मुसळधार पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील बंधारा फुटला :भातपिकांचे मोठे नुकसान
पंचनामे तात्काळ करण्याच्या खा. गोडसे यांच्या प्रशासनाला सूचना
घोटी,१ सप्टेंबर २०२२- बुधवारी रात्री इगतपुरी तालुक्यातील टाकेद, फळविहिरवाडी परिसरात मुसळधार पाऊस पडला. अचानक कोसळलेल्या पावसामुळे जनजीवन अक्षरक्षः विस्कळीत झाले.मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे टाकेद येथील दोन टपऱ्या वाहून गेल्या तर फळविहिरवाडी येथील पन्नास वर्ष जुना बंधारा फुटून सुमारे शंभर व्हेक्टर भात पिकांचे नुकसान झाले.या बरोबरच पंचक्रोशीतील शेतीचे मोठया प्रमाणावर नुकसान झालेल्या घटनेची गंभीर दखल घेऊन आज सकाळी खासदार गोडसे यांनी टाकेद,फळविहिरवाडी शिवारात धाव घेत शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानी पाहणी केली.यावेळी खा.गोडसे यांनी लगेचच सर्कल ,तलाठी आणि लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याना बोलून घेत शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळण्यासाठी येत्या दोन-तीन दिवसात नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यामध्ये सर्वत्र पाऊस पडत आहे.मागील आठवड्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यानंतर गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुन्हा एकदा जोर धरला आहे .अशातच काल रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास वंजारवाडी शिवारात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला.रात्री अचानक कोसळलेल्या पावसामुळे टाकेद, फळविहिरवाडी आणि परिसरातील नागरिकांची एकच पळापळ झाली.अशातच विजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. कडाक्याच्या पावसामुळे टाकेद,फळविहिरवाडी आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
आज सकाळी खासदार गोडसे यांना वरील घटनेची माहिती मिळताच त्यांनी नुकसानीची गंभीर दखल घेत लगेचच टाकेद,फळविहिरवाडी आणिअडसरे खुर्द शिवारात धाव घेतली. गावांमधील घरांचे झालेले नुकसान,व्यवसायिकांच्या वाहून गेलेल्या टपऱ्या आणि फळविहिरवाडी येथील पाझर तळाव फुटल्याने भातपिकांचे झालेले नुकसान पाहून खा.गोडसे यांनी लगेचच सर्कल, तलाठी यांना घटनास्थळावर बोलावून घेतले. शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यासाठी येत्या दोन-तीन दिवसात नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी रघुनाथ तोकडे,टाकेदचे सरपंच रतन बांबळे,सोनुशीचे सरपंच दिलीप बुरकुले,फळविहिरवाडीचे सरपंच साबळे, मायझराचे सरपंच साहेबराव बांबळे,शिवाजी गाढवे, संपतराव काळे आदी मान्यंवर उपस्थित होते.