शिवसेनेला धक्का ! : ६६ नगरसेवकांचा शिंदे गटाला पाठिंबा 

0

ठाणे – शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.ठाणे महापालिकेचा कार्यकाळ संपल्याने महानगरपालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली असली तरी गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेचे ६७ नगरसेवक निवडून आले आहेत.ठाणे महापालिकेत शिवसेनेचे ६७ नगरसेवक असून राष्ट्रवादी काँग्रेसकडे ६४, भाजपकडे २३, काँग्रेसकडे ३ आणि एमआयएमकडे २ नगरसेवक आहेत.त्यातील शिवसेनेचे ६६ नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने  माजी महापौर नरेश मस्के यांचा देखील समावेश आहे.या माजी नगरसेवकांनी बुधवारी रात्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या नंदनवन बंगल्यावर जाऊन भेट घेतली व शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला आहे.

६७ नगरसेवकांपैकी खासदार राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे या मात्र शिवसेनेतच आहेत. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणे जिल्ह्यावर मजबूत पकड आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्ह्याची सूत्रे आली होती. ठाणे महापालिकेत मागील काही दशकांपासून शिवसेनेची सत्ता आहे.या माजी नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केल्यामुळे ठाण्यात येणाऱ्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईतही  शिवसेनेत खिंडार पडण्यास सुरवात झाली आहे. नाराज शिवसैनिक, शाखाप्रमुखांना कसे थांबविणार, असा प्रश्न सध्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. अशातच आता शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच हादरे बसू लागले आहेत. काल (बुधवारी) मागाठाणे विभागातील दोन शाखाप्रमुखांनी पक्षाच्या पदांचा राजीनामा दिला आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.