
नाशिक – कलानंद कथक नृत्य संस्थे तर्फे गुरुवार २५ ऑगस्ट, सायं.५:३० वाजता, कालिदास कलामंदिर येथे गुरुपौर्णिमा नृत्य महोत्सव साजरा होणार आहे. दोने वर्षांच्या विश्रांती नंतर कलानंद आपल्या नवोदित व ज्येष्ठ विद्यार्थ्यांचा कार्यक्रम करणार आहे. या वर्षाची सुरुवातच कथक नृत्यातील दोन महान गुरूंच्या निर्वाणाने झाली. कथकसम्राट पं. बिरजू महाराज व गुरु पं. मुन्नालालजी शुक्ला या दोघांच्या स्मृतींना समर्पित असा कार्यक्रम होणार आहे.
नृत्याचा विषय आहे ‘ऋतुचक्र’. ऋतुवर्णना बरोबर प्रत्येक ऋतु मध्ये येणारे सण-प्रसंग-आनंदोत्सव यांचा नृत्याविष्कार प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या कार्यक्रमा बरोबर ताल-लयीची मेजवानी देणारा ‘फ्युजन’ हा प्रयोग सादर होणार आहे. पदन्यासा बरोबर सहवादन व गायन यांचा अनुभव प्रेक्षक घेतील. कार्यक्रमाचे नृत्यसंयोजन डॉ. सुमुखी अथणी यांचे असून संगतकार श्री. पुष्कराज भागवत, श्री. व्यंकटेश तांबे व श्री. प्रतीक पंडीत आणि फ्युजन साठी श्री. अनिरुद्ध भूधर, श्री. कुणाल काळे आणि श्री. प्रफुल्ल पवार आहेत. निवेदन सौ. सुनेत्रा मांडवगणे यांचे आहे.
प्रमुख अतिथी म्हणून माननीय लिना बनसोड, C.E.O. नाशिक जि.प. उपस्थित राहणार आहेत. सर्व नाशिक्करांसाठी हा कार्यक्रम खुला असून सर्वांना संचालिका संजीवनी कुलकर्णी यांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन केले आहे.



