भावार्थ दासबोध – भाग २१५

निरुपण : पद्माकर देशपांडे 

0

दशक १६ समास नऊ नाना उपासना नाम समास 
जय जय रघुवीर समर्थ.  भूमंडळावर नाना देश,भाषा, मते असंख्य आहेत, अनेक ऋषी आहेत, अनेक मते आहेत त्याच्यातून निवड कशी करायची? पर्जन्यवृष्टी  होताच सृष्टीतून अनेक अंकुर निघतात, नाना लहानथोर तरू निर्माण होतात त्याच्यातून कसं निवडायचं? खेचरे भूचरे जळचरे नाना प्रकारची शरीरे, नाना चित्रविचित्र रंग कसे निवडायचे?  दृश्य कसे आकाराला आलं, नानापरीने विकारले, उदंड वाढलं त्यातून कसं निवडायचं? पोकळीमध्ये गंधर्वाचे नगर, नाना लहान थोर रंग, नाना प्रकारच्या व्यक्ती त्यातून कशी निवड करायची? दिवस आणि रात्रीचे प्रकार चांदणं आणि अंधार विचार आणि अविचार कसं काय निवडायचे? विचार आणि आठवण, शहाणपण आणि बाष्कळपणा, प्रचिती आणि अंदाज हे कसं निवडायचं?

न्याय आणि अन्याय, होणे आणि न होणे,  विवेकाशिवाय काही उमजत नाही. कार्यकर्ता कोण आणि न काम करणारा कोण? कळायला हवं. शूर कोण आणि कुकर्म करणारा कोण? धार्मिक आणि अधार्मिक कोण हे समजलं पाहिजे. धनाढ्य कोण आणि दिवाळखोर, साव आणि तस्कर, खरे खोटे हा विचार कळायला हवा.  वरिष्ठ आणि कनिष्ठ, भ्रष्ट आणि अंतरनिष्ठ, सारासार विचार स्पष्ट कळायला हवा.  असं समर्थ सांगतात. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे नाना उपासना निरूपण नाम समास नववा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.

दशक १६ समास १० समास दहा गुणभुत निरूपण नाम समास 
जय जय रघुवीर समर्थ. पंचभुतांमुळे जग चालते. पंचभूतांची सगळीकडे लगबग असते. पंचभुत गेली तर मग काय आहे? श्रोता वक्त्याला विचारतो, भुतांचा महिमा वाढविला आणि त्रिगुण कुठे गेले ते सांगा स्वामी. अंतरात्मा हे पाचवं भूत, त्रिगुण त्याच्या अंगभूत येतात, ते चित्त सावध करून ऐका. भूत म्हणजे होऊन गेलेले. त्रिगुण त्याच्यामध्ये अंगभूत आहे. यामुळे ही शंका दूर झाली. भूतांशिवाय वेगळे काहीही नाही. हे सर्व पंचभौतिक आहे. एकापेक्षा दुसरे काही वेगळं घडत नाही. आत्म्यामुळे वारा झालेला आहे, वाऱ्यामुळे अग्नी झालेला आहे, अग्नीपासून पाणी झालेलं आहे, सर्वत्र पाणी भरलं त्यामुळे रवी मंडळ एकत्र आले. अग्नी, वायूशिवाय भूमंडळ निर्माण झालेलं नाही. वन्ही, वायू,रवी नसला तर उदंड शीतलता निर्माण झाली असती त्या शीतलतेमध्ये उष्णता निर्माण झालेली आहे.

अशाप्रकारे उष्णतेने कर्म केलं त्यामुळे देह वाढला. सगळे थंडच असतं तर प्राणीमात्र मरून गेले असते. सगळी उष्णता असती तर सगळं करपून गेले असते. सगळं भूमंडळ गोठून गेल्याने देवाने उपाय केला, रविकिरण पसरल्याने सर्व वाळून गेले. नंतर पर्जन्यकाळ निर्माण झाला. त्याच्यामुळे भूमंडळ थंड झाले. पुढे काही उष्ण काही शीत असे झाले. शीत काळामध्ये लोकांना कष्ट झाले. त्यामुळे वृक्ष वगैरे कर्पून गेले. म्हणून पुढे उष्णकाळाचे कौतुक आहे. त्याच्यातही प्रातःकाळ, मध्यान्ह, सायंकाळ शितकाळ, उष्णकाळ निर्माण केले. असे एकामागे एक केले. विल्हेवारीने क्रमाने ते लावलं. त्याच्यामुळे प्राणीमात्र जगले.

नाना रस, नाना रोग कठीण असतात म्हणून औषध निर्माण केली. सृष्टीचे हे स्वरूप समजलं पाहिजे. देहाचा मूळ रक्त आणि रेत आहे. त्यातूनच दात तयार होतात. त्याप्रमाणे नाना रत्नांची भूमंडळावर माहिती आहे. सगळ्याचे मूळ पाणी आहे. पाण्यामुळे सगळे व्यवहार चालतात. जीवन म्हणजे पाणी नसेल तर हरिगोविंदा म्हणजे सर्वनाश होईल!  जीवनामुळे सगळं चालतं, पाण्याचेच तेजस्वी शुक्राच्या चांदणीसारखे मोती होतात. हिरे माणके इंद्रनीलसुद्धा पाण्यापासून होतात. अशी माहिती समर्थ देत आहेत. पुढील कथा ऐकू या पुढील भागात जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

 

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!