उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचं निधन

0

नवी दिल्ली,१० ऑक्टोबर २०२२ – समाजवादी पार्टीचे संस्थपाक उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे आज सकाळी ८:१५ वाजता प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८२ वर्षाचे होते.गेल्या काही दिवसांपासून प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर दिल्लीतील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू होते.आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

२२ ऑगस्ट रोजी मुलायम सिंह यादव यांना रक्तदाबाचा त्रास सुरु झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून मुलायमसिंह यांची प्रकृती सातत्याने खालावत गेली आणि आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. उत्तर प्रदेशात त्यांना नेताजी या नावानं ओळखले जात असे. मुलायम सिंह यादव यंनी समाजवादी पार्टीची स्थापना केली होती. २०१९ मध्ये ते मैनपुरी लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. मुलायम सिंह यांच्या पत्नी साधना गुप्ता यांचं जुलै महिन्यात निधन झालं होतं. तर, पहिल्या पत्नी मालती देवी यांचं २००३ मध्ये निधन झालं होतं.

मुलायम सिंह यादव यांना यूरीन इन्फेक्शन झालं होतं. मागच्या रविवारी त्यांची ऑक्सिजन लेव्हलही कमी झाली होती. त्यामुळे त्यांना आयसीयू वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं. मेदांता रुग्णालयातील डॉक्टरांची टीम त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवून होती.

यादव कुटुंबीयही मुलायम सिंह यांची प्रकृती सुधारावी यासाठी प्रार्थना करत होते. गेल्या एक महिन्यापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. या दरम्यानच्या काळात वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी मुलायम सिंह यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांची थेट रुग्णालयात जाऊन भेटही घेतली होती. दरम्यान, आता त्यांच्या निधनाच्या वृत्तानं राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी दुःख व्यक्त केलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही व्यक्त केलं दुःख
मुलायम सिंह यांनी उत्तर प्रदेश आणि राष्ट्रीय राजकारणातही स्वतःला सिद्ध केलं होतं. आणीबाणीच्या काळात ते एक महत्त्वाचे सैनिक असल्यासारखे होते, असं नरेंद्र मोही यांनी म्हटलंय. संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाने भारताला अधिक बळकटी दिली, असंही मोदी म्हणाले.

राष्ट्रहितासाठी मुलायम सिंह यादव यांनी नेहमी संसदेत महत्त्वाचे मुद्दे मांडले असल्याचंही नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटलं. ट्वीट करुन मोदींनी मुलायम सिंह यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त केलंय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ नेते मुलायम सिंह यादव यांना श्रद्धांजली
‘देशाच्या राजकारण, समाजकारणातील एक धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले’, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजवादी पक्षाचे संस्थापक, उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.

‘मुलायमसिंह यांची राजकीय कारकीर्द संघर्षशील आणि वैशिष्ट्यपूर्ण राहीली आहे. पक्षाची स्थापना, संघटन बांधणी ते देशातील सर्वात मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांनी आपला ठसा उमटवला. देशाच्या राजकारणात त्यांनी धुरंधर आणि मुत्सद्दी नेतृत्व म्हणून ओळख निर्माण केली. त्यांचे देशाच्या समाजकारण, राजकारणाच्या वाटचालीतील योगदान सदैव स्मरणात राहील.’ असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

उत्तर प्रदेशच्या राजकारणातील एक मोठा अध्याय संपला – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

‘श्री मुलायमसिंह यादव हे देशाच्या आणि विशेषतः उत्तर प्रदेश राज्याच्या राजकारणातील एक धुरंधर नेते होते.  व्यापक जनसंपर्क व संघटन कौशल्यामुळे त्यांची राजकारणावरील पकड कायम राहिली. उत्तम संसदपटू असलेल्या मुलायमसिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री तसेच केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणून उत्तम काम केले होते. आपण उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सदस्य होण्यापूर्वी पासूनच आपला मुलायमसिंह यादव यांचेशी घनिष्ठ परिचय होता. सर्व पक्षातील लोकांशी त्यांचे अतिशय मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यांच्या निधनामुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणातील एक मोठा अध्याय संपला आहे. दिवंगत मुलायमसिंह यादव यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो व आपल्या शोकसंवेदना श्री अखिलेश यादव तसेच त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना कळवतो’’, असे राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी आपल्या संदेशामध्ये म्हटले आहे.

अनुभवी आणि लोकाभिमुख नेतृत्व हरपले -छगन भुजबळ

समाजवादी पार्टीचे जेष्ठ नेते मुलायम सिंह यांच्या निधनाचे वृत्त दुःखद असून देशाच्या राजकारणातील अनुभवी आणि लोकाभिमुख नेतृत्व हरपले असल्याच्या भावना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत.

