बरेली, दि. १२ सप्टेंबर २०२५ – Actress Disha Patani News बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी हिच्या बरेली येथील घराबाहेर झालेल्या गोळीबारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गुरुवारी पहाटे साडेचार वाजता दोन अज्ञात व्यक्ती मोटरसायकलवरून येऊन सिव्हिल लाईन्स परिसरातील घराच्या मुख्य दरवाज्यावर तसेच भिंतीवर गोळीबार केला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.
सध्या या घरात दिशाचे वडील जगदीश पटानी (निवृत्त डीएसपी) राहतात. घटनेनंतर पोलीस दल मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले असून, एसपी सिटी आणि एसपी क्राईम यांच्या नेतृत्वाखाली पाच विशेष पथके तपासासाठी नेमण्यात आली आहेत.
गँगस्टरकडून जबाबदारी(Actress Disha Patani News)
या हल्ल्याची जबाबदारी कुख्यात गँगस्टर रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार गटाने सोशल मीडियावर पोस्ट करत स्वीकारली. त्यांच्या म्हणण्यानुसार, दिशा पटानीची बहीण खुशबू पटानी हिने संत प्रेमानंदजी महाराज आणि अनिरुद्धाचार्य यांच्याविरोधात वक्तव्य केले होते. त्याचा बदला म्हणून हा गोळीबार करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. पोस्टमध्ये उघड धमकी देत पुढील वेळी असे कृत्य करणाऱ्यांना जिवंत सोडणार नाही, असा इशाराही देण्यात आला होता.तथापि, संबंधित पोस्ट काही वेळातच सोशल मीडियावरून हटविण्यात आली. तरीही पोलिसांकडून त्या पोस्टची नोंद घेऊन सायबर सेलमार्फत तपास सुरू आहे.
खुशबू पटानी वाद
काही महिन्यांपूर्वी खुशबू पटानी हिने अनिरुद्धाचार्य यांनी महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर टीका करणारा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. मात्र, त्यावेळी सोशल मीडियावर तिच्या वक्तव्याचा गैरसमज होऊन ती टीका प्रेमानंद महाराजांविरुद्ध होती असा दावा करण्यात आला. यामुळे वाद अधिक चिघळला. नंतर खुशबूने अनेक व्हिडिओ पोस्ट करून ती टीका अनिरुद्धाचार्यांवर होती, प्रेमानंद महाराजांवर नव्हती, असे स्पष्टीकरण दिले.
पोलिसांचा तपास सुरू
बरेली पोलिसांनी या प्रकरणाला गंभीरतेने घेतले असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी गस्त आणि तपास मोहीम तीव्र करण्यात आली आहे. दिशाच्या घरासमोर सुरक्षा वाढविण्यात आली असून, तिच्या कुटुंबीयांना अतिरिक्त पोलीस संरक्षण पुरविण्यात आले आहे.
ही घटना केवळ पटानी कुटुंबासाठीच नव्हे, तर बॉलिवूड जगतासाठीही धक्कादायक ठरली आहे. सलमान खानला धमकी दिल्यानंतर गोल्डी ब्रार गँग पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या सुरक्षेबाबत नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत.