योग्य आर्थिक नियोजन ही सफल व्यवसायाचे गुरुकिल्ली- अनिल लांबा
क्रेडाई नाशिक मेट्रो चा प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
नाशिक,७ सप्टेंबर २०२२ – योग्य आर्थिक नियोजन ही सफल व्यवसायाचे गुरुकिल्ली असून आदर्श पद्धतीने नफा कमविणारा व्यावसायिक त्याच्या स्वतःसोबतच त्याच्यासोबत काम करणाऱ्या अनेकांच्या प्रगतीस जबाबदार असतो असे प्रतिपादन प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट व रोमांसिंग द बॅलन्स शीट या बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक अनिल लांबा यांनी केले. ते क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे आयोजित सदस्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये “सफल व्यवसायासाठी कॉस्ट मॅनेजमेंट” या विषयावर मार्गदर्शन करत होते.
अनिल लांबा पुढे म्हणाले की, व्यवसाय उभारतांना भांडवलाची उभारणी कशाप्रकारे केली जाते यावर व्यवसायाचा नफा अवलंबून असतो. किती विक्री झाली यापेक्षा कॅश फ्लो चे योग्य व्यवस्थापन आवश्यक असल्याचे सांगून नफ्या पेक्षा रिटर्न ऑन इंव्हस्टमेंट वर लक्ष केंद्रित करावे असे मतही त्यांनी व्यक्त केले.
प्रशिक्षण कार्यक्रमा बाबत अधिक माहिती देताना क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन म्हणाले की, क्रेडाई राष्ट्रीय उपाध्यक्ष अनंत राजेगावकर यांच्या मार्गदर्शना खाली आणि सर्व सदस्यांच्या व्यावसायिक प्रगतीसाठी महत्त्वाच्या अश्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे क्रेडाई तर्फे नियमितरित्या आयोजन करण्यात येते. या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये व्यवसाय संबंधित विविध पैलूंवर सदस्यांना राष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध अशा तज्ञांकडून मार्गदर्शन देण्यात येते. अशा प्रकारच्या प्रशिक्षणाचे हे पाचवे सत्र असून या वेळेच्या सत्रामध्ये आर्थिक व कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले. रिअल इस्टेट क्षेत्राचा भारताच्या जीडीपीमध्ये मोलाचा वाटा असून क्रेडाई सदस्य सर्वसामान्यांच्या घरकुलांचे स्वप्न पूर्ण करण्यात मोलाचा वाटा बजावतात.
प्रशिक्षण कार्यक्रमाचे सह समन्वयक अनिल आहेर यांनी सांगितले की या प्रशिक्षण शिबिरात 200 हून अधिक क्रेडाई सदस्य नाशिक, नगर, धुळे , ओझर, पिंपळगाव, मालेगाव, पाचोरा, शिर्डी येथून सहभागी झाले होते.प्रशिक्षणाच्या दुसऱ्या सत्रात प्रख्यात कायदे तज्ञ ॲड एस के पांडे व ॲड संजय पाटील यांनी सभासदांना कायद्याच्या विविध तरतुदी बाबत मार्गदर्शन केले.
क्रेडाई महाराष्ट्राचे सचिव सुनील कोतवाल यांनी माहिती देताना सांगितले की क्रेडाई महाराष्ट्र तर्फे अशा प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन आगामी कालावधीत औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, नवी मुंबई येथे देखील होणार असून याचा फायदा सर्व सदस्यांना त्यांच्या व्यवसायात होणार आहे.
हॉटेल रॅडिसन ब्ल्यू मध्ये आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये क्रेडाई राष्ट्रीय चे उपाध्यक्ष अनंत राजेगावकर, उपाध्यक्ष कृणाल पाटील, माजी अध्यक्ष सुरेश पाटील, नेमीचंद पोतदार,किरण चव्हाण ,उमेश वानखेडे तसेच कमिटी सदस्य अतुल शिंदे,सुशील बागड ,अनंत ठाकरे,विजय चव्हाणके ,मनोज खिवसरा ,राजेश आहेर, नरेंद्र कुलकर्णी हे मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चिन्मय खेडेकर तर आभार अंजन भालोदिया यांनी मानले.