लिंगबदलावर उघड भाष्य करणारं कथानक :चंडीगड करे आशिकी

एनसी देशपांडे

2

पार्श्वभूमी
भारतीय संस्कृती आजही पुरुष प्रधा न आहे. जातीयभेद जरी काही प्रमाणात नाहीसा होण्याकडे प्रवास करीत असला तरीही राजकारणी मंडळींचा हुकुमाचा एक्का आहे. परंतु सुशिक्षित तरुण पिढी मात्र जात-पात अजिबातच मानायला तयार नाही. आयुष्याचा जोडीदार निवडतांना या विषयाला सर्रासपणे फाटा दिलेला आढळतोय. मात्र स्त्री-पुरुष हा लिंगभेद आजही समाजात पूर्णपणे रुजलेला दिसतोय आणि त्यावर सर्वांचं एकमत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत ‘लिंगबदल’ करून घेतलेल्या व्यक्तीला आपल्या आयुष्याचा जोडीदार बनवण्याचा, आजच्या पुरोगामी विचारसरणीतही शक्य नाही. कितीही धाडसी विचारसरणीची व्यक्ती असली तरीही हा विषय म्हणजे पायाखालची जमीन हादरवणाराच आहे. जगाने कितीही या विषयाला स्वीकारलं असलं तरीही भारतात हे कदापि मान्य होणार नाही, हे तितकंच खरं. शिक्षण क्षेत्र कितीही पुढारलेलं असलं तरीही लैंगिक विषयावरील विचारधारा आणि सामाजिक मानसिकता यामध्ये किंचितही फरक पडलेला नाही.

या अत्यंत धाडसी विषयाला अनुसरून दिग्दर्शक अभिषेक कपूर याने चंडीगड शहराची निवड करून हा विषय मांडण्याचा आणि स्वीकार होण्याचा प्रयत्न केलाय, तो कितीपत यशस्वी झालाय हे समाजानेच ठरवायचंय. कारण या विषयाबाबतची नकारात्मकता केवळ अज्ञान आणि अर्धवट माहिती यावरच बेतलेली आहे.

कथानक
विधुर आजोबा आणि वडील. सोबत दोन अविवाहित पुत्रवत प्रेम करणाऱ्या बहिणींच्या निगराणीखाली वाढलेला मनु मुंजाल (आयुषमान खुराणा), स्वत: पहिलवान असून एका जिमचा मालक-चालक आहे.  वडील पत्नी-वियोग विसरून नव्या घरोब्याचा विचार करत आहेत.परंतु तिथेही हिंदू-मुसलमान ही जातीय तेढ आडवी येतेय. आपल्या पोराचं लग्न झाल्याशिवाय आपण आपल्या लग्नाचा विचार घरात मांडू शकणार नाही, याची पूर्ण जाणीव असल्याने ‘झुरणे, अगतिक होणे आणि पोराच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहणे’ यात व्यस्त आहेत. मुलगा मनु मात्र चंदिगढचा सर्वोत्कृष्ट पहिलवान होण्याची मनीषा, दोघी बहिणी आपल्या एकुलत्या एक भावाकडे अतिशय बारकाईने लक्ष ठेऊन आहेत, असं हे विचित्र कुटुंब.

जिमचा व्यवसाय फारसा काही चालत नसतो, गर्दी खेचण्याच्या उद्देशाने मनुचे पंटर, जिमची थोडी जागा ‘झुम्बा टीचर मानवी ब्रार’ ला भाड्याने देण्याचं ठरवतात. मनुला हा प्रकार फारसा आवडलेला नसतो. परंतु तिच्या वाढत्या व्यवसायामुळे जिममधली गर्दी त्याला स्वस्थ बसायला भाग पाडते.त्यांच्यातील संवाद तसे तुटक-तुटक असतात, परंतु तिच्या विचारातील प्रगल्भता, खोली आणि सत्यता त्याला सकारात्मक विचार करायला भाग पाडते. त्यानंतर स्वाभाविकपणे तो तिच्याकडे खेचला जातो. तिच्या विचारांचा आदर करतो आणि तिच्या प्रेमातही पडतो.

मनु मुंजाल हा साधारण कुटुंबातला साधा सरळ मुलगा. घरच्यांचा लाडका. मानवी ब्रार हि गर्भश्रीमंत खानदानाची, स्वतंत्र विचारांची आणि सर्वांग सुंदर मुलगी. एकुणात मनूच्या आचर-विचारांच्या प्रेमाने तीही प्रभावित होते आणि त्याच्या स्वाधीन होते. त्यांच्यातील शारीरिक संबंध दोघांनाही आनंददायी ठरतात. मनुच्या घरच्यांनाही ती खूपच आवडलेली असते. दोघंही लग्नाच्या विचारात असतान, मानवी आपला भूतकाळ त्याच्या समोर मांडते आणि सर्वच चित्र पालटून जातं. कारण हा विषयच स्वीकारण्या जोगा नाही.

