भावार्थ दासबोध – भाग १२

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

सगळे जण जागे असतील त्यांच्यामध्ये झोपतो, दुसऱ्या ठिकाणी जास्त भोजन करतो तो एक मूर्ख. आपले मान किंवा अपमान स्वतःच उघड करतो, जुगार, वेश्यागमन, चोरी, चहाडी, परदारागमन, लघुपक्षीक्रीडा व किन्नरी गायन ही सात व्यसने करतो तो एक मूर्ख होय. दुसऱ्याचे पाहून प्रयत्न थांबवतो, आळसामध्ये संतोष मानतो तो एक मूर्ख होय. घरामध्ये विचारपूर्वक वागतो आणि सभेमध्ये लाजतो, शब्द बोलताना घाबरतो तो एक मूर्ख होय. आपल्यापेक्षा जो श्रेष्ठ आहे त्याच्या पुढे पुढे करतो, शिकवण्याचा वीट मानतो तो मूर्ख जाणावा. न ऐकणार्यांना शिकवतो, वडिलांना जागा दाखवून देतो, काहीतरी कृत्य करून वडिलांना कमीपणा आणतो तो एक मूर्ख. एकाएकी एकदम वासनेच्या आहारी जाऊन मर्यादा लाज लज्जा विसरतो तो एक मूर्ख होय.

दुखणे असूनही औषध घेत नाही, पथ्य सांभाळत नाही, समोर आलेले जेवण करीत नाही तो एक मूर्ख. संगती-सोबती शिवाय परदेशात जातो, ओळख नसताना सोबत करतो, महापुरात उडी घालतो तो एक मूर्ख. आपल्याला जिथे मान असतो तिथे नेहमी जातो, इतरांचा मात्र मान राखत नाही तो एक मूर्ख. आपला नोकर श्रीमंत झाला तर त्याच्या कलाने वागतो, नेहमी रागावतो तो एक मूर्ख. कारण नसताना चिंता करणारा, अपराध नसताना दंड करणारा, किरकोळ गोष्टीसाठी कंजूषपणा करणारा तो एक मूर्ख. देवाशी, पित्याशी वैर धरणारा, शक्ती नसताना मध्यस्थी करणारा, मुखातून शिवीगाळ करणारा तो एक मूर्ख. घरी बसल्या बसल्या दात-ओठ खाणारा बाहेर मात्र दीन बापडा असा जो वेडसर तो एक मूर्ख.

नीच व्यक्तीशी संगत करतो, एकांतात परस्त्रीबरोबर राहतो, प्रवास करताना खात राहतो तो एक मूर्ख. स्वतः परोपकार करीत नाही, कोणी उपकार केलं तर अपकार करतो,थोडंसंच करतो पण खूप बोलतो तो एक मूर्ख. तापट, आळशी, कुटील, शील चांगले नसलेला, धारिष्ट नसलेला तो एक मूर्ख. ज्याच्याकडे विद्या नाही, वैभव नाही, धन नाही, पुरुषार्थ नाही, सामर्थ्य नाही नाही तरीही जो गर्व करतो तो एक मूर्ख होय. नामर्द, खोटारडा, लबाड, वाईट कर्म करणारा, जास्त झोपणारा तो एक मूर्ख होय.

उंचावर जाऊन वस्त्र नेसणारा, चव्हाट्यावर लावून शौच करणारा, सदासर्वकाळ नग्न राहणारा तो एक मूर्ख. ज्याचे दात, डोळे, नाक, हात, वस्त्र आणि पाय नेहमी मलीन असतात तो एक मूर्ख. वैधृती आणि व्यतिपात या कुमुहूर्तावर कामे करतो, अपशकुन करतो, घात करतो तो एक मूर्ख.

क्रोध, अपमान, बुद्धी यामुळे स्वतःचा स्वतः वध करतो, ज्याच्याकडे दृढ बुद्धी नाही तो एक मूर्ख. जिवलग लोकांना वाईट साईट बोलतो, सुखाचा शब्द बोलत नाही, नीच लोकांना मात्र नमस्कार करतो तो एक मूर्ख. नेहमी स्वतःला जपतो, शरणागत आलेल्यास दूर सारतो, लक्ष्मीवर भरोसा करतो तो एक मूर्ख. मुलेबाळे आणि पत्नी हेच विश्व मानून परमेश्वराला विसरतो तो एक मूर्ख. करावे तसे भरावे हे ज्याला माहिती नसते तो एक मूर्ख. पुरुषापेक्षा स्त्रियांकडे आकर्षित होऊन अनेक बायका करणारा, तो एक मूर्ख. दुर्जनाच्या म्हणण्यानुसार मर्यादा सोडून वागणारा, दिवसा देखील डोळे झाकून वागणारा तो एक मूर्ख. देवद्रोही, गुरुद्रोही, मातृद्रोही, पित्रूद्रोही, ब्रह्मद्रोही, स्वामीद्रोही तो एक मूर्ख. (क्रमशः)

निरुपण : पद्माकर देशपांडे

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!