मुंबई – अभिनेता आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक आदिनाथ कोठारेचा गेल्या वर्षी बॉलीवूड डेब्यू झाला. कबीर खान दिग्दर्शित ८३ ह्या बिग बजेट मल्टिस्टारर सिनेमातून आदिनाथ एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसला तर नागेश कुकनूर दिग्दर्शित सिटी ऑफ ड्रिम्स ह्या वेबसीरीजमधून त्याने डिजीटल विश्वातही पदार्पण केले.त्यामूळे आदिनाथ आता नव्या कोणत्या बॉलीवूड प्रोजेक्टमधून दिसेल.
ह्याविषयी त्याच्या चाहत्यांना उत्सुकता असतानाच त्याच्या रोहन सिप्पीसोबत नुकत्याच दिसलेल्या फोटोने आता ही उत्सुकता अधिकच चाळवली आहे.सूत्रांनुसार, “आदिनाथ स्वत: निर्माता-दिग्दर्शक असल्याने आपल्यासाठी भूमिकांच्या निवडीबाबत तो खूप चोखंदळ आणि सजग असतो. त्यामुळेच तर बॉलीवूडमधून सातत्याने ऑफर्स येऊनही त्याने आपल्या डेब्यूसाठी कबीर खान आणि नागेश कुकनूरच्याच कलाकृतींची निवड केली. रोहन सिप्पी हे, त्या नावाजलेल्या दिग्दर्शकांच्या यादीतले एक मोठे नाव आहे, ज्यांना संहितेविषयी उत्तम जाण आहे. अशावेळेस रोहन सिप्पींसोबत त्याने आपले नवे प्रोजेक्ट करणेही त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाचीच बातमी म्हणायला हवी.
”अभिनेता आदिनाथ कोठारे म्हणाला,” होय, मी रोहन सिप्पीच्या नव्या प्रोजेक्टमध्ये तुम्हांला दिसेन. रोहन सिप्पी माझ्या आवडत्या बॉलीवूड दिग्दर्शकांपैकी एक आहे. त्यामुळे रोहन सिप्पीच्या प्रोजेक्टचा हिस्सा होणं, नक्कीच सुखद म्हणावे लागेल. सध्या चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे. यंदा हे प्रोजेक्ट रसिकांच्या भेटीला येईल.”