ज्येष्ठ साहित्यिक डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन 

0

पुणे,३० नोव्हेंबर २०२२ – ज्येष्ठ साहित्यिक,अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध समीक्षक डॉ नागनाथ कोतापल्ले यांचं दीर्घ आजाराने निधन झालंय.ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते.जीवन-मृत्यूशी त्यांची झुंज सुरु होती. मात्र अखेर ही झुंज अपयशी ठरली. नागनाथ कोतापल्ले यांच्या निधनावर साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात  पत्नी, मुलगा, कन्या, सून व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना १४ नोव्हेंबर रोजी विषाणू संसर्गाचे निदान झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्रास वाढल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. कृत्रिम श्वासोच्छ्वास यंत्रणेचा आधार त्यांना देण्यात आला होता. दोन दिवसांपासून ते अत्यवस्थ होते. अखेरीस आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.

डॉ. कोत्तापल्ले यांचा जन्म ६ मार्च १९४८ रोजी नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे झाला. मराठी साहित्यात पीएचडी प्राप्त केल्यानंतर ते औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागात अध्यापन करू लागले. डॉ.कोतापल्ले यांची शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरी हे प्राध्यापक ते कुलुगुरु अशी राहिलीय. नागनाथ कोतापल्ले १९७७ साली मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक झाले. त्यानंतर कोतापल्ले यांची पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या प्रमुखपदी निवड झाली. कोतापल्ले २००५-२०१० या दरम्यान मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरूपदी राहिले.त्यांच्या अनेक साहित्यकृतींना राज्य शासनाचे पुरस्कार लाभले होते.

कोतापल्ले यांनी विविध संमेलनचे अध्यक्ष राहिले. श्रीगोंद्यात आठवे ग्रामीण साहित्य संमेलन,  मुंबईतले युवक साहित्य संमेलन, कराडजवळ उंडाळे येथील साहित्य संमेलन, पुण्यातील पहिले औंध उपनगरीय मराठी साहित्य संमेलन या आणि अशा बऱ्याचं साहित्य संमेलनाचीअध्यक्षपद भूषवली. चिपळूणला २०१२ साली ८६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

डॉ.कोत्तापल्ले यांची साहित्यसंपदा

कथासंग्रह
कर्फ्यू आणि इतर कथा, संदर्भ, राजधानी, रेखा आणि पाऊस, कवीची गोष्ट, देवाचे डोळे, सावित्रीचा निर्णय

कादंबरी 
मध्यरात्र, गांधारीचे डोळे, पराभव

समीक्षा 
पापुद्रे, ग्रामीण साहित्य : स्वरूप आणि शोध, नवकथाकार शंकर पाटील, साहित्य अन्वयार्थ, मराठी कविता : एक दृष्टीक्षेप, साहित्याचा अवकाश

इतर लेखन
गावात फुलले चांदणे, मराठी साहित्य संमेलन आणि सांस्कृतिक संघर्ष, उद्याच्या सुंदर दिवसासाठी, ज्योतिपर्व (ज्योतिराव फुले यांचे चरित्र), कोमेजलेला चंद्र (उडिया अनुवाद)
सुवर्णबुद्ध (अनुवाद)सत्यधर्मी ज्योतिबा फुलेरयत शिक्षण संस्था

संपादने
अपार्थिवाचे गाणेस्त्री-पुरुष तुलनानिवडक बी. रघुनाथशेतकऱ्याचा आसूडगद्यगौरवगद्यवैभव

सन्मान
पुरस्कारराज्य शासनाचे पुरस्कार – मूड्स (कवितासंग्रह), संदर्भ, गांधारीचे डोळे, ग्रामीण साहित्य, उद्याच्या सुंदर दिवसासाठी, केशवराव विचारे पारितोषिक, बी. रघुनाथ पुरस्कार, महात्मा फुले पुरस्कार, परिमल पुरस्कार, गिरीष गांधी साहित्य पुरस्कार, यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार

समाजमनाची नस अचूक पकडणारा साक्षेपी लेखक आपण गमावला
डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्रद्धांजली
आपल्या लेखनातून समाजमनाची नस अचूक पकडणारा साक्षेपी लेखक आपण गमावला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस शोकसंदेशात म्हणतात, डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांनी विविध लेखनप्रकारांतून मराठी साहित्य विश्वात स्वतःचा अमीट ठसा उमटविला. एक कवी, कथाकार, कादंबरीकार, समीक्षक, संपादक आणि अनुवादक अशा विविध भूमिकांमधून त्यांनी मराठी साहित्य समृद्ध केले. मराठी विकास संस्था, साहित्य अकादमी, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक तसेच विद्यापीठांमध्ये मराठी अभ्यास मंडळांच्या माध्यमातून देखील त्यांनी मराठीची केलेली सेवा मार्गदर्शक अशीच आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेले डॉ. कोत्तापल्ले आपल्या भूमिकेवर, विचारांवर कायम ठाम राहिले. विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेले कार्यदेखील अतिशय उल्लेखनीय होते. एक उत्तम मार्गदर्शक, प्रशासक आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्त्व त्यांच्या निधनाने आपण गमावले आहे.

मानवतावाद जपणारा कृतिशील लेखक हरपला – छगन भुजबळ
लेखन प्रपंच आणि कृतिशीलतेमुळे ओळखले जाणारे बलदंड व्यक्तिमत्त्व, तसेच साहित्यिकांच्या कोणत्याही वर्तुळात किंवा एखाद्या पंथांच्या चौकटीत न रमणारे ज्येष्ठ लेखक नागनाथ कोत्तापल्ले यांचं आज दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने मानवतावाद जपणारा कृतिशील लेखक हरपला असल्याच्या शोकभावना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहे.

छगन भुजबळ यांनी शोक संदेशात म्हटले आहे की, ज्येष्ठ लेखक नागनाथ कोत्तापल्ले यांनी चार दशके प्रत्यक्ष शिक्षण क्षेत्रासाठी वाहून दिली. दलित, ग्रामीण विद्यार्थ्यांशी अतिशय आत्मियतेचे नाते असणारे ते गुरुजी होते. मराठीचे अध्यापक, विभागप्रमुख ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू आणि ८६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.

संयमी असले तरी कोत्तापल्ले यांचा बाणा मात्र करारीच होता. अनेक विद्यार्थ्यांना आधार देण्यापासून ते त्यांना जीवनात उभे करण्यापर्यंत मोलाचे कार्य आणि नैतिक जबाबदारी पार पाडली हे त्यांचे माणूसपणाचे संचित वेगळा आदर्श निर्माण करणारे ठरले. कोत्तापल्ले यांच्या साहित्याला फुले, शाहू, आंबेडकर, मार्क्‍स यांच्या विचारांचे तात्विक अधिष्ठान होते. कोत्तापल्ले यांनी महात्मा फुले यांच्या विचार आणि कार्याचा वेध घेतला. महात्मा फुले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशी विचार आणि प्रबोधन परंपरा त्यांनी मांडली.

त्यांच्या निधनाने परिवर्तनाच्या चळवळीला वैचारिक दिशादिग्दर्शन करणारा साहित्यिक देशाने कायमचा गमावला आहे. मी व माझे कुटुंबीय त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो असे छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!