दशक दुसरे समास सहावा तमोगुण वर्णन मागे रजोगुणाचे क्रियेसहित लक्षण सांगितले आता तमोगुणाचे लक्षण सांगतो. संसारामध्ये दुःखरुपी संमंध त्रस्त करीत असताना मनात खेद किंवा खूप क्रोध उद्भवतो तो म्हणजे तमोगुण. शरीरामध्ये क्रोध भरला असता माता पिता बंधू बहिण, कांता यांना ओळखत नाही बायकोला मारतो तो तमोगुण. दुसऱ्याचा प्राण घ्यावा किंवा आपला प्राण द्यावा, माणुसकी विसरणे म्हणजे तमोगुण. क्रोधाने वेड लागले, पिशाच्चाप्रमाणे वावरणे, कोणत्याही उपायाने आवरला जात नाही तो तमोगुण.
शस्त्राचा वापर करून आपला आणि इतरांचा घात करावा अशाप्रकारे विचार व वर्तन म्हणजे तमोगुण. डोळ्यांनी युद्धच पहावे, लढाई असेल तिथे जावे असे मनाने घेतले तो तमोगुण. नेहमी भ्रमात राहणे, केलेला निश्चय टिकत नाही, झोप खूप आवडते हा तमोगुण. त्याची भूक अनावर असते, कडू किंवा गोड असो मुर्खासारखे खात सुटतो, तो तमोगुण. आपले प्रेमपात्र मरण पावले, त्याच्यासाठी जीव देणे, स्वतः आत्महत्या करणे तो तमोगुण. किडा मुंगी आणि श्वापद यांचा वध करणे आवडते, कोणावरही दया करीत नाही अशी वृत्ती म्हणजे तमोगुण. स्त्री हत्या, बाल हत्या, द्रव्यासाठी ब्रह्महत्या, गोहत्या करणे हा तमोगुण. एका रोगामध्ये विष प्यावेसे वाटते, दुसऱ्याला मारून टाकावं वाटतं हा तमोगुण. अंतकरणात कपट धरून दुसऱ्याची निंदानालस्ती करणे, नेहमी उद्धटपणाने वागणे तो तमोगुण.
भांडण व्हावं असं वाटतं, झगडा करावा, मारामाऱ्या कराव्या, अंतरामध्ये द्वेष प्रकट होतो, तो तमोगुण. युद्ध पहावं, युद्धाचे वर्णन ऐकावं, आता युद्ध करावं, मारावं किंवा मराव, असे वाटते तो तमोगुण. मत्सर करून भक्ती सोडावी, देवालये पाडावी, चांगली फळदार झाडे तोडावी तो तमोगुण. चांगली कामे आवडत नाहीत, नाना दोष आवडतात. पापाची भीती वाटत नाही तो तमोगुण. चांगल्या गुणांची नासाडी, लोकांना त्रास देणे, जीवमात्राला खेद देणे, अत्यंत प्रमाद करणे तो तमोगुण. आगी लावाव्या, शस्त्र वापरावी, भुताटकी, विष घालावे, मत्सर करावा जिवाचा क्षय करावा तो तमोगुण. दुसऱ्यांना त्रास देण्यात संतोष, निष्ठुरपणाचा हव्यास, संसाराचा त्रास न वाटणे म्हणजे तमोगुण. भांडण लावून द्यावे आणि मजा पाहत बसावे अशी कुबुद्धी म्हणजे तमोगुण.
संपत्ती प्राप्त झाल्यास इतर जीवांना त्रास देणे, त्यांच्याविषयी कळवळा न वाटणे हा तमोगुण. भक्ती आवडत नाही, भाव नाही, तीर्थ आवडत नाही, वेदशास्त्र नकोसे वाटते तो तमोगुण. स्नानसंध्या नियम नाही, धर्म भ्रष्ट केला, अकर्तव्य करतो म्हणजे तमोगुण. ज्येष्ठ बंधू, आई-वडील यांचे त बोलणे सहन होत नाही, शीघ्र कोपाने निघून जातो तो तमोगुण. ढिम्म राहून खाणे, ढिम्म बसणे, कोणताही विचार न करणे हा तमोगुण. चेटकविद्येचा अभ्यास, शस्त्रविद्येचा हव्यास, मल्लविद्या जोपासना तो तमोगुण. मानेला फास लावून घेण्याचे नवस, निखार्यावर चालण्याचे प्रयत्न, जिभेला काष्ठाने छेद देणे तो तमोगुण. डोक्यावर जळतं खापर ठेवणे, पेटलेल्या काकडयाने अंगाला चटके देणे, स्वतः शस्त्र टोचून घेणे, हा तमोगुण. (क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

मोबाइल- ९४२०६९५१२७