भावार्थ दासबोध -भाग २१७

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

दशक १७ समास एक
जय जय रघुवीर समर्थ.देवाचा नेहमी विचार करणाऱ्या लोकांपाशी देव रात्रंदिवस अखंड राहतो. त्यांच्या पूर्वसंचिताला तोड नाही. अखंड आत्मानुसंधान असल्याने त्यांना योगी म्हणतात. योग नाही तो वियोगी असतो. तो योग बळामुळे योगी होतो. चांगल्या लोकांचं असं महात्म्य असतं ते लोकांना सन्मार्ग दाखवतात. जसा पोहणारा माणूस बुडणाऱ्या माणसाला बुडू देत नाही तसंच त्याचं कार्य असतं.  स्थूल सूक्ष्म तत्त्व याच्यामध्ये निवाडा पिंड ब्रम्हांडाचा निवड केला जातो. त्याची प्रचिती घेतली जाते असे लोक भूमंडलावर थोडेच आहेत.

वेदांत विश्लेषण करून  महावाक्य जे आहे ते जाणून घ्यावे. पृथ्वीवर जे विवेकी लोक आहेत त्यांची संगत धन्य आहे. त्यांचं बोलणे श्रवण केल्यामुळे प्राणी चांगल्या गतीला जातात. सत्संग आणि सत्शास्त्र श्रवण याचे अखंड विवरण करीत राहिल्याने नाना सत्संग आणि परोपकाराचे गुण अंगी येतात. असे सत्कीर्तीचे पुरुष असतात ते परमेश्वराचे अंश असतात. तिथेच धर्म स्थापनेचा हव्यास दिसून येतो. विशेष सारासार विचार करून तिथे त्याद्वारे जगाचा उद्धार होतो. अशा तऱ्हेचे संसाराचा त्याग करणारे निरंतर होऊन गेले आहेत. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे देव बलात्कार नाम समास  प्रथम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.

दशक १७ समास २ शिवशक्ती निरूपण नाम समास 
जय जय रघुवीर समर्थ. ब्रह्म गगनाप्रमाणे निर्मळ, निश्चल, निराकार निर्विकार आहे.  त्याला अंत नाही ते अनंत, शाश्वत आणि सदोदित आहे. असंत नसतात ते सर्वकाळ संत असतात. परब्रम्ह हे आकाश अवकाशाप्रमाणे अविनाशी आहे, ते तुटत नाही फुटत नाही. जसच्या तस असतं. तिथे ज्ञानही नसतं आणि अज्ञानही नसतं. तिथे स्मरणही नसतं आणि विस्मरणही नसतं. तिथे अखंड निर्गुण निरावलंबी असते.  तिथे चंद्र नसतो, सूर्य नसतो, तिथे अग्नी नसतो, तिथे काळोख नसतो तिथे प्रकाश नसतो. निश्चलाचे स्मरण केले त्याला चैतन्य असं कल्पिलं, गुणांच्या समानतेने एकानंतर एक गुण प्रकट होतात.

गुणसाम्य दशा येते. गगनामध्ये ढगाची छाया येते तशी मूळ माया जाणावी. ती उद्भवते आणि विलयाला जाते. त्याला काही वेळ लागत नाही. निर्गुणात गुणविकारतात, तोच षडगुणेश्वर त्यालाच अर्धनारी नटेश्वर म्हणतात. आदिशक्ती शिवशक्ती मूळ मायेमध्ये सर्व शक्ती आहे. तिथून पुढे नाना व्यक्ती निर्माण झाल्या. तिथून पुढे शुद्ध सत्व, रज तमाचं गूढत्व वाढलं. त्यालाच महत्तत्व, गुणक्षोभिणी असे म्हणतात. मूळमायेपाशी व्यक्ती नसते तिथे शिवशक्ती कशी असेल? असं म्हटलं तरी चित्तामध्ये सावधानता असावी. ब्रम्हांडावरून पिंड किंवा पिंडावरून ब्रह्मांड हे दोन्ही अर्ध पाहिलं तर त्याचे लक्षणे समजून येतात. बीज फोडलं तर तिथे काय फळ दिसत नाही पण लावलं तर वाढत वाढत पुढे नाना फळ येतात. फळ फोडलं तर बीज दिसत. बीज फोडले तर फळ दिसत नाही. तसा विचार हा पिंडब्रह्मांडामध्ये आहे.

नर-नारी हे दोन्हीही भेद पिंडामध्ये प्रसिद्ध दिसतात. ते मूळमायेत नसतील तर विषद कसे होतील? नाना बिजरूप कल्पना, तिथे काही एक असत, सूक्ष्म म्हणून ते सहजतेने दिसत नाही. स्थूल गोष्टींचे मूळ वासना आहे.  वासना आधी दिसत नाही. स्थुलापेक्षा वेगळं अनुमान काय करता येत नाही.  कल्पनेची सृष्टी केली असं वेदशास्त्राने सांगितलं आहे. दिसत नाही म्हणून मिथ्या केली असं म्हटलं नाही का. एका एका जन्माचा पडदा, तिथे विचार कसा कळेल? परंतु सिद्धांताच्या गोष्टी या नेहमी गुढ असतात हे सगळ्यांना ठाऊक आहे. नाना पुरुषांचे जीव, नाना स्त्रियांचे जीव एकच पण देहाचे स्वभाव वेगवेगळे. नवरीला नवरी लागत नाही असा भेद दिसतो. पिंडावरून ब्रम्हांड बीज उमगत असं समर्थ सांगत आहेत. हा भाग येथे समाप्त झाला. जय जय रघुवीर समर्थ. (क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.