नाशिक दि.११ फेब्रुवारी २०२३ – सार्वजनिक वाचनालय, नाशिक या संस्थेतर्फे दरवर्षी स्व.माधवराव लिमये याच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा कार्यक्षम सांसद सदस्य / विधी मंडळ सदस्य पुरस्कार सन २०२१-२२ चा मा.आ.श्री. सुधीर मुनगंटीवार यांना देण्यात येणार आहे. सावानाचे उपाध्यक्ष वैद्य. विक्रांत जाधव, प्रमुख सचिव डॉ. धर्माजी बोडके, सहाय्यक सचिव अॅड.अभिजित बगदे, सांस्कृतिक कार्य सचिव संजय करंजकर तसेच देणगीदार सदस्य आर्चिस नेर्लीकर यांनी नुकतीच मुंबई येथे ना.सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन त्यांना या पुरस्काराचे व होणाऱ्या कार्यक्रमाचे लेखी पत्र दिले. मुनगंटीवार यांनी पुरस्कार स्वीकारला.रु. ५० हजार रोख, स्मृतिचिन्ह व शाल-श्रीफळ-पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सावाना च्या जुने देवघेव विभागात आज झालेल्या पत्रकार परिषदेत हा पुरस्कार सावाना अध्यक्ष प्रा दिलीप फडके यांनी जाहीर केला. पत्रकार परिषदेस देणगीदार डॉ विनायक नेर्लिकर डॉ शोभाताई नेर्लीकर उपाध्यक्ष वैद्य विक्रांत जाधव कार्याध्यक्ष गिरीश नातू प्रमुख सचिव डॉ धर्माजी बोडके सहाय्य्क सचिव ॲड अभिजित बगदे अर्थसचिव देवदत्त जोशी ग्रंथ सचिव जयप्रकाश जातेगावकर सांस्कृतिक कार्य सचिव संजय करंजकर प्रा सोमनाथ मुठाळ गणेश बर्वे मंगेश मालपाठक प्रशांत जुन्नरे आदी उपस्थित होते.
स्व.माधवराव लिमये यांच्या विषयी
स्व.माधवराव लिमये हे नाशिकचे जुन्या पिढीतील ज्येष्ठ समाजवादी नेते होते. त्यांनी विधान परिषद सदस्य म्हणून उत्तम कामगिरी केली आहे. स्व. लिमये हे पत्रकार, लेखक व सामाजिक, शेक्षणिक क्षेत्रातील मार्गदर्शक आणि तळमळीचे कार्यकर्ते होते. त्यांचा सार्वजनिक वाचानाल्याशी घनिष्ठ संबंध होता. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांची कन्या डॉ.शोभाताई नेर्लीकर व जावई डॉ.विनायक नेर्लीकर यांनी दिलेल्या देणगीतून सदरचा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सार्वजनिक वाचनालय, नाशिक दरवर्षी विधान परिषद, विधान सभा, लोक सभा, राज्य सभा ह्या पैकी एका सदस्याची निवड ही कार्यक्षम आमदार/खासदार पुरस्कारासाठी निवड करीत असते.
सन २०२१-२२ च्या कार्यक्षम आमदार / खासदार पुरस्कारासाठी आमदार प्रा. देवयानी फरांदे, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर व पत्रकार जयप्रकाश पवार, डॉ. विनायक नेर्लीकर, डॉ. सौ. शोभाताई नेर्लीकर, डॉ आर्चिस नेर्लीकर, तसेच सार्वजनिक वाचनालयाचे पदसिद्ध सदस्य म्हणून अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, प्रमुख सचिव डॉ. धर्माजी बोडके या माननीय सदस्यांच्या निवड समितीवर पुरस्कार निवडीची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
पुरस्काराचे हे १९ वे वर्ष आहे. मागील १८ वर्ष अनुक्रमे सर्वश्री आ.बी.टी. देशमुख, गणपतराव देशमुख, आर.आर.पाटील, प्रमोद नवलकर, शोभाताई फडणवीस, जीवा पांडू गावित, दत्ताजी नलावडे, गिरीश बापट, सा.रे.पाटील, पांडुरंग फुंडकर, जयवंतराव पाटील, देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब थोरात, बच्चू कडू, निलमताई गोऱ्हे, गिरीश महाजन, धनंजय मुंडे, खासदार नितीन गडकरी ह्या मान्यवर आमदार व खासदारांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.