महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या सुनावणी होणार
सुप्रीम कोर्टातील आजच्या सुनावणीतले महत्त्वाचे मुद्दे
नवी दिल्ली – शिवसेना नेमकी कुणाची ? या वादावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. यावेळी शिवसेना आणि शिंदे गटाने जोरदार युक्तिवाद केला. सरन्यायाधीशांनी सर्व युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उद्या गुरुवारी दिनांक ४ ऑगस्टला सकाळी १०.३० वाजता सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले.महाराष्ट्रात सुरु असलेल्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात विस्तारित पीठाची, घटनापीठाची नियुक्ती करणार का, निवडणूक आयोगाच्या नोटिशीचं काय होणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता उद्यावर गेली आहेत. आज जवळपास दोन तास सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद झाले. त्यानंतर कोर्टाने उर्वरित सुनावणी ही उद्यावर नेली आहे.
शिंदे गटाने शिवसेनेत बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेकडून याचिका दाखल करण्यात आली. आज सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश एन.व्ही. रामन्ना यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय पीठापुढे ही सुनावणी पार पडली. एकनाथ शिंदेंच्या वतीने वकिल हरिश साळवे, निरज कौल यांनी युक्तिवाद केला. तर शिवसेनेच्या वतीने वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. तर राज्यपालांच्या वतीने वकील तुषार मेहता यांनी बाजू मांडली.
आजच्या सुनावणीतले महत्त्वाचे मुद्दे
उद्धव ठाकरे गटाचा युक्तिवाद
केवळ बहुमत आहे हे सांगून तुम्ही पक्षांतर बंदी कायद्याला हरताळ फासू शकत नाही
यांच्याकडे कायदेशीरदृष्ट्या केवळ एकच पर्याय उपलब्ध आहे तो म्हणजे विलीनीकरण, जो ते वापरत नाहीत
केवळ आमदार, खासदार म्हणजे मूळ राजकीय पक्ष नाही
एक गोष्ट अवैध ठरली की या घटनाक्रमातल्या अनेक गोष्टी अवैध ठरतात. सरकार, सरकारनं घेतलेले निर्णयही..ज्याचा करोडो लोकांवर परिणाम होतो. त्यामुळे या प्रकरणाची तातडीने सुनावणी होणं गरजेचं
शिंदे गटाचा युक्तिवाद
हे सरकार आम्ही पाडलेलं नाही, तर मुख्यमंत्र्यांनी स्वत:हून राजीनामा दिला.
अल्पमतातलं सरकार वाचवण्यासाठी पक्षांतर बंदी कायद्याची ढाल केली जाऊ शकत नाही
एखादा व्यक्ती, एखादं पद म्हणजे राजकीय पक्ष होऊ शकत नाही. आम्हाला आमचे मुख्यमंत्री भेटत नसतील तर एकत्रित निर्णयाचा अधिकार, आम्ही केलेली कृती हीपक्षविरोधी नाही तर ती पक्षांतर्गत बाब आहे.
पक्ष सोडलेलाच नाही, त्यामुळे पक्षांतरबंदीचा विषय गैरलागू ठरतो