आपल्या शोक संदेशात छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, मुलायम सिंह यादव म्हणजे मातीशी नाळ जोडलेला नेता. उत्तर प्रदेशच्या राजकारणात त्यांचा विशेष असा दरारा असायचा. नेताजी अशी ओळख असलेले मुलायम सिंह हे खऱ्या अर्थाने राजकारणाच्या आखाड्यातील कसलेले पैलवानच होते. शेतकऱ्यांसाठी आपला आवाज बुलंद ठेवानारे मुलायम सिंह यादव यांची लोकसभेतील भाषणे आजही पहिली की त्यांच्यातला संघर्षशील नेत्याचे दर्शन होते.

त्यांनी पुढे म्हटले आहे की, मुलायम सिंह यादव म्हणजे हेलिकॉप्टर मधून ज्या गावाच्या वरून प्रवास करतील त्या गावचे नाव सांगणारा माणूस, कार्यकर्त्यांना कसे बांधून ठेवावे याचे कसब त्यांच्यापाशी होते. जुने जाणते कार्यकर्त्यांशी देखील त्यांचा जिव्हाळा असायचा. अगदी तरुण वयापासून राजकारणात सक्रीय सहभाग घेतला होता. उत्तरप्रदेश चे तीन वेळा मुख्यमंत्री, केंद्रीय संरक्षण मंत्री, १० वेळा आमदार, ७ वेळा खासदार म्हणून ते विजयी झाली आहेत. त्यांच्या निधनामुळे भारतातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्राचे मोठे नुकसान  झाले आहे. मी व माझे कुटुंबीय नेताजी यांच्या कुटुंबियांच्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात सहभागी असून त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करतो असे छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

मुलायम सिंह यादव यांचा परिचय

मुलायम सिंह यादव यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९३९ रोजी उत्तर प्रदेशच्या इटावा जिल्ह्यातील सैफई गावात मूर्ति देवी आणि सुघर सिंह यांच्या शेतकरी कुटुंबात झाला. मुलायम सिंह हे रतन सिंह यांच्यापेक्षा लहान आहेत आणि त्यांच्या पाच भावंडांपैकी अभयराम सिंह, शिवपाल सिंह यादव, राम गोपाल सिंह यादव आणि कमला देवी यांच्यापेक्षा ते मोठे आहेत. ते ‘धरतीपुत्र’ म्हणून प्रसिद्ध आहेत.

मुलायम सिंह यादव हे समाजवादी पक्षाचे नेते आणि पक्षाचे संस्थापक आहेत. ४ ऑक्टोबर १९९२ रोजी त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत ते तीनदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीही होते. गेल्या काही वर्षांत देशात जेव्हा जेव्हा तिसऱ्या आघाडीची चर्चा होते तेव्हा मुलायमसिंह यादव यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात होते. पेशाने शिक्षक असलेल्या मुलायमसिंह यादव यांच्यासाठी शिक्षण क्षेत्रानेही राजकीय दरवाजे उघडले.

११९२ मध्ये त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. ५ डिसेंबर १९८९ ते २४ जानेवारी १९९१, ५ डिसेंबर ११९३ ते ३ जून १९९६ आणि २९ ऑगस्ट २००३ ते ११ मे २००७ या कालावधीत ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. याशिवाय ते केंद्र सरकारमध्ये संरक्षण मंत्रीही राहिले आहेत. मुलायम सिंह हे उत्तर प्रदेशातील यादव समाजाचे सर्वात मोठे नेते म्हणून ओळखले जातात.

मुलायम सिंह यांचा केंद्रीय राजकारणात प्रवेश १९९६ मध्ये झाला, जेव्हा काँग्रेस पक्षाचा पराभव करून संयुक्त आघाडीने सरकार स्थापन केले. एचडी देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील या सरकारमध्ये त्यांना संरक्षणमंत्री करण्यात आले, पण हे सरकारही फार काळ टिकले नाही आणि तीन वर्षांत भारताला दोन पंतप्रधान दिल्यानंतर ते सत्तेतून बाहेर पडले. भारतीय जनता पार्टी’ सोबतच्या त्यांच्या वैरावरून ते काँग्रेसच्या जवळ असतील असे वाटत होते, पण 1999 मध्ये काँग्रेसला पाठिंबा देण्याचे आश्वासन न देता सरकार स्थापन करण्यात अपयश आल्याने दोन्ही पक्षांमधील संबंध ताणले गेले. 2002 च्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाने ३९१ जागांवर आपले उमेदवार उभे केले, तर १९९६ च्या निवडणुकीत केवळ २८१ जागा लढवल्या होत्या.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!