विषयाचं गांभीर्य
मानवीचा जन्म एका मुलाचा होता परंतु लहानपणापासून तिला मुलीसारखं जगाव असंच वाटायचं. पुढे मोठी झाल्यावर तिने आई-वडिलांच्या विरोधात जाऊन लिंगबदलाची शस्त्रक्रिया करून घेतली असते. आपल्या नवीन आयुष्याचा आपल्या आई-वडिलांना त्रास होऊ नये म्हणून ती त्यांच्या पासून दूर वेगळी रहात असते. या विषयाच्या बाबतीत मनु पूर्णत: अनभिद्न्य असतो. मानवी जेव्हा हा सगळा प्रकार त्याला सांगते तेव्हा तिने आपल्याला धोका दिलाय, यापेक्षा कोणतीही भावना त्याच्या मनाला शिवत नाही.मग अर्थातच तो तिचा तिरस्कार करायला लागतो आणि घरच्यांना हा एकुणात प्रकार कळल्यानंतर तेही पूर्णत: मानवीच्या विरीधात उभे राहतात, अगदी  साहजिकपणे.

दिग्दर्शन
एकतर असा विषय समाजासमोर मांडण्याचं धाडस केवळ अभिषेक कपूरच करू जाणे. कारण यापूर्वी त्याने बॉलीवूडच्या चाकोरीनुसार रूढ विषय कधीही हाताळले नाहीत. काश्मीरमधील समस्या. हिंदू-मुस्लीम जातीय तेढ असे समकालीन विषय प्रेमकथातून मांडण्याचा प्रयत्न त्याने केलाय आणि तो यशस्वीही झालाय. परंतु हा विषय मांडतांना त्याने बहुतांशी यशस्वीतेचा विचार जास्त केल्याने मूळ विषय बराचसा भरकटलेला दिसतो. प्रेम-कथा या विषयातून प्रेक्षक चित्रपटाकडे खेचला जाईल हा त्याचा होरा जरी चुकला नसला तरीही मूळ विषयाकडे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्टपणे जाणवते.

कास्टिंग
आजवर हलके-फुलके रोल करून आपलं स्थान बळकट करणारा आयुषमान खुराणा, एका पाहिल्वानाच्या भूमिकेसाठी निवडून थोडी रिस्क घेतली असली तरीही या भूमिकेसाठी त्याने मेहनत घेतल्याचे कौतुक करावेच लागेल. लाडाकोडात वाढलेला मनु जरी पहिलवान असला तरीही मुलत: मनाने हळवाच आहे. त्यामुळेच तो मानवीच्या कथनाने उध्वस्त होतो. मानवीच्या भूमिकेसाठी वाणी कपूर हिची निवड सुद्धा धाडसाचीच, कारण आजवर तिला इतका मोठा रोल कधीही मिळालेला नाही. परंतु तिने या संधीचं सोनं केलंय, असं निश्चितपणे म्हणता येईल. आपलं एक मुलगी म्हणून दिसणं, रूप-सौंदर्य, आपला लिंगबदलाचा निर्णय योग्यच होता आणि आपण आनंदी आहोत, हा आत्मविश्वास तिने सक्षमपणे दाखवलाय. मनुच्या प्रत्येक गोष्टीकडे ती विचारपूर्वक बघत असते. त्याच्यावर चिडून काहीच उपयोग नाही, याची तिला पूर्ण जाणीव आहे. त्याचं स्वच्छ मन तिने पूर्णपणे ओळखलं असतं.

सारांश
लिंगबदल हा विषय आजही भारतात स्वीकालेला नसल्याने, त्यांच्या वेदना आणि व्यथा या विषयी फारशी माहिती आणि जाणीव समाजाला अजिबात नाही. त्यामुळे हा विषय जरी समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला असला आणि त्याबद्दल त्याचं कौतुक जरी केलं तरीही मुळात या विषयाकडे बरंच दुर्लक्ष झाल्याने मूळ उद्देश बाजूला रहातो आणि हि केवळ एक प्रेमकथाच उरते. शेवट गोड होतो आणि प्रेक्षक सुखावतात, हेच काय ते फलित!
एनसी देशपांडे
९४०३४९९६५४

N C Deshpande
एनसी देशपांडे

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

2 Comments
  1. Anita says

    Nice analysis..must see

  2. Sanjay Gite says

    उत्तम परीक्षण NC ची एक खास शैली आहे नक्कीच पहावा लागेल चित्रपट

कॉपी करू नका.