prsanna

शिक्षणाचा नवा आयाम : खेळ, संगीत आणि व्यायाम -भाग 3

बालक पालक नात्यावर आधारित बाल मानसशास्त्र व संगोपन लेखमाला :३६,लेखिका : आदिती मोराणकर

0

“आम्ही ना अलीकडे ऑरगॅनिकच खातो! फळ, भाज्या, अगदी पीठ सुद्धा!” “हो ना बाई, कशात काय भेसळ होईल सांगता येत नाही. त्यापेक्षा चार पैसे जास्त देऊन ऑरगॅनिक घेतलेलं बरं!”आपल्याच रोजच्या जेवणातल्या भाज्यांना, फळांना ऑरगॅनिक लेबल लागलं आणि आपण अचानक आपल्या तब्येतीबद्दल जागरूक झालो. मुलांच्या शिक्षणाला असं कुठलं लेबल लावलं तर तुम्ही मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत जागरूक व्हाल हा विचार मला खूप अस्वस्थ करतो. 

शिक्षणाचा नवा आयाम खेळ, संगीत आणि व्यायाम यात आज व्यायामाची बाजू मांडण्याचा प्रयत्न करते आहे. खरं पाहिलं तर शालेय जीवनानंतर व्यायाम हा प्रकार माझ्या आयुष्यातून बाद झाला आहे. योगा तर मी ‘योगायोगाने’ सुद्धा करत नाही. तरीही व्यायामावर बोलण्याचं कारण म्हणजे जसं तुम्ही कुठल्याही वयात व्यायाम करून फिट राहू शकता, तसंच एका विशिष्ट वयात केलेला बुद्धीचा व्यायाम तुम्हाला आयुष्यभर प्रगतीपथावर नेतो.

आपल्याला मार्केटिंगवाल्यांनी डेमो आणि सॅम्पलची वाईट सवय लावली. कुठल्याही गोष्टीचं उदाहरण दिल्याशिवाय किंवा ती गोष्ट सिद्ध केल्याशिवाय आपण त्या मार्गावर चालायला तयारच होत नाही. हरकत नाही, व्यायामाचे शिक्षणात महत्त्व असतं हे पटवून द्यायला मीही थोडावेळ मार्केटिंगवाली बनते आणि तुम्हाला चार प्रकारची उदाहरणे देते.आठवा, आपण जेव्हा शाळेत जात होतो त्या वेळेला पीटीचा तास आपली मोठी सुटका करायचा. वर्गातून आपण खूप उत्साहात बाहेर पडायचो आणि मैदानावर कितीही ऊन असलं तरी तिथे एका हाताच्या अंतरावर उभे राहून सामूहिक कवायत करायचो. आठवलं? शिक्षकांच्या तोंडातली शिट्टी, त्याच्या तालावर आपल्याच वर्गातला कोणीतरी मुलगा/ मुलगी ढोल वाजवणार, कोणाच्यातरी हातात बारीक सळीने वाजवायचा त्रिकोण आणि 1 म्हटलं की हात समोर, 2 म्हंटल की हात डोक्यावर, 3 म्हंटल की हात बाजूला आणि 4 म्हटलं की हात खाली किती मजेशीर होतं हे सगळं!

आपण कधी विचारही केला नाही की, आठवडाभरातून एकदा का होईना आपल्याला मैदानावर खेळायला का नेतात? आपला व्यायाम का करून घेतात? व्यायाम ही जरी शारीरिक हालचाल असली तरी त्याचा थेट संबंध आपल्या मेंदूशी असतो. एखाद्या शिकलेल्या गोष्टीचा पुन्हा पुन्हा सराव केला तर ती गोष्ट आपल्या मेंदूमध्ये कायमस्वरूपी साठवली जाते, कारण शिकणे हे मेंदूचं कार्य आहे आणि ते अविरत चालू असते. आपण जेवढा जास्त शिकण्याचा प्रयत्न करू तितक्याच प्रमाणात जास्त हालचाली आपल्या शरीराच्या व्हायला हव्यात. जेव्हा जेव्हा आपण शारीरिक हालचाली करतो त्या त्या वेळेला मेंदूमध्ये नवनवीन चेतापेशींची जाळी तयार होत असतात. त्या चेतापेशी एकमेकांशी संवाद साधत असतात आणि म्हणून जेवढा जास्त व्यायाम आपण मेंदूला देऊ तेवढा जास्त फायदा मेंदूचा होत असतो.

