मुंबईत दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार ‘वंदे मातरम्’ची मैफल

परागजी अळवणी, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, अभिनेते सचिन खेडेकर, रणजीतजी सावरकर ,डॉ. सुधीर निरगुडकर या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती   

0

‘एज्युकल स्पोर्ट्स फाउंडेशन’तर्फे आयोजन…

मुंबई ,२५ ऑगस्ट २०२२- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘शब्दमल्हार प्रकाशन’ निर्मीत ‘वंदे मातरम्’ या अनोख्या मैफलीचे आयोजन मुंबईतील विलेपार्लेच्या ‘एज्युकल स्पोर्ट्स फाउंडेशन’च्यावतीने करण्यात आले असून रविवार, दिनांक २८ ऑगस्ट २०२२ या दिवशी सकाळी अकरा वाजता दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात ही मैफल होणार आहे.

या मैफलीसाठी परागजी अळवणी, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, ख्यातनाम अभिनेते सचिन खेडेकर, रणजीतजी सावरकर आणि डॉ. सुधीर निरगुडकर या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सध्या या मैफलीची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा असून अनेकांनी या मैफलीचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. त्यामुळेच ‘एज्युकल स्पोर्ट्स फाउंडेशन’ने आपल्या भागातील रसिकांकरिता ही मैफल आयोजित करण्यात पुढाकार घेतला आहे.

बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेल्या संपूर्ण ‘वंदे मातरम्’ या पाच कडव्यांच्या राष्ट्रगानाचे आज फक्त एकच कडवे म्हटले जाते. या मैफलीत मात्र पाचही कडवी गायली जातात. या गीताला नव्याने सांगीतिक साज चढविण्यात आला असून अमोघ वाणीचे वरदान लाभलेल्या स्वानंद बेदरकर यांच्या ओजस्वी निरूपणातून हे गीत, त्या गीताची निर्मिती, त्याचे काव्यसौंदर्य, त्याचा इतिहास आणि स्वातंत्र्यलढ्यात असलेली ‘वंदे मातरम्’ची भूमिका उलगडत जाते.

गायक ज्ञानेश्वर कासार यांची संगीत संकल्पना लाभलेल्या या मैफलीत रागिणी कामतीकर आणि आशिष रानडे यांच्याकडून अनोख्या चालीत हे गीत ऐकायला मिळणार आहे. अनिल धुमाळ (कीबोर्ड), अनिल दैठणकर (व्हायोलिन), उमेश खैरनार (ऑक्टोपॅड) ओंकार अपस्तंभ (तबला) यांची साथसंगत लाभलेल्या या कार्यक्रमात विनोद राठोड यांची प्रकाशयोजना आहे.

एकाच गीतावर आधारित असलेला हा संपूर्ण कार्यक्रम आजवरच्या कार्यक्रमांपैकी अनोखा म्हटला जातो. एकाच वेळी शब्द-स्वर आणि वाद्य यांची मैफल रंगत जाते आणि रसिक एका तेजस्वी इतिहासाला आत्मसात करून बाहेर पडतो; असा या कार्यक्रमाचा अनुभव अनेकांनी व्यक्त केला आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!