प्रस्तावना १
ऑक्टोबर १९८७ मध्ये ‘झुलवा’ हे केंद्रेंचे आणि ४२ नवोदित कलावंतांचे पहिलेच नाटक. त्यातूनच सुकन्या कुलकर्णी, सयाजी शिंदे, गौरी केंद्रे, चेतन दातार, अदिती देशपांडे, छाया कदम, आशा शेलार, राजेश देशपांडे, मिलिंद शिंदे अशी कलेच्या क्षेत्रात स्थिरावलेली मंडळी आजही कार्यरत आहेत. त्यानंतर १९९१ साली पुन्हा तब्बल २० नवोदित कलाकारांना घेऊन ‘रणांगण’ हे नाटक सादर केले. ज्यामध्ये ‘अविनाश नारकर’ हेच एकमेव परिचित नाव होते. यातूनच प्रसाद ओक, अशोक समर्थ आणि उमेश कामत, सौरभ पारखे, सचित पाटील, शीतल क्षीरसागर, श्रीकांत देसाई, अनिल गवस, विजय मिश्रा असे उत्तमोत्तम कलाकार मराठी रंगभूमीला लाभले आणि स्थिरावलेही.
त्याचमुळे प्राध्यापक वामन केंद्रे यांनी सादर केलेली कलाकृती म्हणजे निश्चितपणे काहीतरी अजब-गजब अनुभवायला मिळणार या अपेक्षेनेच रसिक प्रेक्षक थिएटरमध्ये दाखल होतात. खरं तर याही वेळेला कलाकारांच्या नामावलीत एकही ओळखीचं नाव नाही. तरीही या नाटकाला प्रेक्षकांचा लाभलेला प्रतिसाद हा केवळ ‘वामन केंद्रे’ या एकमेव नावामुळेच, हे निश्चित! एकुणात जागतिक रंगभूमीचा सखोल अभ्यास असलेलं हे व्यक्तिमत्व, आपल्या प्रतिमेला साजेल अशीच कलाकृती सादर करणार, ही खात्री असल्यानेच रसिकांचा भरघोस प्रतिसाद लाभतोय आणि आतातर ‘माऊथ पब्लिसिटी’ मुळे श्रेय्यनामावली बघायची गरजच कुणाला वाटत नाही. अगदी खरं सांगायचं तर तब्बल २१ वर्षांच्या कालावधीनंतर ‘मराठी रंगभूमीवर’ केंद्रेनी सादर केलेली ही वास्तववादी, क्रांतिकारी आणि धगधगती कलाकृती जागतिक रंगभूमीवर विशेष नोंदनीय ठरणार, हे सांगायला कोणा ज्योतिषाची अजिबात गरज नाही. हे एक अभियान असल्याने वलयांकित कलाकारांच्या मांदियाळीची या अभियानात गरज केंद्रेंना अजिबात वाटली नाही. प्रचंड आत्मविश्वास आणि पूर्णत: युवा कलाकारांची फौज, कसदार संहिता, गीत-संगीत, नृत्य आणि नाट्य अशा सर्वच कलांनी समृद्ध अशा या कलाकृतीला केवळ एक नाटक म्हणणं निश्चितपणे योग्य नाही.
प्रस्तावना 2
स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळची माता आहे आणि जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी, या केवळ म्हणी नसून मानवी जीवनाचं वास्तव आहे. भारत हा पुरुष-प्रधान देश आहे आणि केवळ अर्थार्जन आणि कुटुंब संरक्षण या दोन गुणांवर हे प्रधानपद पुरुषाकडे गेलं. परंतु स्त्रियांमधील सहनशीलता, समजूतदारपणा, क्षमाशीलता आणि आक्रमकता हे जन्मजात गुण प्रसंगानुरूप वापरण्याची कला पुरुषात निश्चितच नाही. अगदी पुराणकाळापासून आजतागायत स्त्रियांनी आपल्या गुणांनी जगाला सावरण्याचं महनीय कार्य केलं आहे. जगाचा उद्धार करणाऱ्या अनेक स्त्रियांची नामावली या निमित्ताने इथे देता येईल, परंतु तो आपला आजचा विषय नाही. वरील वास्तव आपल्या सर्वांच्या लक्षात आणून देण्याचं कारण एवढंच की लेखक, दिग्दर्शक प्रा.वामन केंद्रे यांनी सदरील कलाकृतीच्या माध्यमाने हाच विषय अतिशय सुंदरपणे मांडल्याचं अगदी आवर्जून सांगावसं वाटतं.
