‘छावा-दि ग्रेट वॉरियर’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

0

मुंबई – मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती, संभाजी महाराज ह्यांच्या जयंती दिनी त्यांच्यावरील ‘छावा-दि ग्रेट वॉरियर’ ह्या चित्रपटाचा मुहूर्त झाला. डॉ. जयसिंगराव पवार लिखीत ‘छत्रपती संभाजी महाराज’ ग्रंथावर आधारित ‘छावा-दि ग्रेट वॉरियर’ चित्रपट असणार आहे. मल्हार पिक्चर्स प्रस्तुत, वैभव भोर आणि सनी रजानी निर्मित आणि राहुल जनार्दन जाधव दिग्दर्शित ‘छावा-दि ग्रेट वॉरियर’ संभाजी महाराजांच्या साहस आणि शौर्याची गाथा असेल.

‘छावा-दि ग्रेट वॉरियर’ सिनेमाचे दिग्दर्शक राहुल जनार्दन जाधव म्हणतात, ” शंभूराजे खरे ‘युथ आयकॉन’ आहेत. वयाच्या नवव्या वर्षांपासून राजकारणाचे धडे घेत असलेल्या स्वराज्याच्या पहिल्या युवराजांची फक्त युद्धकौशल्यावरच नाही तर चौदा भाषांवर आणि साहित्यावरदेखील मजबूत पकड होती. कल्पनेतल्या सुपरहिरो पेक्षा वास्तवातील सुपरहिरोवर सिनेमा बनवण्याची इच्छा होती. जी छावा-दि ग्रेट वॉरियर मधून पूर्ण होतेय.”

थोर इतिहासकार आणि कादंबरीकार लेखक डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, “असिम त्याग, पराकोटीची सहनशीलता, जाज्वल्य देशाभिमान आणि हौतात्म्याचे प्रतिक म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. विविध विद्या, शास्त्रे आणि पुराणे यांचा गाढा व्यासंग असलेला हा मराठ्यांचा छावा.  आजच्या पिढीला शंभुराज्यांच्या कर्त्तृत्वाची प्रचिती ह्या सिनेमातून येईल, असा मला विश्वास आहे.”

चित्रपटाचे निर्माते सनी रजानी म्हणतात, “जगातील पहिल्या बुलेटप्रूफ जॅकेटचा शोध संभाजी महाराजांनी लावला, सर्वात पहिली जैविक लढाई शंभूराजांनी बुद्धीने लढली. मोगलांना वाकवणारा, इंग्रजांना नाचवणारा, पोर्तुगीजांना झुकवणारा, सीद्दीला दर्यात बुडवणारा, एकाही लढाईत न हरलेला शेवटच्या श्वासापर्यंत अजेय ठरलेला शंभुराजांसारखा छत्रपती स्वराज्याला लाभला हे आपलं भाग्य. आणि त्यांच्या संघर्षमयी आणि गतीमान आयुष्यावर चित्रपट निर्मिती करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. ह्यासाठी आम्ही खूप खुश आहोत.”

संभाजी महाराजांच्या तेजस्वी कारकिर्दीवरील मल्हार पिक्चर्स प्रस्तुत छावा-दि ग्रेट वॉरियर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!