योगी, व्युत्पन्न, ऋषीश्वर, धूर्त, तार्किक, कवीश्वर,मनावर विजय मिळवलेले मुनीश्वर, दिगंबर, ब्रह्मज्ञानी,आत्मज्ञानी, तत्वज्ञानी, पिंडज्ञानी, योगाभ्यासी,योगज्ञानी उदासीन असे असतात. पंडित आणि पुराणिक, विद्वान आणि वैदिक, भट आणि पाठक, यजुर्वेदी, प्रकांड पंडित, महाश्वोत्री,याज्ञिक आणि अग्निहोत्री, वैद्य आणि पंचाक्षरी, परोपकार करणारे, भूत भविष्य वर्तमान या तिन्ही काळाचे ज्ञान असलेले, बहुश्रुत, निराभिमानी तरीही निरपेक्ष असलेले, शांती, दया क्षमाशील, पवित्र आणि सत्वशील, अंतर शुद्ध असलेले, ज्ञानशील, ईश्वरी पुरुष असे जे सभांचे नायक आहेत, त्यांचा अलौकिक महिमा काय वर्णावा! अशा संतसभेत श्रवण करून परमार्थी लोकांच्या सहवासाने लोकांना सहज पैलपार जाता येते.
सात्विक, सत्वाचा आग्रह धरणारी उत्तम गुणांची मंडळी सभेत असल्याने तेथे नित्य सुखाची प्राप्ती होते. तेथे विद्यावान, कलावं, विशेष गुण असलेले सत्पात्र, भगवंतांचे प्रिय असलेले लोक आढळतात. त्यात प्रवृत्ती आणि निवृत्ती, प्रापंचिक आणि पारमार्थिक,गृहस्थाश्रमी, वानप्रस्थी, संन्यासी सगळे भेटतात. वृद्ध आणि तरुण, बाल, पुरुष, स्त्रिया हे सर्व श्रीकृष्णाचे ध्यान करताना दिसतात. अशा या परमेश्वराच्या भक्तांना माझे अभिवादन! त्यांच्यामुळे आपोआप समाधान मिळते. अशा सभेत नित्य निरंतर परमेश्वराचा नामगजर व कीर्तन सुरु असते त्यास माझा नमस्कार! जेथे अशा भगवंतांच्या मूर्ती असतील तेथे निश्चितपणे उत्तम गती मिळवता येईल असे अनेक ग्रंथांतून महंतांनी सांगितले आहे. जेथे कला, कीर्तन सुरु असेल ती सभा श्रेष्ठ असून कथाश्रवणाने नाना संशय मावळतात. इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे, सभा स्तवन नाम अष्टम समास समाप्त.
-दशक १, समास ९ , परमार्थ स्तवन
आता साधकांचा खरा स्वार्थ असलेल्या, समर्थामध्ये समर्थ योग असलेल्या परमार्थाचे स्तवन करू या. हा अत्यंत सुगम असला तरी सत्संगती नसल्याने लोकांना दुर्गम झाला आहे. इतर साधने अनिश्चित असून परमार्थ हाच रोकडा ब्रह्मसाक्षात्कार होय असे वेद शास्त्राचे सार असलेला अनुभव येथे येतो हे याचे वैशिष्ट्य आहे. सर्वत्र आहे मात्र थोडाही दृष्टीस पडत नाही, उदास असूनही एखाद्या ठिकाणी पाहूनही दिसत नाही. आकाशमार्ग, गुप्त पंथ जाणारे योगी परमार्थ जाणतात, मात्र इतरांना त्यातील गुढार्थ सहसा समजत नाही. जे साराचेही सार आहे, अखंड अक्षय, अपार आहे, काहींही झाले तरी चोर तस्कर ते नेऊ शकत नाहीत असा हा ठेवा आहे. त्याला राजभय, अग्निभय, श्वापदांपासून भय अजिबात नाही.
एकदा प्राप्त झाले की ते दूर जात नाही, कितीही काळ गेला तरी नाश पावत नाही, जिथल्या तिथे राहते असे ते आहे. कधीही न बदलणारे, कमी जास्त न होणारे, अनुभव नष्ट न होणारे, अदृश्य न होणारे गुरुंनी डोळ्यात घातलेल्या अन्जनाशिवाय न दिसणारे असे ते परब्रह्म होय. मागे अनेक महान योग्यांनी सांगितले, तो निजस्वार्थ म्हणजेच परमार्थ परमगुह्य होय. ज्यांनी तो शोधून काढला त्यांचे जीवन कृतार्थ झाले बाकीच्यांना जन्मोजन्मी तो अलभ्य ठरला. असा हा परमार्थ अपूर्व आहे. तो प्राप्त झाला असता जन्ममृत्यूची भीती राहत नाही आणि जिवंतपणीच मोक्ष मिळतो. त्याच्यामुळे माया मावळते, सारासारविचार कळतो, अंतरात परब्रह्म विलीन होते. (क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

मोबाइल- ९४२०६९५१२७