भावार्थ दासबोध -भाग २३३

निरुपण :पद्माकर देशपांडे

0

दशक अठरा समास आठ अंतरदेव निरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. ब्रह्म निराकार निश्चळ आहे. चंचळ आत्म्याला विकार आहेत. त्याला सगळेजण देव असं म्हणतात. देवाचा पत्ता लागत नाही. एक देव आहे हे समजत नाही. अनेक देवांमध्ये एक देव असल्याचा अंदाज येत नाही, म्हणून विचार करावा. विचाराने देव शोधावा. अनेक देवांच्या गोंधळात पडूच नये. क्षेत्रामध्ये देव पाहिला, त्याच्यासारखा धातूचा देव बनवला पृथ्वीमध्ये अशाच प्रकारच्या रूढी पाळल्या जातात. नाना प्रतिमा, देवांचं मूळ म्हणजे हा क्षेत्रातील देव! नाना क्षेत्रे, भूमंडळ शोधून पहावे! क्षेत्रातील देव पाषाणाचा असतो. त्याचा विचार पाहिला तर अवतारात सापडतो.

अवतारी देव संपले. त्यांनी देह धारण केला आणि वरती निघून गेले. त्याच्यापेक्षा थोर आहेत ब्रह्मा विष्णू महेश. या तिन्ही देवांवर अंतरात्म्याची सत्ता आहे. तो प्रत्यक्ष कर्ता आणि भोक्ता आहे. युगानुयुगे तिन्ही लोक हा एकच देव चालवतो. हा निश्चयाचा विवेक वेदशास्त्रामध्ये पहावा. आत्मा शरीर चालवतो. तोच म्हणजे जीवात्मा, शिवात्मा, विश्वात्मा, निर्मालात्मा हा देव आहे. जाणीवरुपाने कळीवर विवेकाने तो सर्व चालवतो. तो अंतर्देव विचारात घेत नाहीत आणि धावा करत तीर्थक्षेत्री जातात. देव माहित नसल्याने ते लोक बापडे कष्टी होतात. मग मनाला विचारतात जिथे तिथे धोंडा आणि पाणी आणि उगीच वणवण हिंडून काय होतं? असा विचार ज्यांना कळला त्यांनी सत्संग धरला आणि सत्संगामध्ये अनेक लोकांना देव सापडला. अशी ही विवेकाची कामे आहेत.

विवेकी लोक नेमकी जाणतील. भ्रमात असलेल्या अविवेकी लोकांना काहीच कळणार नाही. अंतरवेधी, जाणणारे लोक असतील त्यांना ते समजेल. वेषधारी लोक असतील त्यांना हे समजणार नाही. म्हणून विवेकी लोक असतात ते मन शोधतात. विवेक नसताना जो भाव असतो तो अभाव. मूर्खस्य प्रतिमा देव, असं वचन आहे. पहात पहात शेवटापर्यंत गेला तोच विवेकी असतो. तत्व सोडून तो निरंजनात विलीन झाला. अरे जे आकाराला येतं ते सगळं नष्ट होते रे! मग गलबल्यापेक्षा वेगळे ते परब्रह्म जाणावं. चंचल देव, निश्चले ब्रह्म. परब्रह्मामध्ये भ्रम नाही.

अनुभवामुळे मनुष्य भ्रमरहित होतो. प्रचिती नसताना जे केलं ते सगळं वाया गेलं. प्राणी कर्मकचाट्यात कष्ट करून करून मेले. कर्मापासून वेगळे होण्यासाठी देवाला कशासाठी भजायचं? विवेकी लोक जाणतात. मूर्ख लोक जाणत नाहीत. काहीही अनुमान केले, काही विचार केला, देव जगाच्या आतबाहेर आहे.. सगुणाच्या आधाराने निर्गुण प्राप्त करावे. सगुण पाहिल्यावर मूळमायेच्या मुळापर्यंत गेला तो सहजपणे निर्गुणापर्यंत पोहोचतो. मीपणाच्या त्यागाने मनुष्य मोकळा झाला. वस्तूरूप झाला, ब्रह्मरूप झाला. परमेश्वराशी अनुसंधान लावले तर पावन होता येईल आणि मुख्य ज्ञान आणि विज्ञान त्याला मिळेल असं हे विवेकाचं विवरण असून शुद्ध अंतःकरणाने नित्य-अनित्य विवेकाचे श्रवण करावं त्यामुळे जगाचा उध्दार होईल! असं समर्थ सांगत आहेत. इतीश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे अंतर्देव निरुपण नाम समास अष्टम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!