आपण जेव्हा व्यायाम करत असतो तेव्हा त्यात एका बाजूने अनेक गुंतागुंतीच्या प्रक्रिया घडत असतात. ज्यामध्ये मेंदूला सतत सजग राहावं लागतं. अनेक आदेश एकाच वेळी द्यावे लागतात. अनेक कार्यांचं आकलन मेंदूला करावा लागतं. यालाच मी “मेंदूचा व्यायाम” असे म्हटले आहे. मेंदूच्या कामांमध्ये शारीरिक आणि मानसिक दोन्ही क्रियांचा समावेश होतो.फार पुराणातले दाखले न देता अगदीच अलीकडचा जॉन मेदिना यांचा ग्रंथ तपासला तर त्यातलं पहिलंच प्रकरण व्यायामाविषयी आहे. त्यात त्यांनी आपल्या पूर्वजांचा दाखला देत सांगितले आहे की, “आपले पूर्वज खाण्यापिण्याची सोय करण्यासाठी सतत जंगलात फिरत असत. रोज सरासरी १२ मैल त्यांना चालावं लागत असे मगच पोटापाण्याची सोय होई. या चालण्याच्या व्यायामामधूनच त्यांच्या मेंदूचा विकास झाला आणि त्या उत्क्रांतीतून आज २०२३ मध्ये आपल्याला जी मानव जमात दिसत आहे ती निर्माण झाली.

पोटापाण्याचा प्रश्न मिटवण्याची प्राथमिक गरजेतून रोज १२ मैल चालण्याची क्षमता विकसित झाली. त्यातून उत्क्रांती होत गेली. शरीर सशक्त झाले पण आता मात्र लाखो वर्षाच्या या प्रवासानंतर आपण बैठ्या जीवनशैलीवर आलो.

मुलांच्या घराबाहेर अंगणात खेळण्याच्या संधी लुप्त होत गेल्या. मुलं बराचसा वेळ अभ्यासाच्या कारणाने आणि इतर वेळ मोबाईल बघण्यासाठी एकाच जागी चिकटून बसायला लागली. हे सगळं आपल्याला कुठे नेणार आहे ?याचा आपण अगदी शहाणपणाने विचार करायला हवा. जीवनाच्या अगदी सुरुवातीच्या उमेदीच्या काळात जेव्हा आपण मुलांचा मेंदू वेगवान करण्यासाठी व्यायामाची जोड द्यायला हवी नेमकं तेव्हाच आपण मुलांचा मेंदू आळशी बनवत आहोत. हा माझा आरोप नाही तर रोजच्या जीवनातला अनुभव आहे. यातून बाहेर पडायचं असेल तर सगळ्यात पहिले मुलांचे एका ठिकाणी बसणे कमी करा. ते व्यवस्थित हलतील, चालतील, धावतील, पडतील अशा जागा शोधा. त्यांना व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य द्या. अभ्यासाच्या नावाखाली तासंतास एकाच ठिकाणी न बसवून ठेवता थोडी शारीरिक हालचालींची मोकळीक द्या. रोज दोन तास मातीत खेळण्याची मुभा द्या. शिक्षणाच्या नव्या आयामाला व्यायामाची जोड द्या आणि आनंदाने पुढची पिढी घडताना बघा, शहाणं व्हा!

मेंदूचा अनेक तज्ञांनी अनेक अंगाने अभ्यास केला आहे, संशोधन केले आहे. त्यातीलच जॉन रेटी यांच्या म्हणण्यानुसार ‘व्यायामाने संपूर्ण मेंदूत जादुई विकास घडू शकतो’. जादुई विकास म्हणजे काय? तर जेवढा आपण मेंदूला व्यायाम देऊ तेवढाच प्रत्येक गोष्टीचा नवीन आयाम आपल्याला समजायला लागेल आणि यातूनच आपला सर्वांगीण विकास होईल. तासंतास कुठल्याही पुस्तकाचे धडे न गिरवता, कुठल्याही शिक्षकाची छडी न खाता, आनंदाने खेळत खेळत हा विकास साधता येतो म्हणूनच याला “’जादुई विकास” असे म्हटले असावे.

