भावार्थ दासबोध – भाग २२७

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

दशक अठरा समास दोन सर्वज्ञ संग निरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. अज्ञानात असताना झालं ते झालं. झालं ते होऊन गेलं. नंतर मात्र नीटपणाने जाणतेपणाने वर्तन केलं पाहिजे. जाणत्या व्यक्तीची संगत धरावी. जाणत्या व्यक्तीची सेवा करावी. हळूहळू जाणत्याची सद्बुद्धी घ्यावी. जाणत्यापाशी लिहणं शिकावं, जाणत्या पाशी वाचन शिकावं. जाणत्याला सगळं काही विचाराव. जाणत्यावर उपकार करावा, ज्यांच्यासाठी शरीर झिजवावं. जाणत्याचा विचार कसा आहे तो पहावा. जाणत्याच्या संगतीने भजन करावं.

जाणत्याच्या संगतीने मन रिझवावे. जाणत्याच्या संगतीने विवरण करीत संतुष्ट व्हावं. जाणत्यापाशी गाणं गावं. जाणत्यापाशी वाद्य वाजवावं. जाणत्यापाशी नाना आलाप शिकावे. जाणत्याच्या कच्छपी लागावे. यांच्याकडून औषध घ्यावं. जाणता सांगेल ते पथ्य आधी करावं. जाणत्यापाशी परीक्षा शिकावी. जाणत्यापाशी तालीम करावी. जाणत्यापाशी पोहण अभ्यासावं. जाणता बोलेल तसं बोलावं. जाणता सांगेल तसं चालावं. जाणता करतो तसं ध्यान आपण करावं.

नाना प्रकाराने जाणत्याच्या कथा शिकाव्या. जाणत्याच्या युक्त्या समजून घ्याव्या. जाणत्याच्या सगळ्या गोष्टी वर्णन करून सांगाव्या. जाणत्याचे पेच जाणावे, जाणत्याचे पीळ उलगडावे, जाणता ठेवेल तसं राहावं. लोकांना राजी ठेवावं. जाणत्याचे प्रसंग जाणावे. जाणत्याचे रंग घ्यावे. जाणत्याच्या स्फूर्तीचे तरंग अभ्यासावे. जाणत्याचा शहाणपणा घ्यावा, जाणत्याचा तर्क जाणावा न बोलता जाणत्याने केलेला उल्लेख समजून घ्यावा. जाणत्याचा धूर्तपणा, जाणत्याचे राजकारण, जाणत्याचे निरूपण ऐकत जावं. जाणत्याचे कवित्व शिकावे. गद्यपद्य ओळखावे. मधुर वचने अंतर्यामी जाणून घ्यावी.

जाणत्याचे नाना प्रबंध पहावे. जाणत्याचे वचनभेद, जाणत्याचे नाना संवाद शोधावे. जाणत्याची तीक्ष्णता, जाणत्याची सहिष्णुता, जाणत्याची उदारता समजून घ्यावी. जाणत्याची नाना कल्पना, जाणत्याची दीर्घ सूचना, जाणत्याची विवंचना समजून घ्यावी. जाणत्याच्या सहवासातील काळ सार्थक करावा. जाणत्याचा अध्यात्म विवेक, जाणत्याचे अनेक गुण ते सगळे घ्यावे. जाणत्याचा भक्तिमार्ग, जाणत्याचा वैराग्ययोग, जाणत्याचा सगळा प्रसंग समजून घ्यावा. जाणत्याच ज्ञान पाहावे, जाणत्याचे ध्यान शिकावं, जाणत्याच्या सूक्ष्म गोष्टी समजून घ्याव्या. जाणत्याच अलिप्तपण, जाणत्याचे विदेह लक्षण, जाणत्याचे ब्रह्म विवरण समजून घ्यावं. जाणता एक अंतरात्मा आहे. त्याचा महिमा काय सांगावा.. विद्या कला गुण यांना कोणी आकलन करायचे..

जाणत्या परमेश्वराचे गुणानुवाद अनंत आहेत त्यांचा अखंड संवाद करावा त्यामुळे आनंद उदंड वाढतो. परमेश्वराने निर्मिले ते अखंड दृष्टीस पडते. ते विचारी लोकांनी विवरण करून समजावून घ्यावे. जितके काही निर्माण झाले तितके जगदीश्वराने निर्माण केले. कार्य आणि कर्ता निराळा ओळखला पाहिजे. लोकांना निर्माण करतो पण पाहिलं गेलं तर दिसत नाही. विचारपूर्वक त्याचा वेध घेत राहावा लागतो. त्याचे अखंड ध्यान लागल्यावर कृपाळूपणे तो योगक्षेम चालवतो. त्याचा अंश असलेल्या जाणत्याशीच सर्वकाळ संभाषण करावे.

ध्यान धरत नाही तो अभक्त. ध्यान धरील तो भक्त. तो संसारापासून भक्ताला मुक्त करतो. उपासनेच्या शेवटी उपासकाचा वेगळेपणाचा भाव नष्ट झाल्याबरोबर देव आणि भक्ताची अखंड भेट होते या सगळ्या अनुभवाच्या गोष्टी असून प्रत्यय असलेलाच जाणेल. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सर्वज्ञसंग निरूपण नाम समास द्वितीय समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!