटरची किंमत $ ४१ अब्ज होत आहे. ट्विटरमध्ये 9.2 टक्के हिस्सेदारी खरेदी केल्यानंतर मस्कची ऑफर आली. मस्कच्या या ऑफरला अनेक ट्विटर शेअरहोल्डर्सनी विरोध केला होता. मस्कने नंतर खरेदीची रक्कम $४६.५ अब्ज इतकी वाढवली. एलॉन मस्क मागील काही काळापासून सतत ट्विटरचे शेअर्स खरेदी करत होते.
मुक्तपणे बोलणं, व्यक्त होणं हा लोकशाहीचा कणा आहे. ट्विटर हे असं डिजीटल माध्यम आहे ज्यावर भविष्यात मानवी जीवनावर परिणाम करु शकणाऱ्या गोष्टींबद्दल चर्चा होतात, असं मस्क यांनी म्हटलंय. “मला ट्विटरमध्ये आणखी नवीन फिचर्स आणायचे आहेत. लोकांचा या माध्यमावरील विश्वास वाढवण्यासाठी हे एक ओपन सोर्स अल्गोरिदम असणारं माध्यम करायचं आहे, स्पॅम बोट्स, सर्व व्यक्तींचं ऑथेंटिकेशन अशी बरीच काम डोक्यात आहेत. ट्विटरमध्ये फार क्षमता आहे. मी कंपनीसोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे. तसेच या माध्यमावर असणाऱ्यांसाठी नवीन दारं उघडली जाणार आहेत,” असं म्हणत मस्क यांनी भविष्यातील बदलांचे संकेत दिले आहेत.
एलॉन मस्क आता ट्विटरचे नवे मालक झाले आहेत. या संदर्भातील पूर्ण प्रक्रिया या वर्षात पूर्ण होईल. दरम्यान, सध्याचे सीईओ पराग अग्रवाल हे ट्विटरचे सीईओ म्हणून कायम राहतील की यात काही बदल केले जातील हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.