दुसरे एक शास्त्रज्ञ कार्ल कॉटमन यांना ADHD च्या रुग्णांवर शारीरिक व्यायामाचे अतिशय चांगले परिणाम आढळले होते. तसेच त्यांनी आजूबाजूच्या वृद्धांचा अभ्यास आणि निरीक्षण केले असता जे वृद्ध शारीरिक हालचाली सातत्याने करतात त्यांची मन ताजी तवानी असल्याचा निष्कर्ष कॉटमन यांनी काढला होता.  कार्ल कॉटमन यांनी मांडलेल्या सिद्धांतानुसार ‘शारीरिक हालचालींचा थेट संबंध मेंदूतील केंद्राशी असतो’ हे सिद्ध करायला काही प्रयोग केले. अर्थातच हे सगळे प्रयोग उंदरांवर करण्यात आले. व्यायामाचा आणि मेंदूत तयार होणाऱ्या रसायनांचा नेमका काय संबंध आहे याचे उत्तर शोधण्यासाठी कॉटमन यांनी उंदरांचे चार गट तयार केले. यातील एका गटातील उंदीर 2 रात्री धावणारे, दुसऱ्या गटातील उंदीर ४ रात्री, तिसऱ्या गटातील उंदीर ७ रात्री धावणारे तर चौथ्या गटातील उंदीर अजिबात न धावणारे होते. प्रयोगांती असे लक्षात आले की “जे उंदीर धावले त्यांच्या मेंदूत सकारात्मक रसायन तयार झाले. जे ४ रात्री धावले त्यांच्या मेंदूत हे प्रमाण अजून जास्त होते तर जे ७ रात्र धावले त्यांच्या मेंदूत जवळपास दुप्पट रसायन तयार झाले होते. या उलट जे उंदीर अजिबात झाले नाही त्यांच्या मेंदूमध्ये मात्र या रसायनाची कमतरता आढळून आली.” अधिक संशोधन केले असता ही नुसती रसायन निर्मिती नसून मेंदूमध्ये चेतापेशींना नवीन शाखा फुटलेल्या कॉटमन यांना आढळल्या.

चेतापेशीला जेव्हा नवीन शाखा फुटते तेव्हा शिकलेले साठवण्यासाठी एक नवीन जागा मेंदूमध्ये तयार होत असते, म्हणजेच नवीन काहीतरी शिकण्यासाठी नवे कोंब फुटणे अत्यावश्यक असते. आणि ही नवे कोंब फुटण्याची प्रक्रिया व्यायामामधून सहज साध्य आहे हे प्रयोगांती सिद्ध झाले. व्यायामाचे हे अंगभूत वैशिष्ट्य असल्याचं लक्षात तर आलंच पण व्यायामामुळे नवे कोंब फुटले, ज्याने शिकण्याच्या वेगात वाढ झाली, शारीरिक अवस्था उत्तम झाली आणि म्हणूनच शिकण्यामध्ये आणि इतर कामांमध्ये कार्यक्षमता वाढली.२००७ मध्ये काही संशोधकांनी अजून एक प्रयोग केला. त्यांनी काही शब्द लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला आणि थोडा वेळाने ते शब्द परत आठवण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांनी थोडा व्यायाम केला आणि मग दुसरे शब्द लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला. व्यायामानंतर जे शब्द त्यांनी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला होता ते जवळपास २०% वेगाने त्यांच्या लक्षात राहिले होते. याचाच अर्थ व्यायामानंतर मेंदूचा शिकण्याचा वेग आणि लक्षात ठेवण्याची क्षमता या दोन्ही मध्ये एक सकारात्मक बदल झालेला होता.

मग आता शिक्षणाच्या नवीन आयामात व्यायामाचा समावेश व्हायला हवा यावर तुमचे एकमत झाले असेल ना! जर तुम्हाला महत्व पटलं असेल तर ‘हा व्यायाम मुलांपर्यंत कसा पोहोचवायचा?’ या दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊया. मुलांना व्यायाम शिकवण म्हणजे त्यांना आपल्यासारखं एक हाताच्या अंतरावर उभे राहून सामूहिक कवायत करायला लावणं असं माझं म्हणणं नाही.

