Nashik : गणेश विसर्जनासाठी मनपा प्रशासन सज्ज,सहा विभागात तयारी पूर्ण

0

नाशिक ८ सप्टेंबर २०२२ – गणेश विसर्जनासाठी महापालिका प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. सहा विभागात तयारीचा आढावा घेण्यात आला. कामकाजाची देखरेख,नियंत्रण आणि पर्यवेक्षण कार्यवाहीसाठी सहा अधिकारी यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांच्याकडे नवीन नाशिक, मुख्य लेखा परीक्षक बोधिकिरण सोनकांबळे पूर्व विभाग, उपायुक्त अर्चना तांबे सातपूर, उपायुक्त करुणा डहाळे पश्चिम, उपायुक्त डॉ दिलीप मेनकर नाशिक रोड आणि उपायुक्त विजयकुमार मुंढे यांच्याकडे पंचवटी विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून शहरातील नदीपात्राचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

गणेश मूर्तींचे नदीपात्रात विसर्जन न करता मनपाच्या गणेश विसर्जन स्थळांवर गणेश मूर्ती आणि निर्माल्य संकलित होत आहे. याकरिता मनपाची शहरातील सर्व सहा विभागात एकूण ७१ नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जन ठिकाणे आहेत. इथे मूर्ती आणि निर्माल्य संकलित केले जात आहे. मा. आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शहरातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांचे घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन नदीपात्रात करू नये. मनपाच्या मूर्ती संकलन केंद्रांवर त्यांच्या मूर्ती दान द्याव्यात तसेच निर्माल्यदेखील संकलन केंद्रांवर जमा करण्यात यावे.

अधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा

सातपूर विभागातील गणपती विसर्जन ठिकाणांची पाहणी आज उपायुक्त अर्चना तांबे यांनी केली आहे. विभागीय अधिकारी, बांधकाम आणि विद्युत विभागाचे अभियंता यावेळी उपस्थित होते. उपायुक्त करुणा डहाळे यांनी पश्चिम विभागात विसर्जन मार्गाची पाहणी करून सूचना केल्या. उपायुक्त डॉ. दिलीप मेनकर यांनी नाशिक रोड विभागातील दसक घाटची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला. पूर्व विभागाचे विभागीय अधिकारी नितीन नेर यांनीही आज कृत्रिम विसर्जन स्थळांची पाहणी केली आहे. अधिकाऱ्यांनी बैठका घेउन संबधीत विभागांना सूचना केल्या आहेत.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.