नाशिक,१६ मे २०२३ –नाशिक मध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाचा निर्णय आपल्या बाजूने लावून देण्याच्या बदल्यात तीस लाखाची मागणी करणाऱ्या जिल्हा उपनिबंधकाला तीस लाखाची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधिक्षक अभिषेक पाटील व पथकाने त्याला व वकिलाला रंगेहाथ पकडले.
या बाबतमिळालेल्या माहिती नुसार तक्रारदार दिंडोरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदी कायदेशीर व वैध पद्धतीने निवडून आले आहेत. त्याच्या निवडी विरोधात दाखल झालेल्या प्रकरणावर सुनावणी घेऊन ती सुनावणी तक्रारदार यांच्या बाजूने लावून निर्णय देण्यासाठी जिल्हा उपनिबंधक सतिश भाऊराव खरे (वय ५७) राहणार फ्लॅट नंबर २०१, आई हाईटस, कॉलेज रोड, नाशिक व खाजगी इसम वकील शैलेश सुमातीलाल सभद्रा (वय ३२) राहणार गंगापूर रोड, नाशिक यांनीतक्रारदार यांच्या कडे सुमारे तीस लाख रुपयांची मागणी केली.
आज संध्याकाळी उपनिबंधक खरे याच्या राहते घरी तीस लाखाची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधिक्षक अभिषेक पाटील व पथकाने त्याला व वकिलाला रंगेहाथ पकडले. नाशिक शहरात सहकार क्षेत्राचे मोठे जाळे असून किती बँका, पतसंस्था, बाजार समिती अश्या संस्थेकडून लाच घेतली असेल याचा तपास विभागाने करावा, अशी मागणी होत आहे.