सादरीकरण
पडदा बाजूला सरताच दिसतो तो आडवा चौथरा,स्त्री-कलाकार संगीत आणि नृत्याच्या लयीत प्रेक्षकांना आपलंसं करतात. आपण एखाद्या काल्पनिक राज्याचा एक भाग होऊन जातो. रंगमंचावरील राजा, प्रधान आणि जिंकण्याच्या इर्षेने प्रेरित लढाईसाठी सज्ज सैनिकप्रेक्षकांवर ताबा मिळवतात. राजा, प्रधान आणि जिंकण्याच्या इर्षेने लढाया निघालेले सैनिक, सोबतच त्यांच्या पत्नी नाचता गाजत त्यांना निरोप देतात. हा अत्यंत महत्वाकांक्षी राजा, प्रधान आणि या सैनिकांच्या माध्यमातून लेखकाने आजच्या सत्तापिपासू आणि रक्तपिपासु राजकारणी मंडळी आपल्यासमोर उभी केली आहेत. संपूर्ण जगावर आपलीच सत्ता असावी ही राजाची महत्वाकांक्षा आणि सैनिकांमध्ये ‘आत्मविश्वास, जोश आणि वीरश्री’ जागवणारा प्रधान प्रेक्षकांना अनेक संदर्भांची आठवण करून देतात. शत्रूराज्यावर मात मिळवून २१ हजार अबलांचा काफिला, त्यांच्यावर झालेले अत्याचार आणि त्यांची अगतिकता या राज्यातील स्त्रियांना हादरवून टाकते. त्यांच्यातील ‘स्त्री, माता आणि स्त्री-शक्ती’ हादरून जाते, मुलापासून उखडते, गळीतगात्र होते. मग ‘खरे गं सखे, आसवे नको ढाळू गं’ या गाण्यातून त्या एकमेकींचे सांत्वन करतात. परराज्यातील स्त्रियांवर झालेले अत्याचार त्यांना बघवत नाहीत आणि त्यांच्यातील ‘लक्ष्मी’ स्त्री-रक्षणाच्या भूमिकेतून आपल्या सख्यांना ‘जागवते, खडसावते आणि चेतवते’. आपण काय करतो आहोत, युद्धवीरांवर फुले उधळवून त्यांच्या स्त्री-वासना शमविण्यासाठी आतुर आहोत, हे चुकीचं आहे. किंबहुना हेच आपलं अस्त्र आहे. आपण याच अस्त्राचा वेळीच आणि सुयोग्य वापर करून त्यांच्यातील युद्धपिपासू वृत्ती शमविली पाहिजे असा सल्ला देते, त्यांना मनवते आणि वचनबद्ध करते. इथूनच युद्ध-विरोधाची ठिणगी पडते. त्यांच्या या विचारधारेला प्रेक्षकांचाही प्रतिसाद लाभतो आणि संपूर्ण प्रेक्षागृह युद्धाचा विरोध करण्याच्या पवित्र्यात तयार होतं.
मग अर्थातच युद्धाच्या पार्श्वभूमीच्या विचारांमध्ये सगळेच गुंतून जातात. अनेक प्रश्नांची मालिका मनात गुंजन घालायला लागतात. पुराणकाळापासून युद्ध केली जात आहेत, तरीही युद्धाची इर्षा अजिबात कमी होतांना दिसत नाही. मानव जातीवर युद्धाचे भयाण वर्षोनुवर्षे करीत असूनही युद्धे संपतच नाहीत. हार-जीतच्या पलीकडे एकुणात कुटुंब व्यवस्थेवर, समाजावर आणि पुढील पिढीवर होणारे दुष्परिणाम याचा विचार मानवाला शिवतच नाही का? हा एक भयानक सवाल सर्वांसमोर उभा थकतो. आता पुढे काय होणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना खिळवून ठेवते. लक्ष्मी सर्व सख्यांना एकत्र आणते तेव्हाचा तिचा आवेश, शब्दांची फेक, चेहऱ्यावरचे हावभाव, डोळ्यांच्या हालचाली केवळ अप्रतिम!
