भावार्थ दासबोध – भाग २२६

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

बहुजिनसी नाम दशक १८ समास एक बहुदेवस्थान निरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम.लहान थोर जनांना विद्या बुद्धी देणाऱ्या गजवदना तुझा महिमा समजत नाही. तुला नमस्कार असो. चारी वाचेमध्ये स्फूर्ती निर्माण करणाऱ्या सरस्वतीला नमन असो. तुझे निजरूप जाणतात असे थोडेच आहेत. हे ब्रह्मदेवा तू धन्य आहेस! सृष्टीची रचना करून नाना वेदशास्त्र भेद तू प्रकट केले आहेस. विष्णूदेवा! तू विश्वाचे पालन करतो, आपल्या अंशाने त्याच्य्यात राहून सगळ्या जीवांना जगवतो, वाढवतो. धन्य धन्य भोळा शंकर! त्याच्या देण्याला मर्यादाच नाही. तो निरंतर रामनाम जपत असतो. सगळ्या देवांचा देव असलेला इंद्र देव आहे. इंद्रलोकीचे वैभव काय म्हणून सांगायचं! धन्य धन्य यमधर्म. सगळे धर्म-अधर्म तू जाणतोस. प्राणीमात्रांचं गुपित तुला माहिती आहे.

व्यंकटेशाचा महिमा मोठा आहे. उभ्याने अन्न खातात वडे, घारगे यांचा आस्वाद घेतात. बनशंकरी देवी तू धन्य आहेस. शाक भाज्यांचा आहार घेऊन भोजन करतात. गायीच्या शेपटासारख्या असलेल्या उडदाच्या वड्यांच्या उदंड माळा, दहिवडे खाताना समाधान होते. खंडेराया भंडाऱ्यामुळे तुझी पिवळी काया झालेली आहे. कांदे आणि भरीत रोडगे खाण्यास सिद्ध असतो. धन्य धन्य तुळजाभवानी! भक्तांवर प्रसन्न होते. तिचे गुणवैभव वर्णू शकेल असा कोण आहे? देवा धन्य धन्य पांडुरंगा.. नाना अभंग गाणी याद्वारे तुझ्या अखंड कथेचा प्रवाह सुरु असतो. धन्य धन्य क्षेत्रपाळ देवा! तुझी लोकांना आवड आहे.

राम कृष्ण आदि अवतार आहेत त्यांचा महिमा अपार आहे. त्यांच्या उपासनेसाठी लोक तत्पर आहेत. सगळ्या देवांचे मूळ म्हणजे अंतरात्मा. भूमंडळाचे भोग त्याच्यामुळेच घडतात. त्याच्यातच नाना देव आहेत. नाना शक्तींची रूपे त्यांने घेतली आहेत. सगळ्याचा विचार करावा. किती वर्णन करावे? देव आणि नर अनेक होतात आणि जातात. कीर्ती आणि अपकीर्ती, उदंड निंदा, उदंड स्तुती, सगळ्याची भोगप्राप्ती अंतरात्मालाच घडते. कोणता देह काय करतो,

कोणता देह काय भोगतो..भोगी त्यादी वितरागी एकच आत्मा आहे.प्राणी अभिमानाला भुलले. देही माणसाकडे पाहत गेले. आतमध्ये असून देखील मुख्य अंतरात्म्याला विसरले. अरे! या आत्म्याची चळवळ पाहील असा या भूमंडळी कोण आहे? अगाध पुण्य असेल तरच तो अनुसंधान करून राहील. त्या अनुसंधानामुळे सगळी किल्मिषे, पापे जळून जातील. आंतरनिष्ठ ज्ञानीच हे विचार करून पाहू शकतात. आंतरनिष्ठ आहेत तितके तरले. आंतरभ्रष्ट आहेत तितके बुडाले. लोकांचे बाह्य आचार आणि लोकरूढी मुळे वाया गेले. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे बहुदेवस्थान निरूपण नाम समास प्रथम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. (क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.