दशक अठरा समास ६ उत्तम पुरुष निरुपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. अफजल खानाच्या वधानंतर श्री शिवाजीराजे श्रीसमर्थांच्या दर्शनात आले असता हा समास सांगितलेला आहे. नाना वस्त्र, नाना आभूषणे यांनी शरीर शृंगारले जाते. त्याप्रमाणे विवेक, विचार, राजकारण याद्वारे आपले अंतर्मन शृंगारले जाते. शरीर सुंदर सतेज असावे. वस्त्र आभूषणांनी सज्ज केले परंतु चातुर्यबीज नसेल तर कधीही त्याला शोभा येणार नाही. कठोरवचनी, हेकट, वक्रतुंड, अखंडपणाने गर्वाने वागणारा अभिमानी व्यक्ती असेल त्याच्या मनामध्ये न्याय नीती कधी येणार नाही. एखादा शिघ्र कोपी असेल, कधीही मर्यादा न बाळगणारा असेल त्याला राजकारणात संवाद साधता येणार नाही. काही बेईमान असतील, खोटारडे असतील, कधीही सत्य वचन न बोलणारे असतील, पिशाच्चासारखे दुष्ट असतील त्यांना राक्षस म्हणावं. समयासारखा समय येत नाही.
एकच नियम नेहमी लागू पडत नाही. काही नियम धरला तर राजकारणामध्ये अंतर पडतं. अति सर्वत्र वर्जावे, प्रसंग पाहून चालावं, विवेकी माणसाने हट्टीपणा किंवा निग्रह करू नये. खूपच हट्ट केला तर वेगवेगळे तट पडतील. काहीतरी मध्य शोधला पाहिजे. ईश्वराची आणि महामायेची कृपा असली तरीही स्वतः विवेक करणे आवश्यक आहे. अखंड सावधान राहावं. आणखी काय सूचना करावी? परंतु काही एक सांगितलं पाहिजे. समर्थांपाशी पुष्कळ लोक आहेत त्याचा अभिमान टिकला पाहिजे. न डळमळणाऱ्या निष्ठेने लोक जमवले पाहिजेत. म्लेंच्छ दुर्जन आहेत त्यांचं बंड खूप माजलेलं आहे म्हणून अखंड सावधान राहावं. सगळं करणारा ईश्वर आहे. त्याने ज्याचा स्वीकार केला आहे त्या पुरुषाचा विचार विरळ लोकच जाणतात. न्याय नीती विवेक विचार नाना प्रसंग प्रकार यांची परीक्षा करणे हे ईश्वराचं देणं आहे.
सावधपणे महायत्न करणे. वेळप्रसंगी धीर धरणे. अद्भुत कार्य करणे हे ईश्वराचे देणे आहे. यश कीर्ती प्रताप महिमा, उत्तम गुणांना सीमा नाही.त्याला दुसरी उपमा नाही. हे ईश्वराचे देणे आहे. देव, ब्राह्मण, आचार, विचार हा कित्येक जनांना आधार आहे. सदा परोपकार घडतो हे ईश्वराचं देणं आहे. इहलोक परलोक पहाणे, अखंड सावधपणे राहणे, अनेक लोकांना सहन करणे हे ईश्वराचं देणं आहे. देवाची बाजू घेणे, ब्राह्मणाची चिंता वाहणे, अनेक लोकांना सांभाळणे हे ईश्वराचे देणे आहे. धर्म स्थापना करणारे नर हे ईश्वराचे अवतार आहेत आणि पुढेही होतील हे ईश्वराचे देणे आहे. उत्तम गुण ग्रहण करणारा, तर्क, तीक्ष्ण विवेक असलेला, धर्मपालनाची इच्छा, पुण्यश्लोक हे ईश्वराचे देणे आहे. सगळ्या गुणांचे सार म्हणजे ज्याने इहलोक आणि परलोकीचा विचार करून पहिले,पैलपार जाण्यासाठी तजवीज केली आहे हे ईश्वराचे देणे आहे, असं समर्थ म्हणतात. इतीश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे उत्तम पुरुष निरूपण नाम समास षष्ठ समाप्त.जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

मोबाइल- ९४२०६९५१२७