‘मी होणार सुपरस्टार…जल्लोष डान्सचा’ कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संस्कृती बालगुडे करणार
मुंबई – स्टार प्रवाहवर २१ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या ‘मी होणार सुपरस्टार…जल्लोष डान्सचा’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन करणार आहे अभिनेत्री संस्कृती बालगुडे. तब्बल ८ वर्षांनंतर संस्कृती धमाकेदार टेलिव्हिजन कमबॅकसाठी सज्ज झाली आहे. विशेष बाब म्हणजे संस्कृती पहिल्यांदाच होस्टच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संस्कृतीला वेगवेगळ्या रुपात याआधी प्रेक्षकांनी पाहिलं आहे. पण मी होणार सुपरस्टार मधला तिचा ग्लॅमरस अंदाज अनोखा असणार आहे.
या अनोख्या कार्यक्रमाविषयी सांगताना संस्कृती म्हणाली, स्टार प्रवाहसोबत मी पहिल्यांदाच या कार्यक्रमाच्या निमित्ताने जोडली गेली आहे. मी होणार सुपरस्टार कार्यक्रमाचं वेगळेपण सांगायचं तर या मंचावर संपूर्ण महाराष्ट्रातून आलेलं भन्नाट टॅलेण्ट. स्पर्धकांचे डान्स परफॉर्मन्सेस पाहून अवाक व्हायला होतं. नृत्य ही माझी आवड आहे. माझ्या करिअरची सुरुवातच नृत्याने झाली. त्यामुळे हा मंच नवी ऊर्जा देतो. मी पहिल्यांदाच सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडते आहे त्यामुळे उत्सुकता नक्कीच आहे.
स्पर्धकांना थिरकताना पाहून माझेही पाय थिरकायला लागतात. आमचा सुपरजज अंकुश चौधरी आणि कॅप्टन्स वैभव घुगे आणि कृती महेश यांनी या कार्यक्रमात वेगळी रंगत आणली आहे. त्यामुळे मी होणार सुपरस्टार हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी नवी पर्वणी असणार आहे. या कार्यक्रमात माझा वेगळा लूकदेखिल पाहायला मिळेल. स्टायलिस्ट नेहा चौधरीने माझा लूक डिझाईन केला आहे. त्यामुळे मी टेलिव्हिजन कमबॅकसाठी खुपच उत्सुक आहे अशी भावना संस्कृतीने व्यक्त केली.’
‘मी होणार सुपरस्टार जल्लोष डान्सचा’ २१ ऑगस्टपासून दर शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवर.