मुंबई – मराठी मनोरंजन विश्वाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे.मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे तीन दशकांहून अधिक काळ मनोरंजन करणारे मराठीतील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन झालं आहे. हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं निधन झाल्याचं सांगण्यात येत आहे. ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप पटवर्धन यांचं हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे. ते मुंबईतील गिरगावात वास्तव्यास होते. बरेच दिवस ते पडद्यापासून दूर होते.प्रदीप पटवर्धन हे मराठी सिनेसृष्टीतील एक नावाजलेले अभिनेते होते. त्यांनी अनेक मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून प्रेक्षकांनाच्या मनावर आपला ठसा उमठवला आहे. खलनायक सो किंवा विनोदवीर आपली प्रत्येक भूमिका त्यांनी अगदी उत्तम पार पाडली आहे. त्यांच्या अशा अचानक जाण्याने मनोरंजन सृष्टीसह सर्वानांच धक्का बसला आहे.
‘मोरुची मावशी’ हे त्यांचं रंगमंचावरील नाटक तुफान लोकप्रिय ठरलं होतं. या नाटकाने त्यांना एक खास ओळख मिळवून दिली होती. चित्रपटांबाबत सांगायचं तर, प्रदीप पटवर्धन यांनी नवरा माझा नवसाचा, नवरा माझा भवरा, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, भुताळलेला अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यापैकी ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटामध्ये त्यांना खास प्रसिद्धी मिळाली होती. यामध्ये त्यांनी विनोदी खलनायकाची भूमिका साकारली होती.
त्यांच्या जाण्याने ज्याप्रमाणे मनोरंजन विश्वाला धक्का बसला आहे, त्याचप्रमाणे त्यांचे चाहतेही शोकाकुल झाले आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.