
नाशिक- नाशिक जिल्ह्यातून इतर जिल्हयामध्ये तसेच राज्यभर व परराज्यात जाण्यासाठी दळणवळण वाढावेत यासाठी खा. गोडसे सतत प्रयत्नशील असतात. याचाच एक भाग म्हणून आज खा. गोडसे यांनी केंद्रीय दळणवळण व वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांची दिल्ली येथील मंत्रालयात भेट घेतली. सुरत – चेन्नई या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती द्यावी असे साकडे यावेळी खा. गोडसे यांनी नामदार गडकरी यांना घातले. दळणवळण, व्यापार आणि उद्योग वाढीसाठी सूरत – चेन्नई राष्ट्रीय महामार्ग लवकरात लवकर होणे अत्यंत गरजेचे असल्याचे यावेळी गोडसे यांनी नितीनजी गडकरी यांच्याशी बोलताना स्पष्ट केले.
सूरत – चेन्नई राष्ट्रीय महामार्ग गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू या चार राज्यांमधून जाणार आहे. सूरत – चेन्नई या महामार्गाची घोषणा काही वर्षांपूर्वी झालेली असून महामार्गाच्या कामाचे सर्वेक्षणही पूर्ण झालेले आहे. गेल्या काही महिन्यांपासून जमीन अधिग्रहणाची प्रक्रियाही सुरू झालेली आहे. सूरत – चेन्नई महामार्गामुळे नाशिक येथून अवघ्या पावणेदोन तासात सूरत येथे तर अवघ्या अकरा ते बारा तासात चेन्नई येथे नाशिककरांना पोहोचणे शक्य होणार आहे. यामुळे सदर महामार्गाचे काम लवकरात लवकर व्हावे यासाठी नाशिककर आग्रही आहेत .
नाशिककरांची आणि जिल्हावासियांची मागणी न्यायिक असल्याने सूरत – चेन्नई महामार्गाच्या प्रशासकीय प्रक्रियेकडे खा. हेमंत गोडसे यांचे सतत बारकाईने लक्ष असते. यामुळे आज खा .गोडसे यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली . सूरत – चेन्नई महामार्ग झाल्यास नाशिकच्या व्यापार आणि उद्योगाला मोठी चालना मिळणार असून यामुळे बेरोजगारांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे . राज्याराज्यातील दळणवळण वाढणार असून याचा फायदा शेती माल विक्रीसाठी शेतक-यांनाही मोठया प्रमाणावर होणार आहे . यामुळे सूरत – चेन्नई हा राष्ट्रीय महामार्ग लवकरात लवकर होणे गरजेचे असल्याचे गोडसे यांनी ना. गडकरी यांच्या लक्षात आणून देत या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती द्यावी असे साकडे घातले .


