स्वत्वाचा प्रवास दाखवणारं नाटक – जन्मवारी !!

एनसी देशपांडे ,नाशिक 

1

जन्मवारी …. जन्म आणि वारी !!

आपला प्रत्येक जन्मच एक वारी असतो. प्रत्येक जन्मी जीवाला समाधान शोधण्याची आस असते पण मनुष्य गुरफटतो भवतालात… पदरी आलेलं काम उरकण्यात.. तीच इतिकर्तव्यता मानण्यात ! नशिबाला दोष देत किंवा स्वीकारत चालत राहतो चक्रातून…. पण

विठ्ठल भेटीची ओढ मनात घेऊन चालणाऱ्या वारकऱ्यांसोबत स्वतः श्रीहरी चालतो. कुठल्या रुपात, कुठल्या रंगात ते कळतं कुठे आपल्याला??!! चालणारा रस्ता आपल्याला मार्ग बदलून सद्वर्तनाच्या दिशेनी ज्याच्यामुळे घेऊन जाईल तोच आपला श्रीहरी!!

प्रत्येक काळात असा वाटाड्या श्रीहरी भेटेलही पण ती चाललेली वाट वारीची हवी….. मनाशी संवाद होऊन , आपुलाच वाद आपुल्याशी होऊ लागतो तिथे श्रीहरी सोबत येतो… सन्मार्गाची तुमची इच्छा हवी , वाटाड्या मिळतोच….

प्रवासात कुणाचा हात धरायचा हे भान हवं! आपल्याला आवडणारं, पटणारं कामच करायचं! मिळालेल्या आयुष्याला आपल्या अटीवर स्वीकारायचं, बदलवायचं ! विवेकबुद्धीला पटेल तसं जगायचं! त्यासाठी आपलं कर्म आणि समाधान ह्याचं गणित तपासून पहायचं .

जन्मवारी नाटकात अशा दोन काळातल्या स्त्रियांचा प्रवास अनुभवतो आपण. ज्या कुळात आपण जन्मलो त्याचं ओझं न घेता मुळात आपण कोण आहोत ह्याचा शोध घेऊ पाहणाऱ्या दोन  स्त्रिया…. त्यांची स्वत्व शोधायची वैचारिक, शारिरीक धडपड आणि त्यातून आयुष्याबाबत घेतलेला निर्णय … असा प्रवास दाखवणारं नाटक – जन्मवारी !!

अनुभवसंपन्न गुणी अभिनेत्री आई संपदा जोगळेकर कुळकर्णी आणि त्यांची कन्या शर्वरी कुळकर्णी बोरकर यांच्या परस्पर विरोधी सशक्त व्यक्तिरेखा हे वैशिष्ट्य ठरावं ह्या नाटकाचं! शुभांगी भुजबळ, कविता जोशी, अमृता मोडक आणि नाट्यवेडी मंडळी अभिनयातून भक्कम साथ देतात. अभ्यासू संगीतकार मंदार देशपांडे, प्रयोगशील नेपथ्यकार सचिन गावकर, प्रयत्नशील यशस्वी प्रकाश योजनाकार अमोघ फडके यांची समर्पक साथ कलाकृतीला लाभली आहे. वेशभूषा आणि सह दिग्दर्शनाची जबाबदारी पून्हा शर्वरीने सांभाळली आहे. स्वेवन स्टुडिओज् ची निर्माती शांभवी बोरकर आणि सतिश आगाशे यांनी नव्या संकल्पनेच्या नाटकाला आर्थिक जोड देऊन रंगभूमीवर दर्जेदार कलाकृती मांडली आहे.

लेखिका- दिग्दर्शिका हर्षदा संजय बोरकर यांनी काळाला समांतर छेद देत एक परिपूर्ण नाट्यानुभव जन्मवारीतून दिला आहे.

एनसी देशपांडे ,नाशिक 

N C Deshpande
एनसी देशपांडे

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
  1. खुप छान समीक्षा मांडली आपण हय्या सुंदर नाटकाची.

Don`t copy text!