लक्ष्मी या पात्राचा एकुणात पवित्रा लेखक आणि दिग्दर्शकाने असा काही बांधला आहे की ज्यामुळे संपूर्ण नाटकाचा भार आणि समतोल राखला आहे. शिवाय आपल्या सखींना जागं करणं, त्यांच्यात विरोधाची ज्योत पेटवून त्यांना बंडासाठी तयार करणं, पुरुषांची गरज ओळखून गणीकांना विश्वासात घेऊन त्यांनाही सोबत घेणं. लक्ष्मीच्या हातात कोणतीही सत्ता नसतांना केवळ विचार, निर्धार, नेतृत्व, आखणी, आयोजन, भाषणबाजी, सर्वांना एकत्र आणण्याची कला आणि मार्गक्रमण या सगळ्या गुणांच्या आधारे सत्ताधीशांना नामोहरम करण्यास पुरे पडतात, यातच या पात्राची उंची, लांबी आणि खोली दर्शवण्यास पुरेसी आहेत. परंतु दिग्दर्शकाला या भूमिकेसाठी कोणत्याही प्रसिद्ध कलाकाराला सोबत घेण्याची गरज वाटली नाही, यातच लेखक-दिग्दर्शकाचा प्रचंड आत्मविश्वास आणि या कलावतीवरील (करिष्मा देसले) भरवसा दिसून येतो. केंद्रेपुत्र ऋत्विक राजाच्या भूमिकेत शोभला आहे. सर्वच कलाकारांनी आपापली जबाबदारी पूर्णपणे निभावली आहे. या गंभीर विषयाच्या कलाकृतीमध्ये विनोदाची गरज केवळ सद्यपरिस्थितीशी तुलनात्मक असावी, अन्यथा गरज नव्हती. शिवाय गाणं, नाचणं आणि अभिनय या तीनही कलांना एकाचवेळी सादर करणं, हे खरं तर फार कठीण काम, परंतु नवोदित कलाकारांकडून उत्तम काम करून घेण्याची हातोटी, ही केंद्रेसरांची हातोटी याही वेळेला यशस्वी सिद्ध झाली. रंगमंचावर सतत हालचाल, संगीत आणि नृत्य अशा सादरीकरणातून प्रेक्षकांना मोहित करण्याचा हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. सादरीकरण हाच या कलाकृतीचा भरभक्कम आधार आहे. याला कथानकाची गरजच नाही, केवळ एक विचार समाजामध्ये रुजवण्याचा हा एक अट्टाहास आहे.
श्रेय्य नामावली
कलाकार – करिष्मा देसले, श्रुती हळदणकर, तेजस्विनी कुराडे, वैष्णवी घोडके, मोहुका गद्रे, अंकिता देसाई, सांप्रती पाटील, श्वेतनील सावंत, तन्वी धुरी, संस्कृती जाधव, समृद्धी देसाई, ऋत्विक केंद्रे, मंदार पंडित, सचिन जाधव, अमोल जाधव, मंगेश शिंदे, सुमित भालेराव, अनुप हरिश्चंद्रे, दर्शन रायकर, रोहित कुलकर्णी, महेश जगताप, मनीष जाधव आणि महेश महालकर.
संगीत संयोजन – प्रशांत कदम आणि सुभाष खरोटे, नृत्य दिग्दर्शन – अनिल सुतार, प्रकाश योजना – शीतल तळपदे, रंगभूषा – उल्लेश खंदारे आणि वेशभूषा – एस.संध्या, या सगळ्यांनी लेखन, दिग्दर्शन आणि संगीताची धुरा समर्थपणे सांभाळणारे प्रा.वामन केंद्रे बरहुकूम आपापली जबाबदारी पेलली आणि ही कलाकृती सादर यशस्वीपणे सादर केली आहे.
सारांश
या कलाकृतीची संहिता निश्चीतपणे दमदार, कसदार आणि असरदार असली तरीही व्यावसायिक रंगभूमीवर सादर करण्याचं धाडस निश्चितपणे वाखाणण्याजोगंच आहे. मराठी नाट्य-रसिकांना प्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक, कलाकार, उत्तम संगीत आणि इतर तंत्रज्ञान याची इतकी सवय झाली आहे की, नवीन काही बघायची तयारीच नसते. परंतु ‘प्रा.वामन केंद्रे’ याला अपवाद आहेत. ही कलाकृती सादर करतांना ‘प्रा.वामन केंद्रे’ यांनी काव्य, संगीत, नृत्य यासह वास्तववादी AV च्या माध्यमातून प्रेक्षकांना अचंबित केलं आहे.
एनसी देशपांडे
मोबाईल-९४०३४९९६५४