व्यायाम शिकण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होऊन मुलं स्वतःहून शिकण्यासाठी तयार झाली पाहिजे हे आपलं उद्दिष्ट हवं. हे कसं साध्य करता येईल? आणि पोषक वातावरणच का हवं यासाठी सुद्धा तुम्हाला एक प्रयोग सांगते. प्रसिद्ध शास्त्रज्ञ डोनाल्ड हेब यांनी त्यांच्या प्रयोगासाठी काही उंदीर पाळले होते. ते त्यांच्या मुलांच्या आग्रहाखातर प्रयोगशाळेतील काही उंदीर घरी घेऊन गेले. काही दिवसांनी प्रयोगासाठी घरी नेलेले उंदीर त्यांनी परत प्रयोगशाळेत आणले आणि त्यांच्या असं लक्षात आलं की ‘जे उंदीर घरी नेले होते, मुलांना खेळण्यासाठी म्हणून दिले होते, त्या उंदरांची शिकण्याची क्षमता इतर उंदरांपेक्षा वाढली होती. म्हणजेच उंदरांच्या मेंदूमध्ये बदल झाला होता. हेबने मुलांसाठी नेलेले उंदीर हे वेगळ्या वातावरणात गेल्यामुळे तिथल्या वातावरणाशी जमवून घेताना त्यांना जास्त हालचाली करावा लागल्या. अर्थात त्यांचा जास्त व्यायाम झाला. त्यांच्यासमोर नवनवीन आव्हाने येत होती, ती आव्हाने पार करण्यासाठी त्यांच्या मेंदूला सजग राहावे लागत होतं आणि ही आव्हाने कशी पार केली याची साठवण त्यांच्या मेंदूमध्ये होत होती. त्यांचा शिकण्याचा वेग आणि क्षमता दोन्ही वाढले होते.

मुलाशी खेळताना मुलांनी लपवून ठेवलेलं अन्न शोधणे, मुलांनी काही वस्तू फेकली की त्या वस्तू मागे धावणे, मुलांनी आखून दिलेल्या रेसिंग ट्रॅक वर स्वतःला सांभाळत पळत जाणं, या अशा काही प्रयोगांमुळे उंदरांचा केवळ शिकण्याचा वेगच नाही, तर मेंदूत प्रत्यक्षात बदल होऊन मेंदूचे वजनही वाढलेले होते.

एका इटुकल्या पिटुकल्या उंदरावर, त्याच्या चिमुकल्या मेंदूवर जर व्यायामाचा इतका परिणाम होऊ शकतो, इतका जादुई विकास त्या उंदराचा होऊ शकतो तर “रॅट रेस” मध्ये धावणारी आपली मुलं यापासून वंचित का? मुलांमधल्या स्पर्धेला जर आपण “रॅट रेस”  म्हणत असू तरी या रॅट रेस मध्ये टिकून राहायला त्यांना देखील व्यायामाची गरज आहे. शारीरिक हालचालींची गरज आहे. ‘शरीराची हालचाल करून नवनवीन गोष्टी शोधून मेंदूला संपन्न करण्याचं मोठं काम लहान वयातच मुलं जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतात’. मग आता “त्यांना लहान आहे आत्ताच शिस्त लागली पाहिजे”, “आम्ही सांगतो तेच, आम्ही सांगतो तेवढंच आणि आम्ही सांगतो तसंच झालं पाहिजे” असे दुराग्रह बाजूला ठेवून मुलांना स्वतःहून शिकता येईल, त्यांच्या मेंदूसाठी उपयुक्त हालचाली मुलांकडून होतील, खेळता खेळता काही नवीन गोष्टी त्यांच्या मेंदूमध्ये शिरतील अशा प्रकारचं वातावरण आपण तयार करायला हवं. त्याने मुलांच्या मेंदूला नवीन खाद्य मिळेल चेतापेशींना नवीन कोंब फुटतील आणि तुम्ही मुलांसाठी बघितलेली स्वप्न नव्याने अंकुरतील. भेटूया पुढच्या रविवारी, धन्यवाद!

आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)
संचालिका : ईस्कुलिंग डिजीस्मार्ट किंडरगार्टन व डे केअर सेंटर.
eskooling2020@gmail.com | 8329932017 / 9326536524
Aditi Morankar
आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!