मलाही मारण्याचा कट होता..!अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नीचा गंभीर आरोप
या दोघांना मारणारा तिसरा कोणी होता का ? याचा तपास करा :विनोद घोसाळकर
मुंबई,दि,१९ मार्च २०२४ – उद्धव ठाकरे गटाचे नेते व माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर याची ८ फेब्रुवारी रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. फेसबूक लाईव्ह सुरू असतानाच ही हत्या झाल्याने या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली होती.या घटनेनंतर दीड महिन्यांनी अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी गंभीर आरोप केला आहे.पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या की, मॉरिसने ज्या कार्यक्रमासाठी बोलावले होते त्या कार्यक्रमाला मला घेऊन या असे सांगण्यात आले होते. मात्र मला उशीर झाल्याने अभिषेकने मला दुसऱ्या कार्यक्रमाला जाण्याचा फोन केला, याचा अर्थ त्यांचा मलाही मारण्याचा कट होता.मात्र माझ्या दोन मुलांचे नशीब चांगले म्हणून मला तेथे जाता आले नाही.
या घटनेनंतर दीड महिन्यांनी अभिषेक घोसाळकर यांचे वडील विनोद घोसाळकर व पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी समोर येऊन तपासावर नाराजी व्यक्त करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना याबाबत सवाल केले आहेत.
दरम्यान, सध्या लोकसभा निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असताना अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आणि वडील विनोद घोसाळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी आज (१९ मार्च) पत्रकार परिषद घेत, हे आरोप केले आहेत.
विनोद घोसाळकर यांनी म्हटले आहे की, या घटनेनंतर पार्थिवाची अग्नि शांत होण्याअगोदर देवेंद्र फडणवीस, उदर सामंत व छगन भुजबळ यांनी बेजबाबदार विधाने करत लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात ली. त्यावर गाडीखाली श्वान आला तरी विरोधक राजीनामा मागतील, अशी खोचक प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली होती. तर हा ठाकरे गटातील अंतर्गत वाद असल्याचे सामंत म्हणाले होते. आपापसातील भांडणात कोणी गोळीबार करत असेल तर पोलीस आणि मंत्री काय करणार असा वादग्रस्त वक्तव्य भुजबळ यांनी केलं होतं.
त्याचबरोबर अभिषेक यांच्या हत्येबाबत आम्हाला संशय आहे. मॉरिसने स्वतःवर गोळी मारताना लाईट कशी बंद केली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी आम्ही पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज दिले आहेत. या दोघांना मारणारा तिसरा कोणी होता का? याचा तपास करा अशी आमची मागणी असल्याचे विनोद घोसाळकर यांनी म्हटले.
आम्ही न्यायालयात रिट याचिका दाखल करतोय.पोलिसांनी आम्हाला चौकशीसाठी बोलावले नाही. मी आता कुठल्या राजकीय व्यक्तीचे नाव घेणार नाही,असे म्हणत पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करावा अशी मागणी विनोद घोसाळकर यांनी केली.तसेच आमच्या नगरसेवक यांच्यावर दबाव टाकला जातोय. राजकारणी लोक निवडणुकीच्या तोंडावर पोलिसांवर दबाव टाकत आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.