ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर 

0

मुंबई,२७ सप्टेंबर २०२२ –  हिंदी सिनेसृष्टीतील अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे.केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही घोषणा केली आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात आशा पारेख यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

आशा पारेख यांनी वयाच्या अवघ्या १० व्या वर्षांपासून चित्रपटात काम करायला सुरुवात केली होती. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत आशा पारेख यांनी ७५ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.भारताच्या  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आशा पारेख यांना पुरस्कार दिला जाणार आहे. आशा पारेख यांची या पुरस्कारासाठी निवड झाली हे अभिमानास्पद असल्याचं मत अनुराग ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. येत्या ३० सप्टेंबरला दिल्लीमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय करिअरची सुरुवात केली होती. त्यांनी बेबी आशा पारेख या नावाने आपलं करिअर सुरु केलं होतं. अवघ्या दहा वर्षांच्या असताना दिग्दर्शक बिमल रॉय यांनी त्यांना एका स्टेज शोमध्ये पाहिलं होतं. चिमुकल्या आशाला पाहून ते फारच प्रभावित झाले होते. त्यानंतर त्यांनी अभिनेत्रीला ‘माँ’ या चित्रपटात एक बालकलाकार म्हणून संधी दिली होती. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये बेबी आशा पारेख म्हणून काम केलं आहे.

त्यानंतर १९५९ मध्ये नासिर हुसैन दिग्दर्शित ‘दिल देके देखो’ या चित्रपटातून एक अभिनेत्री म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात त्यांच्यासोबत सुपरस्टार शम्मी कपूरदेखील होते. हा चित्रपट तुफान गाजला होता. या आपल्या पहिल्याच चित्रपटात आशा पारेख यांना मोठं स्टारडम मिळालं होतं. आशा पारेख यांना मनोरंजन क्षेत्रातील योगदानाबद्दल अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. १९९२ मध्ये भारत सरकारने त्यांना प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित केलं आहे. आशा पारेख १९९८ ते २००१ या काळात सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षाही होत्या.

आशा पारेख यांनी जब प्यार किसीसे होता है, तिसरी मंजिल, कटी पतंग, बहारों के सपने, फिर वही दिल लाया हूँ, कारवाँ, मंजिल-मंजिल,दो बदन अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्या एक उत्कृष्ट नृत्यांगनाही आहेत. आशा पारेख यांनी फक्त अभिनेत्रीच नव्हे तर एक दिग्दर्शिका आणि निर्मात्या म्हणूनही काम केलं आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.