पत्रकार,पोलिसांच्या समन्वयानेच गुन्हेगारी व भ्रष्टाचारी प्रवृत्ती आटोक्यात येऊ शकते : शर्मिष्ठा वालावलकर
नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने तब्बल ५७ पत्रकार, १५ सामाजिक संस्थांचा गौरव
नाशिक – पत्रकारांची नजर अत्यंत चौकस असते, यात दुमत नाही. गुन्ह्यांबाबत अनेक पत्रकारांच्या मला वैयक्तिक सूचना असतात. माझ्या कारकिर्दीत पत्रकारांच्या सहकार्याने गुन्हे अन्वेषण करण्यास मदत झाली. पोलिस, पत्रकार यांच्या समन्वयाने अनेक गुन्ह्यांचे पाळेमुळे खणून काढण्यास शक्य होऊन गुन्हेगारी व भ्रष्टाचारी प्रवृत्ती आटोक्यात येऊ शकते, असे प्रतिपादन नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (अँटी करपशन) पोलीस अधीक्षक सौ शर्मिष्ठा वालावलकर यांनी केले..
नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ (रजी.) संलग्नित नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, सोशल नेटवर्किंग मीडिया यात सेवा देणारे ५७ पत्रकार, तथा सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या १५ सामाजिक संस्थांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. नाशिकरोड येथील के. जे. मेहता हायस्कूल मधील शुभेंदू सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सौ. वालावलकर यांनी आपले मत मांडले..
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीण जोशी, पूज्य सिंधी पंचायत तथा शंकर एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री रतन चावला, ज्येष्ठ पत्रकार श्री चंदुलाल शहा, नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री यशवंत पवार, जिल्हाध्यक्ष श्री अण्णासाहेब बोरगुडे पाटील, नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष श्री दिनेशपंत ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी दीपप्रज्वलन होऊन वृत्तपत्र सृष्टीचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सर्व प्रमुख अतिथींचे स्वागत विविध पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.
पत्रकारिता क्षेत्रात अनेक स्थित्यंतरे आली आहेत. इलेक्ट्रॉनिक, सोशल नेटवर्किंग मीडियाचे प्राबल्य वाढले, न्यूज पोर्टलचे युग अवतरले. तथापि, लेखन करणाऱ्या पत्रकारांचे महत्व तुस भरही कमी झालेले नाही. उलट त्यांच्या धारदार लेखणीवर जनतेचा विश्वास वाढतच चालला आहे. ही सर्वच दृष्टीने सकारात्मक बाब म्हणावी लागेल. लाचलुचपत विभागाच्या कामांबाबत शहरात बऱ्यापैकी जागृती आहे. मात्र ग्रामीण भागातील जनता याबाबत पूर्णपणे अनभिज्ञ आहे. पोलिसांच्या सहकार्याने पत्रकारांनी याचा पाठपुरावा करून ग्रामीण भागातील जनतेचा यात सहभाग वाढवावा, असे आव्हान त्यांनी सर्वच पत्रकार बांधवांना केले.
नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री यशवंत पवार यांनी पार्श्वभूमी विषद करून कुठलीही प्रचार यंत्रणा न राबवता जिल्हा संघाकडून अडचणीत असलेल्या पत्रकारांना गेल्या २५ वर्षात अद्याप पर्यंत ५० लाख रु. पर्यंत ची वेळोवेळी मदत दिली आहे. प्रामाणिक पत्रकार हेच आमचे बलस्थान असल्याचे त्यांनी सांगितले.
मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, सोशल नेटवर्किंग मीडिया मधील जवळपास ५७ पत्रकार, १५ सामाजिक संस्था यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यात जनस्थान ग्रुप , दिव्यांग विकास मंदिर, हिंदुस्थान स्काऊट अँड गाईड, नाशिक आकाशवाणी, सिंधू समाज मंडळ, साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ, नामको बँक, ए जी म्युजिक अकादमी, गोदा प्रेमी सेवा समिती, शिक्षण मंडळ भगुर आदी सामाजिक संस्था तथा विविध माध्यमातील पत्रकारांचा सत्कार झाला. ज्येष्ठ पत्रकार चंदुलाल शहा यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रास्ताविकात तालुकाध्यक्ष श्री दिनेशपंत ठोंबरे यांनी तालुका मराठी पत्रकार संघाच्या आगामी कामांबाबत माहिती देऊन सर्वच दुर्लक्षित घटकांना संघाच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वास्त केले.
“नाशिक वार्ता वेध” या ऑनलाईन डिजिटल मुद्रित माध्यमाचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. नाशिक तालुका, शहर, जिल्ह्यातील अनेक पत्रकार बांधव, विविध संस्थांचे पदाधिकारी, सदस्य यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाचे लियाकत पठाण, पंकज पाटील, मंगलसिंह राणे, करणसिंग बावरी, हर्शवर्धन बोऱ्हाडे, अनिरुद्ध पांडे, तोसिफ शेख, कादिर पठाण, वसीम शेख, वकार खान, दिनेश पगारे, सचिन जाधव आदींसह ईतर सभासदांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन मंगेश जोशी, शीतल भाटे यांनी केले. आभार प्रदर्शन करणसिंग बावरी यांनी मानले.
[…] | ३ मे २०२५ | – Nashik Crime News नाशिक शहरातील गुन्हेगारीने सामान्य […]