Nashik : कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ,स्वॅब चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याचे पालकमंत्री छगन भुजबळांच्या सूचना 

लसीकरण १०० टक्के पूर्ण होण्यासाठीचे करावे नियोजन 

0

नाशिक – जिल्ह्यात काही प्रमाणात कोरोनाची रुग्णसंख्या वाढली असल्याने स्वॅब चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात यावे. त्याचप्रमाणे १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात यावे, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थितीबाबत आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, महानगरपालिका आयुक्त रमेश पवार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसिकर, महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, डॉ. कैलास भोये आदी उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, आजपर्यंत जिल्ह्यात एकूण ७१ सक्रीय रुग्ण असून ते सर्व रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. कोरोनाचा पहिला डोस घेण्याऱ्यांचे प्रमाण 89.5 टक्के, दुसरा डोस  ७५.२४ टक्के नागरिकांनी घेतला असून बुस्टर डोस आतापर्यंत एक लाख ४३ हजार ८९० नागरिकांनी घेतला आहे. तसेच कोमॉर्बिड नागरिकांना देखील बुस्टर डोस देण्याबाबत नियोजन करून रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यात यावेत. जिल्ह्यात ७८७ मेट्रीक टन ऑक्सिजन क्षमता असून त्यापैकी ३४६ मेट्रीक टन ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे. कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेवून आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन व औषधसाठा तयार ठेवावा, असेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

सोमवारपासून सुरू होणाऱ्या शाळांमध्ये पल्स ऑक्सिमीटर व मानवी तापमापक यंत्राची व्यवस्था करण्यात येवून मुलांच्या प्राथमिक आरोग्य चाचण्या करण्यावर भर द्यावा. शाळा व महाविद्यालयांमध्ये लसीकरणाच्या कॅम्पचे आयोजन करावे, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी बैठकीत सांगितले.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना ५० हजार सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी १६ हजार ३०० प्रस्ताव प्राप्त झाले त्यापैकी १२ हजार ५०५ प्रस्ताव मंजुर करण्यात आले असून ६२ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच एक हजार ८६२ प्रस्ताव नामंजूर झाले असून एक हजार ९३३ प्रस्तावांवर कार्यवाही सुरू आहे. हे प्रस्ताव प्रलंबित न ठेवता त्यावर लवकरात लवकर योग्यती कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देशही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.

मान्सूनकाळात सर्व यंत्रणांनी सतर्क राहून जबाबदारी पार पाडावी
मान्सून कालावधीचा विचार करता प्रत्येक रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्यात यावे. तसेच जलसंपदा व हवामान विभागाकडून सातत्याने पडणाऱ्या पावसाची माहिती घेण्यात यावी. त्या आधारे गंगापूर धरणातून एकदम पाण्याचा विसर्ग न करता पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात यावा. ज्यामुळे धरण क्षेत्रात व नदी लगतच्या भागात पूर परिस्थिती निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी. तसेच राष्ट्रीय  व राज्य आपत्ती प्रतिसाद पथकाशी संपर्क ठेवण्यात येवून आपत्ती निवारण अंतर्गत जिल्ह्यात उपलब्ध बोटस् व इतर आवश्यक साहित्याची तरतूद करण्यात यावी, अशा सूचनाही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सर्व यंत्रणांना दिल्या आहेत.

बैठकीच्या सुरूवातीला जिल्हाधिकारी गंगाथरन डी. तसेच जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि आरोग्य यंत्रणा प्रमुखंनी आपल्या कार्यक्षेत्रात केलेल्या कामाची माहिती बैठकीत सादर  केली.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.