दशक १६ समास दहा गुणभुत निरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. सगळा चिखलच झाला असल्याने तो वेगवेगळ्या कसा निवडायचा? त्याप्रमाणे महिमा तरी कोणाचा सांगणार? परंतु मनाला विवेक म्हणजे काय हे समजण्यासाठी काहीतरी बोललो आहे. लोकांमध्ये तार्किक लोक आहेत ते हे समजून घेतील. तरी संपूर्ण समजलं हे घडत नाही. शास्त्र-अशास्त्र यांच्यामध्ये मतैक्य होत नाही. मात्र अंदाजपंचे निश्चय होऊ शकत नाही. भगवंताचे गुण अगाध आहेत ते सगळे गुण वाचेने वर्णन करू शकत नाही. वाचेने वेद देखील ते सांगण्यास व्यर्थ ठरले आहेत. फक्त देवालाच त्याचे गुण माहिती आहेत.
आत्माराम हा सगळ्यांचे पालन करतो. सगळं त्रयलोक्य सांभाळतो. त्या एकट्याविना सगळे धुळीसमान आहेत. जिथे आत्माराम नाही तिथे काहीही उरत नाही. त्रिलोक्याचे सगळे प्राणी प्रेत रूप होऊन जातात. आत्मा नसेल तर मरण येते. आत्म्याशिवाय जीवन कसे? हे विचार तुम्ही समजून घ्या. समजणे, विवेक असणे हे अत्म्याविना शक्य नाही. म्हणून सर्वांनी जगदीशाचं भजन करावं. उपासना प्रकट झाली तर हे विचारण्याचा अर्थ समजेल. त्यामुळे देवाची उपासना केली पाहिजे. साधकाला या उपासनेचा मोठा आधार असतो. अंतरात्म्याच्या ज्ञानाशिवाय इतर यज्ञयागादी प्रचंड खटपटी केल्या तरी त्या सर्व फुकट जातात. त्यांने या भ्रमसागराला जिंकता येणार नाही. अथवा देवाच्या कृपेशिवाय उदंड कष्ट केले तरी कार्यात यश येणार नाही. कृपा उपासनेने प्राप्त होते म्हणून उपासना हाच कार्यकर्त्यांचा मुख्य आधार आहे. समर्थ पाठीशी नसेल तर त्याला त्रास होतो म्हणून येता जाता भजन करावे. भजन साधन अभ्यास याच्यामुळे परलोकाला जाता येते असा विश्वास धरावा असं दास म्हणजे समर्थ सांगतात. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे गुण भूत निरूपण नाम समास दशम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.
प्रकृती पुरुष नाम दशक सप्तदश श्रीराम
जय जय रघुवीर समर्थ. ब्रह्म निश्चळ, आत्मा चंचळ. सगळ्यांच्या वर परमात्मा आहे. चैतन्याचा साक्षी ज्ञानात्मा षडगुणेश्वर.तो सगळ्या जगाचा ईश्वर म्हणून त्याचं नाव जगदेश्वर. त्याच्यापासून हा विस्तार झालेला आहे. शिवशक्ती, जगदिश्वरी, प्रकृती पुरुष, परमेश्वरी, मूळमाया, गुणेश्वरी, गुणक्षोभिणी, क्षेत्रज्ञ दृष्टा, कुटस्थ, साक्षी, अंतरात्मा, सर्वलक्षी, शुद्धसत्व, महत्तत्व यांची परीक्षा जाणता साधू करतो. ब्रम्हा विष्णू महेश्वर, नानापिंडयांमध्ये जिव्हेश्वर, ज्याला प्राणिमात्र लहानथोर त्याच्यामध्ये सगळे भासतं. देहरूपी देवळामध्ये बसला, त्याचे भजन केले नाही तर तो देहाला मारतो म्हणून त्याच्या भिऊन लोक त्याचे भजन करतात. ज्या वेळेला भजन चुकलं तेव्हा तेव्हा पछाडलं म्हणून आवडीने सगळे लोक भजन करायला लागले. जे जे तेव्हा मागितले ते तात्काळ त्यांनी दिले म्हणून त्रैलोक्य त्याचं भजन करायला लागले.
पांच विषयांचा नैवेद्य अर्पण करण्यास जेव्हा पाहिजे तेव्हा सिद्ध व्हायचं. असं जर केलं नाही तर रोग होतील. नैवेद्य पसंत पडत नाही त्यामुळे देव राहत नाही आणि भाग्यवैभव नाना गोष्टी सोडून जातात. जातात ते कळत नाही, कुणाला ठाऊक होत नाही, देवाशिवाय कोणालाही देव समजत नाही. देव पाहण्याच्यासाठी देऊळ पहावी लागतात. कुठेतरी देवळाच्या निमित्ताने देव प्रगट होतो. देवळे म्हणजे नाना शरीरे. तिथे जीवेश्वर राहतो. नाना शरीरे नाना प्रकारची असतात. त्यात अनंत भेद असतात. चालती बोलती देवळे, त्याच्यामध्ये राया म्हणजे अंतरात्मा राहतो. जितकी देऊळ तितकी सगळ्यांना समजली पाहिजे. मत्स्य, वराह, कूर्म, अशी देवळे, भूगोल धरला तर अक्राळ विक्राळ निर्मळ असे किती तरी असतात. कित्येक देहात जन्मताच सुख असतं आणि पुढेही काळ सुखाचा समुद्र उभारून आल्याने असे लोक मस्त होतात; परंतु हे सुख शाश्वत टिकणार असतं नाही. ते अशाश्वत असते.
अशाश्वताचा मस्तकमणी म्हणजे अंतरात्मा. त्याची करणी केवढी! दिसत नाही तरी काय झाले! त्यालाच धनी म्हणावे! अंतरात्म्याकडे लक्ष गेल्याने सर्व भेद मावळतो. विषयांकडे लक्ष गेल्याने भेद निर्माण होतात आणि खेद वाटतो. अशाप्रकारे विषयाकडे अध आणि अंतरात्म्याकडे ऊर्ध्व असा खालीवर होण्याचा नित्यक्रम चालू असतो. सगळ्याच मूळ दिसत नाही. भव्य, भारी आणि भासत नाही! एक क्षणभर देखील एका ठिकाणी बसत नाही. असा अगाध परमात्मा त्याचा महिमा कोण जाणेल? तुझी लीला तुच जाणतो! नित्य-अनित्य विवेक असेल तरच संसारात आल्याचं सार्थक आहे. त्याद्वारेच इहलोक आणि परलोक साधता येईल. असं समर्थ सांगत आहेत. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७