भावार्थ दासबोध – भाग २१९

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

दशक १७ समास तीन श्रवण निरूपण नाम समास 
जय जय रघुवीर समर्थ. मूळमाया हा ब्रह्मांडीचा चौथा देह आहे. तो विदेह झाला पाहिजे, म्हणजे मी पण असे स्फुरणही होता कामा नये. अशा तऱ्हेने जो देहातीत होऊन राहतो तोच साधू धन्य होय. विचाराद्वारे वरच्या दिशेला जातात त्याला ऊर्ध्व गती मिळते, इतर सगळ्यांना सर्वसामान्य ज्ञानाद्वारे अधोगती मिळते. पदार्थ चांगले दिसतात पण ते सगळे नष्ट होतात. त्याप्रमाणे लोक तत्वभ्रष्ट होतात. त्यामुळे पदार्थज्ञान, नाना लोकांचं अनुमान हे सगळं सोडून निरंजन शोधत जायला पाहिजे.  अष्टांग योग पिंडज्ञान, त्याच्यापेक्षा थोर तत्त्वज्ञान आहे, त्यापेक्षाही थोर आत्मज्ञान आहे; ते पाहिलं पाहिजे. मूळ मायेच्या शेवटी हरि संकल्प मुळावर उठतो उपासनेच्या योगाने तिथे मिठी घातली पाहिजे मग त्याच्या पलीकडे निखळ ब्रह्म निर्गुण ब्रह्म हे सापडतात.

निर्मळ, निश्चळ अशी त्याची गगनासारखी खूण आहे.  ब्रह्म इथून तिथवर दाटले, प्राणिमात्रांना चिकटले सर्वत्र व्यापून आहे. त्याच्यासारख दुसर थोर काही नाही. त्याचा सूक्ष्माहून सूक्ष्म विचार करायला हवा. पिंड ब्रम्हांडाचा संहार केल्यावर मग ते समजतं. किंवा पिंड-ब्रम्हांड असल्यावर विवेकप्रलय पाहिला तर शाश्वत कोण हे तत्वतः समजायला लागते. तत्त्वाचा निर्णय करून, सारासार निवडा आणि मग सावधपणे सुखेनैव ग्रंथ सोडा! असं सांगून समर्थ जणू कल्याणाची ग्वाहीच देतात. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे श्रवण निरूपणनाम समास तृतीय समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.

समास ४ अनुमान निरसन नाम समास  
जय जय रघुवीर समर्थ. अनेक लोकांनी वक्त्याला उपाय विचारल्यावर त्रास मानून घेऊ नये. बोलता बोलता विषयाची संगती सोडू नये. श्रोत्याने शंका घेतली तिचे तात्काळ निरसन केले पाहिजे. स्वतःच्या गोष्टीने गोष्टी सांगत राहाव्या, असं होऊ नये. पुढचं धरायचं, मागचं विसरायचं, मागचं धरायचं पुढचं विसरायचं असं ठायी ठायी सापडत राहायचं. पोहणाराच गटांगळ्या खातो आणि मग लोकांना बाहेर काढायला पाहतो, असे ठाई ठाई दिसते.

आपणच एकदा संहार आणि एकदा सर्व अर्थपूर्ण असं सांगत सुटलो तर श्रोत्यांचा निश्चय होणार कसा? म्हणून दुस्तर मायेचा पार सोडला पाहिजे. जे जे सूक्ष्म नाव घ्यावं, त्याचं रूप श्रोत्याच्या मनावर बिंबवून टाकावे तरच त्याने स्वतःला वक्ता, विचारवंत म्हणवून घ्याव. ब्रह्म कसं? मूळ माया कशी? अष्टधा प्रकृती शिवशक्ती कशी आगे? षड्गुणेश्वराची, गुणसाम्याची स्थिती कशी आहे? अर्धनारी नटेश्वर, प्रकृती पुरुषाचा विचार त्यानंतर गुणक्षोभिणी नंतर त्रिगुण कसे आहेत? पूर्वपक्ष कुठून कुठपर्यंत आहे? वाच्यांश आणि लक्षांश यांचे प्रकार कोणते आहेत? अशाप्रकारे नाना सूक्ष्म विचार करतो तो साधू धन्य आहे.

जास्त पाल्हाळ वाढवत नाही. बोललेलेच पुन्हा बोलत नाही, वाणीला मौन पडते ते ब्रह्म. त्याद्वारे तो अनुमान सोडायला लावतो. क्षणात विमळ ब्रह्म, क्षणात सर्व ब्रह्म म्हणतो, क्षणात द्रष्टा, साक्षी, सत्ता ब्रह्म म्हणतो. निश्चल ते चंचल झाल, चंचल तेच केवळ ब्रम्ह, नानाप्रसंगी खळखळ करून निवाडा करीत नाही. चळणारे आणि निश्चल सर्व केवळ चैतन्यच रूप निश्चितपणे वेगळे, मात्र ते केवळ  चैतन्यच असते. लोकांना उगाच काहीतरी सांगायचं ते लोकांच्या मनाला कसं पटेल? नाना निश्चय नाना गोंधळ वाढत जातात. भ्रमाला परब्रम्ह म्हणतो,  परब्रह्माला भ्रम म्हणतो आणि बघ ज्ञानाचा संभ्रम बोलून दाखवतो. शास्त्रांच दडपण सांगतो. अनुभव नसतानाही निरूपण करतो. त्याला विचारायला गेला की त्याचा अत्यंत शीण वाटतो. बिदगीची अपेक्षा असलेला, धन पाहिजे असलेला, तो बापडा काय बोलेल?  सारासाराचा निवाडा करता आला पाहिजे.

वैद्य मात्रेची स्तुती करतो पण त्याचा गुण काहीच येत नाही. प्रचिती नसेल तर तसं ज्ञान काय उपयोगाचे?  जिथे सारासार विचार नाही तिथे सगळा अंधार आहे. नाना परीक्षेचा तिथे केला जात नाही. पाप, पुण्य, स्वर्ग-नरक, विवेक आणि अविवेक सर्व ब्रह्मामध्ये काहीही सापडत नाही. असं समर्थ सांगतात व अनुमानाच निरसन करतात. जय जय रघुवीर समर्थ. (क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!