टिळक नगर सारखं सुसंस्कृत टाऊनशिप.सुसंस्कृत असलं तरी पूर्वीच्या काळी तशा सोयीसुविधा कमीच. श्रीरामपूरला जायचं तर एसटी शिवाय पर्याय नव्हता. सर्वच गोष्टींना मर्यादा होत्या, तशा शिक्षणालाही होत्याच, मात्र अध्यापक वर्ग अतिशय उत्तम होता, आत्मीयतेने शिकवणारा आणि त्यामुळेच की काय संपूर्ण टाऊनशिप सुसंस्कृत झालं आणि काही विद्यार्थी तर चक्क टॉपर झाले.आशिष तरटे त्यातलाच एक टॉपर…
आशिष हा विसुभाऊ तरटे यांचा नातू आणि अरुण, अनिता तरटे यांचा मुलगा. घरातली शिस्त आणि अभ्यासाचे महत्त्व यामुळे आशिष अभ्यासात सतत गुणवत्ता यादीत असायचाच. उच्च शिक्षणासाठी संपूर्णपणे स्कॉलरशिप मिळवणारा *आशिष* कोपरगांवच्या कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनियर झाला आणि नाशिकच्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमधे R&D डिपार्टमेंट मध्ये लगेच रुजू झाला. अंगी असलेली गुणवत्ता आणि सतत नाविन्याचा ध्यास यामुळे दोन वर्षांपूर्वी महिंद्रा अँड महिंद्राच्या व्हाईस प्रेसिडेंट पदापर्यंत उंच उंच मजल आशिषने अगदी थोड्या कालावधीत गाठली. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी महोदयांच्या हस्ते सत्कार आशिषच स्वीकारेल अशी सूचना दस्तूर खुद्द आनंद महिंद्रा यांनी केली, कारण त्या यशात आशिषचा वाटा सिंहाचा होता.
पुढे सार ग्रुपच्या तीन मोठ्या पदांचा डायरेक्टर म्हणून दिल्ली येथे पदभार स्वीकारला खरा पण आशिषला घरची ओढ बेचैन करत होती.आणि संधी चालून आली …रिलायन्स मध्ये.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या इलेक्ट्रिक आणि डिझेल डिपार्टमेंटच्या एका भव्य प्रोजेक्टची उभारणी बेंगलोर येथे करण्याचा बहूमान आज आशिषला मिळाला आहे. ६५००० कोटी रुपयांच्या या अति भव्य प्रोजेक्टमध्ये चक्क मोनो रेलने फिरावे लागणार आहे.
आज आपल्या टिळक नगरचा आशिष आता रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्यानंतरचा तिसऱ्या नंबरचा मोठा अधिकारी CTO बनला आहे आणि आजच ३ ऑक्टोबर रोजी घटस्थापनेच्या दिवशी त्याने हा पदभार स्वीकारला आहे.
आशिष च्या या यशामध्ये त्याची सुविद्य पत्नी डॉ. सौ. मोनिका, धुळे येथे दोन वेळेस आमदार पद भूषविलेले त्याचे सासरे कै. डॉ. आर.बी. चौधरी आणि त्यांच्या पत्नी श्रीमती वीणाताई चौधरी यांचे धैर्य आणि मोठा पाठिंबा लाभला आहे.
अत्यंत हुशार, अनुभवी, कर्तव्यदक्ष, ध्येयवादी आशिषचे तसेच संपूर्ण तरटे परिवाराचे माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीस भरभरून शुभेच्छा!!!!
नंदन दीक्षित
निर्माता दिग्दर्शक
संचालक
निर्मिती मल्टी मिडिया
आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा email -jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा .. फोटो पाठवतांना आपल्या ग्रुप चे नाव आणि आपल्या शहराचा उल्लेख असावा
उद्या शुक्रवार दि, ४ ऑक्टोबर उद्याचा रंग- हिरवा