विश्वास ग्रुपतर्फे शनिवारी पौलमी देशमुख यांचे गायन

0

नाशिक,२४ नोव्हेंबर  २०२२ – नव्या पिढीतील कलाकारांच्या अविष्काराला हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी ‘सूर विश्वास’ या अनोख्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार २६ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ६:३० वाजता पौलमी देशमुख यांचे गायन होणार आहे. त्यांना  सुजित काळे (संवादिनी) व अदिती गराडे (तबला) हे साथसंगत करणार आहेत तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. स्मिता मालपुरे या करणार आहेत.मैफिलीचे हे वीसावे पुष्प असून विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओच्या समन्वयक ऋचिता ठाकूर हे या उपक्रमाचे आयोजक असून संकल्पना विनायक रानडे यांची आहे.

विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. उदयोन्मुख कलावंताच्या प्रयोगशीलेचा अविष्कार रसिकांना दर महिन्याला अनुभवण्यास मिळत आहे.

पौलमी देशमुख यांच संगीताचे शिक्षण सौ.सुनेत्रा पंडित आणि पं. चंद्रकांत पारकर, मुंबई यांचेकडे झाले. बी. ए.  संस्कृत विषयात केले असून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात विशारद पदवी प्राप्त केली आहे. तसेच मुंबई विद्यापीठातून संगीत विषयात एम.ए. पदवी प्राप्त केली आहे व विद्यापीठात दुसरा क्रमांक मिळवला आहे.यांना पद्मविभुषण डॉ. प्रभा अत्रे यांच्याकडे ८ वर्षे, पं.डॉ. चंद्रशेखर रेळे यांच्याकडे २ वर्षे,पं. दिनकर पणशीकर यांच्याकडे २ वर्षे तालीम  प्राप्त आहे. तसेच गेली ११ वर्षे जयपूर घराण्याच्या  विदुषी  शाल्मली जोशी, तसेच  सर्व घराण्यांचा  तौलनिक अभ्यास असलेले  पं. सत्यशील देशपांडे यांचेकडे गेली 10 वर्षे पुढील शिक्षण सुरू आहे. सुहास बावडेकर यांच्याकडे  भावसंगीत तसेच  आवाज साधनेचे  शिक्षण गजल गायक जसविंदर सिंग यांचेकडे  आणि  पं. दिग्विजय वैद्य यांच्याकडे घेतले आहे.

भारतातील अनेक प्रतिष्ठित मैफीलीत पौलमी गायन करत असतात. नादब्रम्ह संगीत सभा बोरीवली, महाराष्ट्र शासनाचा नवरत्न पुरस्कार वितरण सोहळा, सुर हिंडोल-दुबई, आर्ट सर्कल-रत्नागिरी, देवल क्लब-कोल्हापुर, उस्ताद अबिद हुसेन खान स्मृती संगीत मंडळ-मुरूड आदि मैफिली होत. ‘अल्हैय्या-आनंद यात्रा स्वरांची’ या स्वनिर्मित व्यासपीठाच्या माध्यमातून संगीतविषयक प्रयोगशील उपक्रम त्या राबवत असतात. स्वत: विविध बंदिशींच्या रचना  व सादरीकरण त्या करत असतात. चित्रपट व मालिकांमध्ये त्यांनी गायन केले आहे. त्यात जिंकी रे जिंकी, इरादा पक्का या चित्रपटाबरोबरच कुलवधु, तू एक स्त्री, गंध हलके हलके या आदि अल्बम व मालिका शीर्षक गीतांचा समावेश आहे.

महाराष्ट्र मंडळ, दुबई या सर्वांकृष्ट गायिका पुरस्कार, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा शास्त्रीय संगीत स्पर्धेचा प्रथम पुरस्कार, देवल क्लब, कोल्हापुर, स्वर साधना संगीत संस्था, मुंबईची  शिष्यवृत्ती आदि. पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रम विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन व ग्रंथ तुमच्या दारी यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे.तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वास ठाकूर, ऋचिता ठाकूर व विनायक रानडे यांनी केले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.