शिर्डी ,दि. ६ मे २०२३ – शिर्डी शहरात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. बनावट ग्राहक पाठवून शिर्डी पोलिसांनी शुक्रवारी रात्री अचानक अनेक हॉटेलवर छापे टाकले. यामध्ये १५ मुलींची सुटका करण्यात आली असून ११ आरोपींनी अटक करण्यात आली.पोलिस उप अधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री ही कारवाई केली असून, पुढील तपास करत आहेत.
शिर्डी शहर व परिसरातील काही हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुप्त बातमीदारा मार्फत उप अधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली होती. या माहितीच्या अधारे पोलिसांच्या पथकाने शिर्डी येथे जावून सहा हॉटेलमध्ये छापे टाकले. भाविकांच्या निवासाची सोय म्हणून चालविण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्तींच्या हॉटेलमध्ये हे प्रकार सुरू होते. पोलिसांच्या कारवाईची माहिती मिळताच, अनेकांनी हॉटेल बंद केली. त्यामुळे पोलिसांनाही मोहीम आटोपती घ्यावी लागली.
करोनाच्या काळात व्यवसाय बंद पडल्याने या व्यावसायिकांसंबंधी सहानुभूती निर्माण झाली होती. विमानसेवा आणि रस्ते वाहतूक सुविधा उपलब्ध झाल्याने शिर्डीतील हॉटेल व्यवसाय अडचणीत आल्याचीही चर्चा असते. अशातच आता या हॉटेलमध्ये असे अवैध धंदे सुरू आल्याचे समोर आले आहे. स्थानिक पोलिसांकडून येथे कारवाई होत नाही. त्यामुळे हे व्यवसाय वाढत आहेत. मिटके यांच्या पथकाने येथे येऊन धाडसाने कारवाई केल्याबद्दल ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.