नायलॉन मांजा खरेदी-विक्री करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा -अंबादास खैरे

0

नाशिक दि.२१ डिसेंबर २०२२ – जीवघेण्या नायलॉन मांजा विक्री व तो मांजा खरेदी करणाऱ्या दोघांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी असे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी नाशिक पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना दिले आहे.

संक्रात सण जवळ येत असून पतंगोत्सव करणारे प्रेमी वेगवेगळ्या पद्धतीचा मांजा वापरून पतंगोत्सव साजरा करत असतात. परंतु मागील काही वर्षापासून जीवघेण्या नायलॉन मांजाचा वापर वाढत असून जीवघेण्या नायलॉन मांजाच्या वापरामुळे अनेकांना आजपर्यंत आपले प्राण गमवावे लागले आहे तर कित्येक जण जखमी झाले आहे. न्यायालयाचा आदेश झुगारून बंदी असतानाही नायलॉन मांजाची विक्री नाशिक शहरात होत आहे. नाशिक शहरात नायलॉन मांजाचा वापर वाढल्याने अनेक ठिकाणी या जीवघेण्या मांजाची सर्रास विक्री होताना पहावयास मिळत आहे. याबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत असताना देखील प्रशासन ठोस पाऊले उचलताना दिसत नाही. मांजामुळे अनेकांच्या जीवावर बेतले आहे. धारदार नायलॉन मांजामुळे अनेकांना गंभीर दुखापत झाल्याचे निदर्शनास येत असते.

संक्रांतीच्या काळात हजारो पक्षी नायलॉन मांज्यामुळे पंख व मान कापून मृत पावतात. तर दुचाकीधारकाना यामुळे अपंगत्व आलेले आहे.  बाजारात नायलॉन मांजा विरोधात धाड सत्र राबविले जाते मात्र तरीही नायलॉन मांजा विक्री सर्रास सुरु आहे. नाशिक शहरात या बेकायदेशीर कृत्याला यातून खतपाणी मिळत असल्याने यावर तात्काळ बंदी आणून नायलॉन मांजा विक्री करण्यासोबत खरेदी करणाऱ्यांवर सुद्धा मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी जेणेकरून विक्री करणारा व खरेदी करणाऱ्यांवर धाक निर्माण असे निवेदनात म्हटले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!