मुंबई –स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेत सध्या अरुंधतीचा स्वप्नपूर्तीच्या दिशेने प्रवास सुरु आहे. गाण्यावर अरुंधतीचं विशेष प्रेम आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना तिची ही आवड मागे पडली. मात्र आता अरुंधतीने आपलं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याचा निश्चय केलाय. मालिकेत अरुंधतीचं दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात अरुंधतीला आशुतोषचीही साथ मिळाली आहे.
‘सोबतीस हलके, सावलीस ऊन…
भोवती तशी ही, मोरपीस खूण…
दोन काठ अपुले, ऐल आणि पैल,
ऐन सांजवेळी, बंध होई सैल…
बंधनाविना रे ही, गुंतणारी वीण,
हा प्रवास आता, तुझ्यावीण कठीण…
वादळात कोणत्याही, हाक दे कधीही,
हात देत हाती, मी तिथे असेन…’
असे गाण्याचे शब्द असून श्रीपाद जोशींनी हे गाणं लिहिलं आहे. तर मंदार आपटे आणि विद्या करलगिकर यांनी हे गाणं गायलं आहे. निलेश मोहरीरने हे गाणं संगीतबद्ध केलं असून या गाण्याच्या विशेष भागातही तो झळकला आहे. खास बात म्हणजे या गाण्याला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत असून या गाण्याला एकत्रितपणे १ मिलियन पेक्षा जास्त व्हूज मिळाले आहेत.तेव्हा अरुंधतीच्या स्वप्नांचा हा प्रवास पाहायला विसरु नका सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वाजता स्टार प्रवाहवर.