भावार्थ दासबोध – भाग १३ 

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

दुसऱ्याला दुःख देण्यात आनंद आणि दुसऱ्याला आनंद देण्यात दुःख मानणारा, गेल्या वस्तूचा शोक करणारा तो एक मूर्ख. आदर नसताना बोलणे, न विचारता साक्ष देणे, निंद्य गोष्टी करणे हे मूर्खाचे लक्षण आहे.  महत्व लक्षात न घेता बोलतो, चांगला रस्ता सोडून दुसरीकडे भरकटत जातो, वाईट कर्म करणाऱ्या मित्रांची संगत धरतो तो एक मूर्ख. आपली पत न राखणे, नेहमी विनोद करीत राहणे, हसत खिदळत असताना अचानक मारामारीपर्यंत येतो तो एक मूर्ख.

अवघड पैजा मारणे, विनाकारण बडबड करणे, गरज असताना काहीही न बोलणे हे देखील मूर्खाचे लक्षण आहे. वस्त्र शास्त्र दोन्ही नसताना उंच स्थानी जाऊन बसतो, भाऊबंधांवर विश्वास ठेवतो तो एक मूर्ख. चोरांना ओळख सांगतो, पाहिलेली वस्तू मागतो, रागाच्या भरात स्वतःचे अहित करतो तो एक मूर्ख. हीनलोकांशी बरोबरी करतो, विनाकारण उत्तरात प्रत्युत्तर देत राहतो, डाव्या हाताने जेवण करतो तो एक मूर्ख. समर्थाचा मत्सर करतो, न मिळणाऱ्या वस्तूचा हेवा करतो, स्वतःच्या घरी चोरी करतो तो एक मूर्ख. परमेश्वराची भक्ति सोडून माणसावर विश्वास ठेवतो, निरर्थक परिश्रम करतो तो एक मूर्ख.  संसार दुःखामुळे देवाला शिवी देणे, मित्रांचे उणे दुणे काढणे हे देखील मूर्खाचे लक्षण आहे. किरकोळ अन्याय असला तरी क्षमा न करणे, नेहमी धाकात ठेवणे, विश्वासघात करणे हेही मूर्खाचे लक्षण आहे.

समर्थाच्या मनातून उतरतो, ज्याच्यामुळे श्रोते कंटाळतात, क्षणोक्षणी भूमिका बदलतो तो एक मूर्ख. अनेक दिवसांपासून असलेले सेवक बदलून नवीन आणून ठेवतो, ज्याच्या सभेमध्ये कोणताही निर्णय घेतला जात नाही तो एक मूर्ख जाणावा. अनीतीने द्रव्य  जोडतो, धर्म नीती न्याय सोडतो, आपल्याबरोबर असणाऱ्यांना सोडतो तो एक  मूर्ख. घरी सुंदर पत्नी असूनही नेहमी दुसऱ्या घरी राहतो, अनेकांचे उष्टे सेवन करतो तो एक मूर्ख. आपला पैसा दुसऱ्याला देतो आणि दुसर्याच्या पैशावर डोळा ठेवतो, हिन व्यक्तीशी देण्याघेण्याचा व्यवहार करतो तो एक मूर्ख होय. भूतकाळात रममाण होतो, दुर्गम गावात राहतो, सदा सर्वकाळ चिंता वाहतो तो एक मूर्ख. दोघे बोलत असतात तिथे हा तिसरा जाऊन बसतो, दोन्ही हाताने डोके खाजवतो तो एक मूर्ख.  पाण्यामध्ये चूळ भरतो, सारखे पाय खाजवतो, हिन व्यक्तीची सेवा करतो तो एक मूर्ख. स्त्री-लहान मुलांशी जवळीक साधतो  पिशाच्चाजवळ बसतो, जमत नसताना कुत्रे पाळतो तो एक मूर्ख.

परस्त्रीशी भांडण करतो, मुक्या जनावरांना मारतो, मूर्खाची संगत धरतो तोही मूर्ख होय. भांडण पाहत उभा राहतो, विनाकारण कौतुक करतो, खरे माहितीअसताना खोटे सहन करतो तो एक मूर्ख. लक्ष्मी आल्यावर मागील ओळख विसरतो, देवा ब्राह्मणांवर अधिकार गाजवू पाहतो तो एक मूर्ख.

आपले हित साध्य होत आहे तोपर्यंत नम्रता धरतो पण इतरांचे काम मात्र करीत नाही तो एक मूर्ख. पुस्तकातील अक्षरे वगळून वाचतो किंवा आपल्या पदरची अक्षरे घालतो, पुस्तकाची निगा राखत नाही तो एक मूर्ख.

आपण स्वता कधी वाचत नाही, दुसऱ्यालाही वाचायला देत नाही, पुस्तके बांधून ठेवतो तो एक मूर्ख.  अशी ही मूर्ख लक्षणे ऐकली असता चातुर्य निर्माण होते. अशी लक्षणे भरपूर आहेत पण काही ठराविक सांगितली जी राहून गेली त्याबद्दल श्रोत्यांनी क्षमा करावी. मूर्ख लक्षणे त्यागावी, उत्तम लक्षणे घ्यावी. पुढील समासामध्ये ती निरूपण करीत आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्यसंवादे मूर्खलक्षण नाम समास प्रथम समाप्त.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!