ब्रिस्बेन ,ऑस्ट्रेलिया येथे ग्रंथ तुमच्या दारी योजनेतून २१ ग्रंथ पेट्या रवाना
ग्रंथ तुमच्या दारी ची विक्रमी घोडदौड : २ कोटी ५० लाख रुपयांची ग्रंथ संपदा
नाशिक – ब्रिस्बेन येथील मराठी साहित्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या वाचकांना पुस्तके उपलब्ध व्हावीत म्हणून ब्रिस्बेन ऑस्ट्रेलिया येथे वास्तव्यास असलेले पण मूळचे भारतीय असलेले श्रुती – तुषार काळवीट हे वाचनप्रेमी दाम्पत्य मागच्याच महिन्यात कुसुमाग्रज स्मारक नाशिक येथे ग्रंथ तुमच्या दारी योजनेचे प्रवर्तक विनायक रानडे यांची भेट घेण्यासाठी आले होते , त्यांचा मूळ उद्देश ग्रंथ तुमच्या दारी योजना समजून घ्यावी असा होता , भेटी दरम्यान त्यांना ग्रंथ तुमच्या दारी योजना खूपच भावली , त्यांनी त्यातील सर्व बारकावे आणि वाचनानंदासाठी किती उत्तमोत्तम पुस्तके उपलब्ध केली जातात हे समजून घेतले , त्यांनी पुढाकार घेतला आणि बघता बघता ब्रिस्बेन येथील १६ वाचक कुटूंबानी देणगी रूपाने आर्थिक पाठबळ देऊन सक्रिय सहभाग नोंदवला त्यामुळे श्रुती काळवीट ,समन्वयक ब्रिस्बेन यांच्या पुढाकाराने २१ ग्रंथ पेट्या ब्रिस्बेन ऑस्ट्रेलिया येथे रवाना होत आहे.
तसेच अंजली घुर्ये यांच्या ओ झेड किराणा या उद्योग समूहाद्वारे ग्रंथ पेट्या ब्रिस्बेन येथे त्यांच्या कंटेनर मधून नेण्यासाठी सहकार्य केल्याने वायूमार्गाने ग्रंथ पेट्या पाठवण्याच्या खर्चात बचत होणार असल्याने त्यांचे हे योगदान लाख मोलाचे आहे
जगभरात गेली १३ वर्षे सतत विस्तारत असलेल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ग्रंथ तुमच्या दारी या दर्जेदार मराठी ग्रंथसंपदा वाचनासाठी उपलब्ध करून देणाऱ्या वाचकप्रिय योजनेमुळे अडीच कोटींपेक्षा जास्त रुपयांची पुस्तके वाचनासाठी भारत आणि भारताबाहेर १५ देशात फिरत्या ग्रंथ पेट्यांच्या स्वरूपात आहेत
२१ ग्रंथ पेट्यांनी ब्रिस्बेन येथे ग्रंथ तुमच्या दारी योजनेचा शुभारंभ होत आहे
एका ग्रंथ पेटीत २५ पुस्तक असून प्रत्येक पेटीतील पुस्तक वेगळी असतात , विविध भागात या पेट्या वाचक कुटुंबाला तीन महिन्यासाठी उपलब्ध होतात. दर ३ महिन्यांनी पेट्या परस्परांच्या मध्ये बदलत्या ठेवल्यामुळे सर्वाना मोठ्या प्रमाणात दर्जेदार मराठी ग्रंथसंपदा वाचनासाठी उपलब्ध होत राहाते भविष्यात जश्या ग्रंथ पेट्या वाढत जातात तेवढी विविध प्रकारची जास्तीत जास्त पुस्तक आपल्या वाचकांना उपलब्ध होतील असं हि विनायक रानडे यांनी सांगितले.
ग्रंथ तुमच्या दारी ची विक्रमी घोडदौड : २ कोटी ५० लाख रुपयांची ग्रंथ संपदा
महाराष्ट्र , गोवा , गुजराथ , दिल्ली , सिल्व्हास, तामिळनाडू , कर्नाटक तसेच भारताबाहेर दुबई , नेदरलँड , टोकियो , अटलांटा , स्वित्झरलॅन्ड , ऑस्ट्रेलिया , फिनलँड , वॉशिंग्टन DC , मॉरिशस , ओमान , मस्कत , सॅनफ्रान्सिस्को , बे एरिया , लंडन , श्रीलंका , ब्रिस्बेन . . . .
वाचन संस्कृतीच्या समृद्धीसाठी प्रत्येकाने त्याच्या वाढदिवसानिमित्त पुस्तक खरेदीसाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठानला यथा योग्य देणगी द्यावी या आवाहनाला उस्फुर्त तसेच उदंड प्रतिसाद मिळाला . वाढदिवस , एकसष्ठी , पंच्याहत्तरी , सहस्त्र चंद्र दर्शन तसेच दिवंगत आप्तेष्टांच्या स्मरणार्थ अशा अनेक प्रसंगानुरूप मिळालेल्या भारतात ८० जी अंतर्गत आयकरात सूट असलेल्या देणग्यांमुळे असंख्य मराठी वाचकांना त्यांच्या निवासी भागात , कार्यालयात , दवाखान्यात अशा त्यांच्या जवळपासच्या भागात वाचनासाठी विनामोबदला विनासायास उपलब्ध होत आहेत .
जगभरात आज मराठी माणूस नाही अशी भूमी नाही म्हणजेच ग्रंथ तुमच्या दारी योजनेच्या भरारीला आता आकाशाला गवसणी घालण्यास कोणतीच बंधने नाहीत, जिथे म्हणून मराठी शब्द ,मराठी भाषा आहे ,मराठी माणूस आहे तिथे तिथे आमची योजना जावी अशी आमची इछा आहे.असं विनायक रानडे यांनी सांगितले