नाशिक,दि. ११ जानेवारी २०२३ – कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार आणि इंटकचे प्रदेश अध्यक्ष जयप्रकाश जितमल छाजेड यांचे मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने कॉंग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. छाजेड यांच्या पश्च्यात पत्नी तथा शहराच्या माजी उपमहापौर शोभा छाजेड, मुले आकाश आणि प्रीतीश असा परिवार आहे.
गेल्या काही दिवसांपासून छाजेड यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यानंतरही नागपूर येथे काँग्रेस पक्षाच्या बैठकीसाठी जाण्यासाठी निघाले होते मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना प्रकृतीची काळजी घेण्यास सांगितले त्यातच काल रात्री हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्रकृती खालावली. त्यांना उपचारार्थ शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काल रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच नागपूर येथे कॉंग्रेस पक्षाच्या बैठकीसाठी गेलेले सर्व पदाधिकारी नाशिकला निघाले आहेत.
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांचा लौकिक होता काँग्रेस पक्षाशी निष्ठावान असे त्यांचे घराणे होते युवक काँग्रेस पासून आपल्या कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या जयप्रकाश छाजेड यांनी पक्षातील शहर आणि प्रदेश पातळीवरील अनेक संघटनात्मक पदे भूषवली तसेच तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली होती. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे ते जवळचे सहकारी होते. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना छाजेड यांची विधानपरिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती झाली होती नाशिकच्या राजकीय सामाजिक सांस्कृतिक चळवळीतील एक प्रमुख नेते म्हणून त्यांच्याकडे बघितले जात होते विधान परिषद सदस्य म्हणूनही छाजेड यांची कामगिरी प्रभावी राहिली. इंटकचे प्रदेश अध्यक्षपद भूषवताना त्यांनी एसटी कामगारांच्या अनेक प्रश्नांवर त्यांनी स्वपक्षाच्या सरकारलाही प्रसंगी धारेवर धरले.
छाजेड यांचे पार्थिव आज (बुधवारी) कॉंग्रेस भवनात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून सायंकाळी ६ वाजता नाशिक अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
ज्येष्ठ नेते जयप्रकाश छाजेड यांच्या निधनाने इंटकचा आवाज हरपला – छगन भुजबळ
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांच्या निधनाने नाशिकच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली असून इंटक संघटनेचा आवाज हरपला आहे. अशा शब्दात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.
छगन भुजबळ यांनी शोक संदेशात म्हटले आहे की, काँग्रेस पक्षाशी अतिशय निष्ठावान असलेल्या छाजेड यांना स्व.विलासराव देशमुख यांनी विधानपरिषदेवर आमदार म्हणून संधी दिली. या काळात त्यांनी कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली. काँग्रेस पक्षाच्या प्रदेश पातळीवर अनेक संघटनात्मक पदे त्यांनी भूषविली. इंटक संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी काम करत असताना त्यांनी एसटी कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडत कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले.
ज्येष्ठ नेते जयप्रकाश छाजेड यांच्या निधनाने इटक संघटना कायमची पोरकी झाली असून लढवय्या कामगार नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. मी व माझे कुटुंबीय छाजेड कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो असे छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात शेवटी म्हटले आहे.