भावार्थ दासबोध – भाग २२२

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

दशक १७ समास सात जगजीवन निरूपण नाम समास 
जय जय रघुवीर समर्थ. मुळामध्ये निव्वळ पाणी असते. ते नानावेलीमध्ये जाते.  वेलीच्या संगतीच्या दोषामुळे आंबट तिखट कडवट होते. आत्मा आत्मपणे असतो. देहाच्या संगतीने त्याला विकार होतात. तो अभिमान करून भलतीकडे जातो. चांगली संगत सापडल्यावर उसाला गोडी आली. प्राणघातक विषवल्ली फोफावली. वनस्पती अठरा भार आहेत. त्याचे गुण किती सांगावे? नाना देहाची संगती आत्म्याला मिळते. त्यामध्ये कोणी भले असतात ते संत संगतीसाठी निघाले. त्यांनी देहाभिमान सोडून दिला. पाण्याचा नाश होतो, विवेकाने अंतरात्मा साऱ्या भ्रमातून मुक्त होतो. ज्याला स्वहित करायचे आहे त्याला किती म्हणून सांगायचं? हे ज्याचे त्याने सगळं काही स्वतः समजून घ्यावं. आपल आपण रक्षण करावं. तो स्वतःचा मित्र जाणावा.

आपला नाश करील तो स्वतःचा वैरी समजावा. आपलं आपण अहित करावं, त्याला आडवं कोणी पडावे? एकांतात जाऊन स्वतः जीवाला मारून घेतो म्हणजे आत्महत्या करतो जो आपला आपण घातकी. तो आत्महत्यारा पातकी.  म्हणून जो विवेकी आहे तो साधू धन्य आहे. पुण्यवंताला सत्संगती, पापिष्ट माणसाला कुसंगती. संगतीमुळे लाभते उत्तम किंवा वाईट गती. म्हणून उत्तम संगत धरावी. आपली आपण चिंता करावी. मनामध्ये जाणत्याची बुद्धी आहे तिचा विचार करावा. लोक आणि परलोक जाणत्याला सुखदायक आहे. नेणत्याला तिथे अविचार मिळतो. जाणता माणूस म्हणजे देवाचा अंश आहे. नेणता म्हणजे राक्षस.  त्याच्यामध्ये जे विशेष आहे ते जाणून घ्यावे. जाणता असतो तो सगळ्यांना मान्य असतो.

नेणता सगळ्यांना अमान्य. त्याच्यामुळे धन्यता वाटेल ते घ्यावे. साक्षेपी शहाण्यांची संगत असेल तर साक्षेपी शहाणे निर्माण होतात. आळशी-मूर्खाची संगत धरली तर आळशी मूर्ख बनतात. उत्तम संगतीच फळ सुख. अधम संगतीच फळ दुःख. आनंद सोडून शोक कसा काय घ्यायचा? असं हे स्पष्ट दिसत.जगामध्ये उदंड भासते, प्राणीमात्र दोन्ही प्रकारचे वर्तन करताना दिसतात. एकाच्या योगाने सगळ्यांचा लाभ होतो एकाच्या योगाने सगळ्याचा वियोग होतो. विवेक योगाने सर्व प्रयोग करीत जावे. अचानक अडचणीत सापडले तरी तिथून निघालं पाहिजे.  बाहेर पडलं म्हणजे मोठे समाधान प्राप्त होते.

नाना दुर्जनांचा संग झाला तर क्षणोक्षणी मानभंग होतो. त्यामुळे काही बाबी राखून राहावं. विवेकाने केलेल्या दीर्घ दृष्टीच्या प्रयत्नामुळे काही कमी पडत नाही. सुख संतोष भोगणं, योग्य संधी मिळते. लोकांमध्ये हे असं आहे, सृष्टीमध्येही ते दिसतं, जो कोणी समजून पाहतो त्याला काही घडवता येतं. ही वसुंधरा बहुरत्न आहे. जाणून विचार करा. विचार केल्याशिवाय प्रत्यय येणार नाही. दुर्बळ आणि संपन्न वेडे आणि व्युत्पन्न ही अशी जगरहाटी दिसत असते. सगळ्या जगामध्ये काही भाग्यपुरुष असतात तर काही नवीन भाग्यवंत होतात. तशीच विद्याव्युत्पत्ती होत जाते. एक संपन्न तर एक भिकारी दिसतात, तर काही भिकारी प्रयत्न करून संपन्न होतात, परंतु ही संपन्नता कायम टिकणारी नसते. हा चक्रनेमी क्रम सृष्टीचा नियमच आहे.

संपत्ती ही दुपारची सावली आहे.वय निघून गेलं की हळूहळू निघून जाते.बालपण तारुण्यपण निघून जातं.वृद्धापकाळ येतो.असं जाणून सार्थक केलं पाहिजे.जसं केलं तसं होतं.प्रयत्न केल्याने कार्य साध्य होतं मग निरश होण्याचं काय कारण? इतिश्री दासबोधे जगजीवन निरूपण नाम समास सप्तम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.