सध्या दिवसेंदिवस तापामानाचा पारा वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. २०२२ मध्ये जगातल्या सर्वोच्च तापमानाची नोंद पाकिस्तानात झाली आहे. पाकिस्तानच्या जेकोबाबाद शहरात कालचं कमाल तापमान हे ५१ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं आहे.याआधी ऑस्ट्रेलियात ५०.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर आता पाकिस्तानात सर्वोच्च तापमानाची नोंद झाली आहे.
पाकिस्तान सह भारतात देखील अनेक ठिकाणी तापमान वाढले आहे. पश्चिम राजस्थानात तापमान ४८ अंशांच्या पार गेले आहे. काल पश्चिम राजस्थानात एका ठिकाणावरील कमाल तापमान ४८.२ अंशांवर गेले आहे. १३ मे रोजी पिलानी येथे ४७.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे कमाल तापमानाची तीव्रता वाढली आहे. यामुळे नागिरकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
अनेक राज्यात तापमानाचा पारा हा ४० अंशाच्या पुढे गेला आहे. वातावरण सातत्याने बदलत आहे, कारण अरबी समुद्र आणि हिंदी महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान वाढत आहे. वातावरणात आर्द्रता वाढत असल्यामुळे पावसाचे ढग जास्त वेळ आर्द्रता रोखू शकत नाहीत. कमी वेळात पाऊस होतो. याचा परिणाम म्हणजे दुष्काळ पडत असून उष्णतेच्या लाटांमध्ये वाढ होत आहे.
महाराष्ट्र राज्यातही बहुतांश जिल्ह्यात ४० ते ४५ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं आहे. एका बाजुला उष्णतेमुळे नागरिक हैराण होत असतानाच दुसरीकडे शेतकऱ्यांच्या पिकांना या वाढत्या तापमानाचा मोठा फटका बसत असल्याचे चित्र दिसत आहे.